
शिक्षक दिन आपल्याला त्या व्यक्तींच्या योगदानाची आठवण करून देतो, ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश पसरवून आपल्या जीवनाला दिशा दिली. भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस फक्त शिक्षकांचे कौतुक, त्यांचे स्मरण करण्यासाठीच नाही, तर शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी देखील असतो. या दिवसाची विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, ज्यांनी शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणून आपल्या देशाला गौरवान्वित केले. जाणून घेऊया त्यांच्या यशस्वी जीवनाची प्रवास.
भारताच्या आधुनिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत ज्यांनी एकाच वेळी अनेक क्षेत्रात त्यांच्या विचारांची दीर्घकालीन छाप टाकली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ( Sarvepalli Radhakrishnan) हे असेच एक दीप्तिमान व्यक्तिमत्त्व. ते एकाच वेळी पूर्व-पश्चिम विचारांचा सुसंवाद घडवणारे तत्त्वज्ञ, विद्यापीठ प्रशासनात कर्तृत्व सिद्ध करणारे कुलगुरू, भारतीय संविधानिक लोकशाहीचा मान राखणारे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती आणि आदर्श पिढ्या घडवणारे आदर्श शिक्षक होते.
प्रारंभिक जीवन
डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म सर्वपल्ली राधाकृष्णय्या म्हणून सर्वपल्ली वीरस्वामी आणि सीथम्मा यांच्या तेलुगू हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्तानी येथील केव्ही हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या संपूर्ण शिक्षणात त्यांना सतत शिष्यवृत्ती मिळत राहिली. हायस्कूलसाठी त्यांनी वेल्लोरमधील वुरहीस कॉलेजची निवड केली. १६ व्या वर्षी त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजात प्रवेश घेतला. १९०७ साली त्यांनी पदवी संपादन केली आणि त्याच कॉलेजमधून पुढे पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. त्यांचा “वेदांताचे नीतिमत्ता आणि त्याचे आधिभौतिक पूर्वग्रह” हा प्रबंध केवळ वयाच्या विसाव्या वर्षी प्रकाशित झाला.
शैक्षणिक कारकीर्द
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम सुरू केले आणि नंतर प्राध्यापक म्हणून पुढील पायऱ्या चढत गेले. १९१८ ते १९२१ दरम्यान त्यांनी म्हैसूर विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. यानंतर १९२१ मध्ये ते कोलकत्ता विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक बनले. येथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या विचारसरणीला आधुनिक आणि जागतिक दृष्टिकोनातून मांडले.
१९३१ – १९३६ दरम्यान त्यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यभार सांभाळला . त्यानंतर १९३९ मध्ये पंडित मदनमोहन मालवीय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू पदी विराजमान झाले आणि १९४८ पर्यंत कार्यभार सांभाळले. खास गोष्ट म्हणजे, राधाकृष्णन यांनी कोलकत्ता आणि बनारस या दोन्ही विद्यापीठांमध्ये काम करताना प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही.कोलकत्ता विद्यापीठात आठवड्याभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार-रविवार बनारस विद्यापीठाचे प्रशासकीय काम पाहत असत.
ऑक्सफर्ड विद्यापीठात १९३६ ते १९५२ दरम्यान त्यांनी पौर्वात्य धर्म आणि नीतिशास्त्राचे स्पाल्डिंग प्राध्यापक म्हणून २० वर्षे अध्यापन केले. येथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे सखोल अध्ययन करून पाश्चात्य जगात त्याची महत्त्वपूर्ण ओळख करून दिली.
साहित्यातील योगदान: विचारांचा विश्वकोश
संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. डॉ. राधाकृष्णन हे विपुल लेखन करणारे विद्वान. त्यांचे लेखन भारतीय तत्त्वज्ञान, धर्म, समाज आणि आधुनिक जगातील नैतिक मूल्यांवर आधारित होते. त्यांनी द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, इंडियन फिलॉसॉफी,द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ,अँन आयडियलिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ,ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट,ईस्ट अँड वेस्ट: सम रिफ्लेक्शन्स, असे २५ पेक्षा जास्त ग्रंथ लिहिले. या लेखनामुळे भारतीय तात्त्विक विचार पाश्चात्त्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि भारतीय संस्कृतीची खरी ओळख समजून घेण्यास मदत झाली.
डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनातून एक महत्वाची बाब निदर्शनास येते की ‘शिक्षक हा राष्ट्रनिर्मातेपेक्षा कमी नसतो’. कारण गुरूशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय प्रगती नाही, आणि प्रगतीशिवाय राष्ट्र नाही.या एका विचारात शिक्षक दिनाचा संपूर्ण अर्थ दडलेला आहे. चला तर मग, या शिक्षक दिनी आपण आपल्या सर्व गुरुजनांना कृतज्ञतेने स्मरूया, त्यांच्या शिकवणुकीला कृतीत उतरवूया.
आणखी वाचा
- वयाच्या ११ व्या वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये उतरून जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनलेले वॉरन बफे
- भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास
- जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा