जिंकलंस भावा!प्रेरणादायी

‘ज्या शेतात आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली’ : उद्योजक अशोक खाडे

वडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत…कधी-कधी आम्हा भांवडांनाही कामाला जावं लागायचं…..आयुष्यानं दिलेल्या चटक्‍यांच्या आठवणी अशोक खाडे सांगत होते…””सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. मी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. माझ्या शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती.

सन 1972 ला चांगल्या गुणांनी अकरावी झालो. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. अंगात घालायला कपडेच नाही, तर पायताण कोठून येणार. आम्हाला शिकविणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट व पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेला पेनची निफ तुटली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के गुण पडले. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे; परंतु अकरावीतील “त्या’ पेनची किंमत कशालाही नाही. आजही माझ्याकडे तो पेन आहे. वडील बोर्डिंगवर आम्हाला भाकरी घेऊन यायचे आणि म्हणायचे, “राजांनो, गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही. तुम्ही धीर सोडू नका. माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.’ वडिलांचे शब्द काळजाला भिडले,” खाडे म्हणाले.

खाडे कुटुंबीयांनी सन 1975 ला मुंबई गाठली. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा होती, असे सांगून खाडे म्हणाले, “”रोजीरोटीसाठी आम्ही तिघेही भाऊ माझगाव डॉकमध्ये नोकरी करायला लागलो. मी डिझाइन विभागात होतो. मोठ्या भावाच्या आग्रहामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाले. सन 1983 मध्ये कंपनीच्याच कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवीन उमेद निर्माण झाली होती. गरिबी तर टोचत होतीच, स्वतःचे काही तरी करायचा ध्यास घेतला. त्यातून सन 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. अन्य भावांनीसुद्धा राजीनामा दिला. तिघेही एकत्र राहत होतो आणि घरात एक प्रकारचे इंजिनिअरिंगचेच वातावरण होते. गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन “दास ऑफशोअर‘ची निर्मिती झाली. मराठी माणूस, त्यातही खाडे आडनाव म्हटल्यावर कोण काम देणार, हा प्रश्‍न होताच. त्यामुळे तिघा भावांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) कंपनीला “दास’ नाव दिले. नावसुद्धा “के. अशोक’ असे सांगायचो. पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधला. मग मागे वळून पाहिले नाही.”

“दास’ कंपनीने ओएनजीसी, ब्रिटिश गॅस अशा नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलेय. या समूहाच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्‍ट्‌स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत सात कंपन्या आहेत. अबुधाबीचे प्रिन्स शेख महमंद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी केल्याचे खाडे अभिमानाने सांगतात.

वारकरी वृत्तीचे असलेले खाडे यांचा ज्ञानेश्‍वरीवर गाढा विश्‍वास. जमशेठजी टाटा, मदर तेरेसा हे त्यांचे आदर्श. एक रुपयातील एक भाग समाजासाठी, एक भाग देवासाठी, एक भाग कामगारांसाठी आणि उर्वरित भाग स्वतःसाठी अशी त्यांनी उत्पन्नाची वाटणी केलीय. वर्षभर बीएमडब्ल्यूमध्ये फिरणारे खाडे पंढरीची पायी वारी करतात. ज्या चित्रा टॉकीज जवळील झाडाला टेकून वडील गटई काम करत होते, त्या झाडाला समोरून जाताना न चुकता नमस्कार करतात. खाडे यांनी मास्टर इन फिलॉसॉफी पूर्ण केले असून, संत ज्ञानेश्‍वर महाराजांवर पीएचडी करण्याचा विचार आहे.

“दुसऱ्यांवर केलेले उपकार तळहातावर लिहिण्यापेक्षा तळपायावर लिही, की जे फक्त मातीच वाचू शकते’ हे समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे शब्द खाडे यांनी मनात कोरले आहेत.

मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. ‘माझ्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एक ही कर्मचारी दिसणार नाही. ज्या शेतात माझी आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली आहे. ज्या गावात दगडू चांभाराचा मुलगा अशी ओळख होती, ते गाव आता “आबा’ म्हणून ओळखत आहे. आजही आम्ही भाऊ एकत्र कुटुंब म्हणून राहतो. एकत्र कुटुंबात जी ताकद आहे, ती कशातच नाही. त्या भक्कम आधारामुळेच आम्ही आयुष्यात काही तरी करू शकलो.”

अशोक खाडेंचा “गुरुमंत्र’
“जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद लक्षात ठेवा.
कष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल.
आईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button