गंगाभीषण तथा हल्दिराम अगरवाल यांचा जन्म राजस्थानमधील बिकानेर येथे मारवाडी कुटुंबात झाला. फार लहान वयात ते आपल्या कुटुंबाच्याच व्यवसायात दाखल झाले. या कुटुंबाचा बिकानेरमधील भुजिया बाजार येथे भुजिया (तिखट शेव) बनवण्याचा छोटासा व्यवसाय होता. त्यांचे लग्न चंपादेवींशी झाले होते. सुरुवातीला ते काकूच्या रेसिपीनुसार भुजिया बनवून विकत असत. परंतु नंतर काही कौटुंबिक वादामुळे त्यांनी पत्नीसह घर सोडले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीने घरीच बनवलेल्या मूग डाळ नमकीनची रस्त्यावर विक्री सुरू केली. केली. १९४६ मध्ये हल्दीराम यांनी बिकानेरमध्ये आपले पहिले दुकान सुरू केले. तेथे त्यांनी आपली आधीची भुजिया अजून बारीक करून डुंगर सेव या नावाने विकायला सुरुवात केली. हे नाव बिकानेरचे राजा डुंगर सिंग यांच्या नावावरून ठेवले होते. १९४०-५०च्या दरम्यान दर आठवड्याला शंभर ते दोनशे किलो भुजिया विकली जाऊ लागली. हल्दिरामच्या या लोकप्रियतेमुळे सुरुवातीला दोन पैसे किलोने मिळणारी भुजिया २५ पैसे किलो इतकी महागली. एकदा ते लग्नाच्या निमित्ताने कोलकात्याला गेले असताना सोबत नातेवाईकांसाठी ही भुजिया शेव घेऊन गेले. या नातेवाईकांनी त्यांना थेट कोलकात्याला दुकान सुरू करण्याचा हट्ट धरला. त्यांनी पण तो मान्य केला आणि तिथे शाखा सुरू झाली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपणही आपली शाखा इतरत्र उघडू शकतो. पुढे शिवकिसन आणि मनोहरलाल हे कर्तबगार नातू हाताशी आल्यावर दिल्ली, नागपूर, नोएडा इथे हा व्यवसाय वाढत गेला. २००३ साली अमेरिकेत त्यांनी आपले प्रॉडक्ट्स पाठविण्यास सुरुवात केली. एकेक करत तब्बल ८० देशांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स विकले जाऊ लागले. भुजियाच्या जोडीला मिठाई, फरसाण, दुधापासून बनवलेली उत्पादनं विकायला त्यांनी सुरुवात केली. पुणे, नागपूर, नोएडा, कोलकाता आणि दिल्ली येथे कंपनीची स्वतःची रेस्टॉरंट्स देखील आहेत. कंपनीची आजची उलाढाल ७००० कोटींहून अधिक असून शेवेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज तब्बल ४०० प्रॉडक्ट्सपर्यंत पोहोचला आहे. २०१७ मध्ये इतर सर्व मोठ्या ब्रँड्सना मागे टाकून हल्दीराम भारतातील सर्वात मोठा स्नॅक्स ब्रँड बनला.