नोकरदार ते यशस्वी व्यावसायिक | नातू केटरर्सचे अरुण नातू यांचा प्रवास – Natu Caterers


एक लहान मुलगा ! लहानपणापासून अभ्यासापेक्षा इतर उचापती करण्यात पटाईत, बोलका स्वभाव, सदैव मित्रांच्या घोळक्यात रममाण असणारा पण रक्तात व्यवसाय भिनलेला.. म्हणजेच एक रुपयाचे-दोन रुपये-५ रुपये कसे करायचे? ह्याचे अचूक आकलन असणारा एक मुलगा! अभ्यासाची आवड नाही. त्यामुळे शिक्षणात रस नाही. मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेजात न जाता व्यवसायाची आवड असल्याने त्याने टॅक्सी व टूरिस्ट कारचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायात फायदा होत होता..
पण त्याच्या वडिलांनी एकदा सहजच म्हटले, “तुझी व्यवसायाची आवड मी समजू शकतो पण ही टूरिस्ट लाईन, ड्रायव्हरची लाईन मला पसंत नाही, मला आवडत नाही. माझ्या मुलाने हा व्यवसाय करावा हे माझ्या मनाला पटत नाही.” त्या मुलाने वडिलांचे म्हणणे ऐकले. वडिलांच्या ओळखीने त्या तरुणाला क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीमध्ये नोकरी लागली. त्यानंतर कंपनीतर्फेच त्याला नाशिकला पाठवण्यात आले. त्या तरुणाला नाशिक मनापासून आवडले. ज्याचा ‘व्यवसाय’ हाच आत्मा होता त्या तरुणाने चक्क २२ वर्षे नोकरी केली. पत्नीने सुरु केलेल्या छोटेखानी व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांची जेवणाच्या डब्याची सोय त्याने नोकरी सांभाळून १० वर्षे केली. त्यात प्रचंड मेहनत केली. श्रमांना हार न मानणाऱ्या ह्या गृहस्थाने पत्नीच्या संपूर्ण सहकायनि व्यवसायाचा वेलू दरवर्षी वाढवत उंचीवर नेला. सन २००० मध्ये अशी स्थिती आली की नोकरीमध्ये ३६५ दिवसांमध्ये १२० ते १३० दिवस बिनपगारी रजा होऊ लागली. ह्या गृहस्थाचे भाग्य जोरावर ! खरेपणाने वागणाऱ्याला परमेश्वराकडून नेहमीच बक्षीस मिळत असते फक्त ते बक्षीस कधी व किती मिळणार हे पृथ्वीतलावरील प्राणीमात्राला कळत नाही.
ह्या गृहस्थाच्या मनात आले, आता बस.. नोकरी सोडावी.. ज्या कंपनीने २०-२२ वर्षे सांभाळले तिथे आता कामाला न्याय देणे शक्य होत नाही. अन् नेमकी तेव्हाच कंपनीची व्ही.आर.एस. स्कीम म्हणजेच स्वेच्छा निवृत्तीची योजना आली. व्ही.आर.एस.साठी पहिला फॉर्म ह्या गृहस्थाचा ! काहीही आर्थिक नुकसान न होता नोकरीमध्ये निवृत्ती.. अन् पुढील १५ वर्षांत व्यवसायाच्या वृक्षाचा अक्षरशः वटवृक्षासारखा विस्तार झाला. ते गृहस्थ म्हणजे नाशिकमधील प्रसिद्ध नातू कॅटरर्सचे श्री. अरुण नातू. ज्यांच्याकडे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ३ लहान मोठ्या हॉल्स्मधील कॅटरिंगची पूर्ण मोनोपॉली आहे. तसेच प्रसाद मंगल कार्यालय, इंद्रप्रस्थ हॉल, सोमेश्वर लॉन्स येथील कॅटरिंग पॅनेलवर नातू आहेत. तेथे ‘नातू कॅटरर्स’ला लोकांची सर्वाधिक पसंती ! हीच आहे, नातू कॅटरर्सची ओळख.. ग्राहकांच्या चवीची तृप्ती ।
प्रारंभिक जीवन :
ठाणे येथे वास्तव्यास असलेले श्री. महादेव नातू व सौ. शैलजा नातू या दांपत्याला दोन मुलगे – मोठा अनिल व धाकटा अरुण ! अरुणचे लहानपणापासून शालेय अभ्यासापेक्षा इतर उचापतींकडे अधिक लक्ष, तसाच त्याचा स्वभाव त्याच्या आईसारखाच बोलका ! जनसंपर्काची प्रचंड आवड ! १९७० च्या दरम्यान अरुणच्या वडिलांनी मुलुंड पूर्वेला एक ब्लॉक घेतला व नातू कुटुंब मुलुंड येथे राहावयास गेले. मुलुंडला नातू कुटुंब ज्या सोसायटीमध्ये राहत होते तेथील ४० ब्लॉक्सपैकी ३८ कुटुंब गुजराती तर फक्त २ कुटुंब मराठी त्यातील एक म्हणजे नातू कुटुंब ! अरुणचे अनेक मित्र गुजराती होते. अन् गुजराती समाजामध्ये ९८% मंडळी व्यावसायिक तर २% मंडळी नोकरी पेशातील ! त्यांच्यामध्ये व्यवसाय पिढ्यानपिढ्या परंपरागत आलेला. मुलांना लहानपणापासूनच व्यवसायाचे बाळकडू मिळालेले असते.
ह्या गुजराती मित्रांकडून अरुण व्यवसाय म्हणजेच एक रुपयाचे दोन रुपये, एक रुपयाचे पाच रुपये कसे करायचे हे गणित शिकला. त्याला स्वतःला शिक्षणात अजिबात रस नसल्याने इयत्ता आठवी, नववीपासूनच अरुण अनेक वस्तूंची खरेदी विक्री करु लागला. अरुण नफ्याचे प्रमाण कमी ठेवत असल्याने त्याच्या सर्व वस्तूंची विनासायास विक्री होत असे. आठवी-नववीतला विद्यार्थी असलेला अरुण कुठल्या जबाबदारीने है काम करीत नव्हता. एकतर व्यवसायाची उपजत आवड आणि मुख्य म्हणजे मिळालेल्या पैशांतून मौजमजा करणे, त्यामध्ये सिनेमा पाहणे, हॉटेलमध्ये जाणे, जनसंपर्काची आवड असल्याने मित्रांना स्वपैशाने खाऊ घालणे हेच उद्योग ! २-३ वर्ष अरुणने नवीन रिक्षा भाड्याने आणून चालवणे हा व्यवसाय केला. त्यामध्ये रोजचा १० रु. फायदा होऊ लागला.
व्यवसायाची सुरुवात :
अरुणने मॅट्रिकनंतर टॅक्सी व टूरिस्ट कारचा व्यवसाय करण्याचे ठरवले. लायसन्स नसतानाही अरुण गाडी चालवत असत ह्याचा पुरावा पर्मनंट लायसन्सच्या परीक्षेच्या वेळेस तेथील अधिकाऱ्यांना आला. त्याचे असे झाले. अधिकारी परीक्षा घेत असताना त्यांनी अरुणला वरळी येथील एका चढावरती अचानक गाडी थांबवून. मग पुढे जाण्यास सांगितले तेव्हा अरुणने सराईत ड्रायव्हरप्रमाणे गाडी एक इंचही मागे न येऊ देता गाडी पुढे नेली. तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या तात्काळ लक्षात आले की कायमस्वरुपी लायसन्स नसताना हा पठ्ठया सर्वत्र गाडी चालवत असावा. तसे विचारल्यानंतर अरुणने सुद्धा खरे खरे उत्तर दिले. माझा टॅक्सी- टूरिस्टचा व्यवसाय २ वर्षांपासून आहे. मी अनेकवेळा गाडी चालवली आहे. त्या अधिकाऱ्याने मंद स्मित करीत अरुणला कायमस्वरुपी लायसन्स दिले. असा हा अरुण खरे बोलणारा, मन निर्णय देईल त्याप्रमाणे वागणारा, स्वच्छतेचा पुरस्कर्ता, मित्रांसाठी जिवाला जीव देणारा पण तितकाच कठोर व स्पष्ट बोलणारा !
एकदा अरुणच्या वडिलांनी त्याला सांगितले, “अरुण, तुझ्या आतापर्यंतच्या उचापतींना मी कधी आडकाठी घेतली नाही किंवा तुझ्या कुठल्याही गोष्टींना मी कधी विरोध केला नाही. पण तू तुझा हा टूरिस्ट व टॅक्सी ड्रायव्हरचा व्यवसाय बंद करावास. ही टूरिस्ट लाईन मला पसंत नाही. ह्या व्यवसायात दारु, जुगार अशी व्यसने लागण्याची शक्यता जास्त असते. मी माझ्या ओळखीने तुला चांगली नोकरी मिळवून देतो.” वडिलांचे हे कळकळीचे सांगणे ऐकून अरुणच्या मनात ठसले की एक भल्यासाठीच सांगतो आहे. यामध्ये कुठेही नाही, आग्रहाचा बाऊ नाही. अरुणने टूरिस्ट टॅक्सीचा व्यवसाय बंद केला.
वडिलांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्या मित्राच्या साहाय्याने अरुणला क्रॉम्प्टन ग्रीव्हज्सारख्या प्रसिद्ध कंपनीत नोकरी मिळवून दिली. १९७८मध्ये अरुण क्रॉम्पटनच्या फॅक्टरीमध्ये जाऊ लागला. १९८० च्या दरम्यान क्रॉम्प्टनने फॅक्टरीमधील स्टाफला नाशिक १४ मे १९८० मध्ये अरुण नाशिकला रवाना झाले.
वैवाहिक जीवन :
७ जून १९८४ रोजी अरुणचे कल्पना खरे हिच्याशी लग्न झाले व १९८५ मध्ये अरुण व कल्पना यांना मुलगा झाला.. एक मध्यमवर्गीय समाधानी कुटुंब । आर्थिक संपन्नतेची स्वप्ने अरुण पाहत असला तरी त्यासाठी विशेष प्रयत्न असे नव्हते. मुलगा झाल्यानंतर मात्र अरुण व त्यांच्या पत्नीला वाटले की मुलाच्या वाढीच्या दृष्टीने, संस्कारांच्या दृष्टीने सिडको वसाहतीमधील वास्तव्य योग्य नव्हे. सिडकोच्या ब्लॉकचे पैसे अरुणच्या पगारातून वजा होत असत. १९९० पर्यंत सिडकोचा ब्लॉक अरुणच्या नावावर जणू झाला होता. १९९० मध्ये अरुण यांनी नाशिकच्या महात्मा नगर भागामध्ये ६१० चौ. फुटांचा २ बेडरुम हॉल किचनचा ब्लॉक घेतला. त्यासाठी त्यांनी H.D.F.C. बँकेकडून कर्ज घेतले. ब्लॉकमध्ये राहावयास आल्यानंतर अरुण समाधानाने म्हणतात, “स्वतःचा ब्लॉक होणे.. म्हणजेच ‘ही माझी वास्तू आहे’ असे सांगण्यात एक वेगळाच आनंद असतो. तसेच १९८७ पर्यंत मी सायकलने प्रवास करीत असे. १९८७ मध्ये मी पहिली बजाज सुपर स्कूटर घेतली. त्याहीवेळेस माझ्या स्कूटरला पहिली किक मारली तेव्हा वेगळाच आनंद झाला. १९८७ मध्ये अरुण यांच्या सौभाग्यवतीला अंबड येथील ग्लॅक्सो कंपनीमधील पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली. कुटुंबाच्या डबल इन्कममुळे अरुण यांची आर्थिक परिस्थिती खूप सुधारली.
१९९० मध्ये अरुण यांनी ब्लॉक घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांना— महादेवपंतांना खरा आनंद झाला.. मुलगा मार्गी लागला.. चांगला कुटुंबवत्सल झाला. त्याने टूरिस्ट लाईन सोडली म्हणून हे दिवस मी पाहू शकलो ह्याचे त्यांनी समाधान मानले. पण त्या कर्तव्यदक्ष पित्याला हे माहीत नव्हते की हाच माझा मुलगा अरुण उद्योजक होणार आहे. करोडोंचे व्यवहार करणार आहे व नाशिकमध्ये एक ‘सन्माननीय व्यक्ती’ म्हणून वावरणार आहे.
सौ. कल्पना यांना नोकरी लागल्यानंतर आर्थिक विवंचना मिटली असली तरी ‘बालसंगोपन’ हा मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्यावेळेस अरुण कायम सेकंड शिफ्ट घेऊ लागले. म्हणजेच दुपारी ३.३० ते रात्री ११.३०! दुपारी ३ ते रात्री ७ वाजेपर्यंत मुलाला पाळणाघरात ठेवावे लागले. ह्या अशा दिनचर्येमुळे पती पत्नींचे ओट्यावरती ठेवलेल्या चिठ्यांद्वारे संभाषण.. त्यामध्ये अनेक वेळा गैरसमज होत. मग शाब्दिक वादावादी व्हायची. मुलावर संस्कार करण्यास, त्याचा अभ्यास घेण्यास कोणालाच वेळ नाही. परत महादेवपंतांनी स्पष्ट सांगितले की ही तुमची जीवनशैली मला मान्य नाही. सूनबाईंनी नोकरी सोडावी. मुलांना आईचेच संस्कार हवेत. मनाच्या दोलायमान स्थितीत नातू दांपत्य असताना ७ जुलै १९९० रोजी कल्पना यांना कन्यारत्न झाले. काही महिने ह्या छोट्या बाळाला ग्लॅक्सोच्या फ्रेशमध्ये ठेवून पाहिले पण तरीही दोघांना वाटू लागले की कल्पनाच्या नोकरीबाबत ठाम निर्णय घेणे गरजेचे आहे. डिसेंबर १९९० मध्ये सौ. कल्पना यांनी नोकरी सोडली.
केटरिंग व्यवसायात पाऊल :
१९९४ मध्ये मुलगी ४ वर्षांची झाली. बालवाडीत जाऊ लागली तेव्हा सौ कल्पनाच्या मनात आले. “काहीतरी करु या का? पण ‘काहीतरी’ या प्रश्नाला उत्तर सुचत will power म्हणजेच आंतरिक इच्छा प्रबळ असली की समोरून येणाऱ्या संधी त्या व्यक्तीला खुणावतात. भोसला मिलिटरी स्कूलमधील आमटे मॅडम नातू परिवाराच्या परिचित होत्या. त्या तिथे मोठ्या पदावर होत्या, एकदा सहज त्या सौ. कल्पनाला म्हणाल्या, “भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी खाद्यपदार्थांचे काऊंटर लावता येतील का? ज्या विद्यार्थ्यांना घरून डबे आणणे जमत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी पोळीभाजी, दही भात किंवा नाश्ता म्हणून इडली, सँडविच, बटाटावडा असे प्रकार ठेवावेत. सौ. कल्पनाताईंना हा प्रस्ताव आवडला. कारण महात्मानगर पासून भोसला मिलिटरी स्कूल हे अंतर फक्त १० मिनिटे ! सौ. कल्पनाताईंनी अरुण यांच्याशी चर्चा करून हे काम स्वीकारले, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळू लागला. अरुण स्वतःची नोकरी सांभाळून पत्नीला व्यवसायात मदत करीत. अगदी भाज्या खरेदीपासून भाज्या चिरण्यापर्यंत अरुण पत्नीला मदत करु लागले. एकदा शाळेतील २५ शिक्षकांची ट्रीप जाणार होती.
शिक्षकांनी २५ जेवणाच्या डब्यांची फर्माइश केली. खरं म्हणजे ही फर्माईश हाच व्यवसायाचा श्रीगणेशा ठरला ! ह्या २५ शिक्षकांना जेवणाचे डबे म्हणजेच खाद्यपदार्थांची चव इतकी आवडली की त्यांच्याकडून त्यांच्या घरच्या समारंभाच्या ऑर्डर्स सौ. कल्पनाताईंना मिळू लागल्या. जेवणाची पार्सल्स, हळदीकुंकू, बारसे, केळवण, डोहाळ जेवण, वाढदिवस अनेक छोटे छोटे कार्यक्रम.. भरपूर ऑर्डर्स वाढल्या. ५ वर्षात व्यवसाय इतका वाढला की मदतीला ४ बायका येऊ लागल्या. अर्थातच महात्मानगर येथील राहत्या घरातून सर्व कामे करणे कठीण झाले. अरुण व सौ. कल्पना यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला व जवळच असलेल्या डिसोझा कॉलनीमध्ये एक २ रुम किचन ब्लॉक विकत घेतला व तिथे केटरिंगचे काम सुरु झाले. पदार्थांची चव ग्राहकांची संख्या वाढवत होती. ग्राहकांना हसतमुखाने सामोरे जाण्याचे काम अरुण नातू यांचे ! ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी त्यांचे सकारात्मक उत्तर तयार असे.
ज्यांना यश मिळत नाही ते नेहमी नशिबाला दोष देऊन मोकळे होतात व स्वतःवर ‘अपयशी’ हा शिक्का मारतात, पण खरे म्हणजे त्यांच्या प्रयत्नांची दिशा चुकलेली असते. कुणाचेही नशीब खरे किंवा खोटे नसते. डोक्यावर बर्फ व जिभेवर खडीसाखर ठेवून वागले तर ग्राहकांच्या सर्व आक्षेपांना, प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता येतात. श्री. अरुण नातू यांना हे सूत्र चांगलेच अवगत असल्याने त्यांना ग्राहकांची कमतरता कधीच जाणवली नाही.
सन २००० पर्यंत ‘नातू कॅटरर्स’च्या छोट्या-मोठ्या अशा भरपूर ऑर्डर्स वाढल्या. नातू कॅटरर्सच्या पदार्थांची, भोजनाची चव खवय्ये मंडळींच्या जिभेवर इतकी रेंगाळू लागली की नाशिकमध्ये मंगल कार्यालयांमध्ये पॅनेलमध्ये ‘नातू केटरर्स’ आहेत का ? अशी लोकांची विचारणा होऊ लागली. आणि नातू केटरर्स ग्राहकांच्या हक्काचा केटरिंग ब्रॅंड बनला.




