आधुनिक शेतीशेती

‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

सर्वसाधारण पारंपरिक भात पिकापासून 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा 70 एकरामध्ये हा प्रयोग राबविण्यात आला. ‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगड राज्यातून मागविण्यात आले असून सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या उपक्रमासाठी 10 बचत गटांना बियाण्यासह जैविक खते तसेच सेंद्रीय धानासाठी आवश्यक असणारे निंबोळी अर्कासह इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे या वाणावर किडीचा प्रादुर्भाव नसल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’चे उत्पादन 110 दिवसात घेतल्या जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेसुद्धा सहज शक्य झाले आहे. शेतातील धानाचे लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढीसाठी आत्मांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा, यासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. ‘ब्लॅक राईस’च्या भरडणीसाठी सवलतीच्या दरावर राईस मिलसुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.

दैनंदिन भोजनात पांढरा, ब्राऊन तांदळाचा वापर नेहमीच करतो. परंतु ‘ब्लॅक राईस’(काळे तांदूळ) विषयीची माहिती नवीन आहे. फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे नाव Forbidden Rice असे ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत याचा प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.

भारतामध्ये ‘ब्लॅक राईस’ उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी 10 बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उत्पादनाला सुरुवात केली आहे. यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त Anthocyanin Antioxidant गुणधर्म आहेत. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’ खाणे आरोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे ‘ब्लॅक राईस’ हा पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार असल्याची माहिती ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.

सेलूच्या बचत गटामार्फत उत्पादन

कामठी तालुक्यातील सेलू येथील निसर्गराजा सेंद्रीय शेतमाल उत्पादक स्वयंसहाय्यता गटामार्फत दिनकर ठाकरे व अशोक कोकाटे यांनी प्रत्येकी एका एकरात ‘ब्लॅक राईस’ची रोवणी केली होती. पारंपरिक धानाऐवजी काळा तांदूळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगले आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत.आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेतात काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन होणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांनी यावेळी दिली. ‘ब्लॅक राईस’साठी जैविक औषधी खते, निंबोळी अर्क व गांडूळ प्रकल्पसुद्धा कृषी विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘ब्लॅक राईस’ची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा संकल्पही बचत गटाच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

– मराठी कृषी जागरण

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button