मल्लिका श्रीनिवासन या देशातील दुसरी व जगातील तिसरी सर्वात मोठी एक्सपोर्टर TAFE (ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट) च्या सीईओ आहेत. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1959 रोजी मद्रास येथे झाला. मद्रास युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्हॉर्टन स्कूल पेनसिल्व्हेनिया येथून एमबीए पूर्ण केलं. त्यानंतर त्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागल्या. त्याच्या कारकिर्दीत कंपनीने ट्रॅक्टर उत्पादनात खूप प्रगती केली आणि टर्न ओव्हर 160 करोड डॉलरच्या घरात गेला. आज कंपनी ट्रॅक्टर, फार्म मशिनरी, डिझेल इंजिन, जनरेटर, अभियांत्रिकी प्लास्टिक, हायड्रोलिक पंप आणि सिलिंडर, वृक्षारोपण यासारख्या क्षेत्रात अग्रेसर आहे. मल्लिका श्रीनिवासन यांनी भारतीय उद्योग महासंघ, भारतीय विदेश व्यापार संस्था यांसारख्या संस्थेमध्ये विविध पदे भूषविली आहेत. फोर्ब्स इंडिया ने वूमन लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तसेच फोर्ब्स अशिया टॉप 50 अशिया पॉवर बिझनेसवुमन पैकी एक म्हणून त्यांचा गौरव केला गेला आहे. तर भारत सरकारकडून 2014 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला. इतकेच नाही तर कार्पोरेशन AGCO यु एस ए च्या मंडळात त्या सदस्य आहेत. तर युएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या जागतिक संचालक मंडळावर देखील त्या सदस्य आहेत. दूरदृष्टी, व्यवसायातील संधी, कार्यक्षमता या अंगच्या गुणांबरोबरच ट्रॅक्टर क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे त्यांना आज "ट्रॅक्टर क्वीन " म्हणून ओळखले जाते.