आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा
शाळेत नापास पण जगभरातील ५०० हून कंपन्यांना आपल्या इशार्यावर चालवू शकणाऱ्या त्रिशनित अरोरा या ३० वर्षीय युवकाची कहाणी मोठी रोचक म्हणावी लागेल. त्रिशनित हा एथिकल हॅकर म्हणून काम करतो आणि त्याच्या TAC Security कंपनीचा व्यवसाय आज करोडो रूपयांचा आहे. त्रिशनितने हे यश अवघ्या 25 व्या वर्षातच मिळविले आहे.
३० वर्षीय त्रिशनित उद्योजक, एका कंपनीचा मालक आणि लेखक आहे. त्याची ‘हॅकर टॉक’ आणि ‘हॅकिंग विथ स्मार्टफोन’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 2017 मध्ये त्याचे नाव ‘50 Most Influential Young Indians’ या GQ मासिकाच्या यादीत नोंदवले गेले. ‘Fortune India’ च्या अंडर 40 यादीत सुद्धा त्याचे नाव आहे. एवढंच काय तर पुढे जाऊन फोर्ब्सच्या प्रतिष्ठित ‘30 अंडर 30’ यादीत सुद्धा त्याने स्थान मिळवले. TAC Security या कंपनीचा तो संस्थापक आहे. ही कंपनी सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करते. विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यांच्या सायबर सुरक्षेमधील त्रुटी शोधून मार्गदर्शन करणे हे या कंपनीचे मुख्य काम आहे.
एथिकल हॅकींग म्हणजे नेटवर्क, सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चरची सुरक्षा इव्हॅल्युएट करणे. म्हणजे कोणत्याही कंपनीची, संस्थेची सायबर सुरक्षा भेदली जाऊ नये यावर हे हॅकर्स लक्ष ठेवतात. तसेच डेटा चोरी, व्हायरस घुसविणे अशा प्रकारांपासूनही संरक्षण देतात. त्रिशनित भारतीय गुप्तचर संस्था सीबीआय, रिलायन्स, अमूल, पंजाब पोलिस, गुजरात पोलिस, एवन सायकल्स यासारख्या सुमारे ५०० कंपन्यांना ही सेवा त्याच्या कंपनीच्या माध्यमातून देतो आहे. रिपोर्ट्स नुसार दिग्दर्शक सुनील बोहरा त्रिशनितच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यावर काम करत आहेत. हा चित्रपट हंसल मेहतांद्वारा दिग्दर्शित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. या लेखाच्या माध्यमातून त्रिशनित चा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेणार आहोत.
अशी झाली हॅकिंगची सुरुवात
त्रिशनितचा जन्म 2 नोव्हेंबर 1993 रोजी पंजाबमधील लुधियाना मध्ये झाला. शालेय जीवनापासूनच त्याला संगणकाची आवड होती. तेव्हा त्याला स्वत:चा वैयत्तिक संगणक हवा होता, परंतु मध्यमवर्गीय घरात सहसा एकाच संगणक असतो जो सर्वांच्या कामासाठी वापरला जातो. त्रिशनितचे कुटुंब याला अपवाद नव्हते. त्याला संगणक आणि त्याच्या एकूणच कार्यप्रणाली बद्दल खूप उत्सुकता होती. एकेदिवशी त्याने घरातील संगणकाच्या वायर्स काढून त्याचे निरीक्षण करायला सुरुवात केली. त्याने निर्माण केलेल्या या गोंधळामुळे घरी मॅकॅनिक बोलवावा लागला. त्याच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेचे त्रिशनितने बारीक निरीक्षण केले आणि त्याचा त्याला पुढे जाऊन फायदा झाला.
त्रिशनित शालेय वयात असताना त्याने त्याच्या वडिलांचा पीसी यशस्वीपणे हॅक केला होता. त्रिशनितला पहिल्यापासून संगणकात खूपच स्वारस्य होते व त्यापायी शाळेत आठवीत असताना हॅकींगच्या नादात त्याने दोन पेपर दिले नाहीत परिणामी त्याच्यावर आठवी नापासचा शिक्का बसला. त्याचे वडील अकौंटंट. मुलाचे हे उद्योग त्यांना व परिवाराला कधीच आवडले नाहीत, मात्र त्रिशनित हेच आपले करियर करायचे यावर ठाम होता. जग अधिकाधिक सायबर कनेक्टेड सेटअपच्या दिशेने वाटचाल करत होते आणि त्रिशनीतने त्याच्या कौशल्याच्या जोरावर एखाद्या व्यक्तीसाठी असलेल्या सायबर क्षेत्रातील संधींचा अंदाज लावला होता.
आठवीत नापास झाल्यावर त्याचे मित्रही त्याची चेष्टा करू लागले तेव्हा त्याने शाळा सोडली व बाहेरून बारावीची परिक्षा दिली. एकीकडे एथिकल हॅकींग सुरू होतेच. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने कंपनी स्थापन केली व अवघ्या दोन वर्षात त्याच्या कंपनीकडे ५०० हून अधिक क्लायंट आले. TAC Security कंपनी सुरु केली तेव्हा तो केवळ 19 वर्षांचा होता. आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी त्रिशनितच्या आई-वडिलांनी सुद्धा त्याला या गोष्टीसाठी पूर्ण पाठिंबा दिला होता. त्याने सुरुवातीला संगणक दुरुस्त करणे आणि हार्डवेअर दुरुस्त करणे अशी कामे केली. त्याला 19 व्या वर्षी तब्बल 60,000 रुपयांचा चेक मिळाला. पुढे जाऊन हेच पैसे त्याने आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरले. जेवढे काही साठवले होते तेवढ्या सर्वच बचतीचा उपयोग कंपनी उभा करण्यासाठी केला गेला असे त्रिशनित सांगतो.
TAC सिक्युरिटी सध्या जगभरातील ग्राहकांसह आंतरराष्ट्रीय ख्यातीची सायबर सुरक्षा प्रदान करणारी कंपनी आहे. या कंपनीची सध्याला भारतात 4 आणि दुबईमध्ये 1 अशी 5 कार्यालये आहेत. देशातील प्रमुख कायदे अंमलबजावणी संस्थांसह, TAC सिक्युरिटीचे ग्राहक म्हणून रिलायन्स आणि अमूल देखील आहेत. शिवाय, विविध सध्याच्या डिजिटल व्यवहारांचा कणा असलेली UPI प्रणाली, या तरुण टेक प्रतिभावंताच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहे. त्रिशनित आता त्याचा व्यवसायाची उलाढाल ८ हजार कोटींवर नेण्याची आशा बाळगून आहे.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकून स्टार्टअप्सचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.