लेखउद्योजकताबिझनेस स्टोरीझ

Titan Story: एक घड्याळ कसं बनलं देशाची ओळख

Titan Story: मित्रांनो, तुम्ही अलीकडेच आलेली ‘Made In India – A Titan Story’ ही वेब सिरीज पाहिली आहे का? नसेल पाहिली, तर तुम्ही स्वतंत्र भारतातील सर्वात मोठ्या ‘बिझनेस मास्टरस्ट्रोक’च्या कथेला मुकत आहात!

आज प्रत्येकाचा कपड्यांपासून ते शूजपर्यंत एक ठराविक ब्रँड फिक्स असतो. मार्केटमध्ये रोज हजारो नवे ब्रँड्स येतात आणि अचानक गायब होतात. पण या गर्दीतही एका ‘Made in India’ ब्रँडने गेल्या ४० वर्षांपासून आपला दबदबा कायम ठेवलाय. आपण नेहमी ऐकतो की “वेळ प्रत्येकाची येते”… पण दुसऱ्याची ‘वेळ’ कशी बदलायची आणि मार्केटवर आपलं साम्राज्य कसं उभं करायचं, हे टाटांच्या ‘टायटन’ ने (Titan) जगाला दाखवून दिलं आहे.

चला तर मग, याच वेब सिरीजच्या निमित्ताने टायटनच्या या रंजक प्रवासाची पाने उलटून पाहूया…

HMT ची मक्तेदारी आणि टाटांची एन्ट्री

१९८० च्या दशकात भारतात घड्याळ म्हणजे ‘एचएमटी’ (HMT) असे समीकरण होते. लग्न असो वा वाढदिवस, HMT चे घड्याळ मिळणे ही मोठी प्रतिष्ठेची गोष्ट मानली जायची. लोकांना घड्याळ खरेदी करण्यासाठी कित्येक महिने वाट पाहावी लागायची. ही घड्याळे ‘मेकॅनिकल’ म्हणजेच चावी देऊन चालणारी होती. याच काळात जगभरात ‘क्वार्टझ’ (Quartz) म्हणजेच बॅटरीवर चालणाऱ्या आणि अतिशय अचूक वेळ दाखवणाऱ्या आधुनिक घड्याळांची लाट आली होती. परंतु, सरकारी नियमांमुळे आणि संथ कारभारामुळे एचएमटी काळासोबत बदलू शकली नाही. नेमकी हीच पोकळी टाटा समूहाने ओळखली आणि भारतात एका नव्या क्रांतीला सुरुवात झाली.

झरक्सिस देसाई (Xerxes Desai)

Titan Story: टायटन ब्रँडचे खरे शिल्पकार होते – झरक्सिस देसाई (Xerxes Desai). टाटा प्रेसचे प्रमुख असलेल्या या माणसाने भारताला घड्याळांच्या दुनियेत जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न पाहिले. देसाई यांनी टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष जे.आर.डी. टाटा यांच्याकडे भारतात क्वार्टझ घड्याळे बनवण्याचा प्रस्ताव मांडला. सुरुवातीला हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. परकीय चलन आणि तंत्रज्ञानाच्या आयातीवर कडक निर्बंध असल्यामुळे सरकारने टाटांना घड्याळ निर्मितीचा परवाना नाकारला. पण झरक्सिस देसाई हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळासोबत (TIDCO) हातमिळवणी केली आणि संयुक्त भागीदारीतून १९८४ मध्ये ‘Titan Watches Limited’ ची स्थापना केली. बंगळुरूरवळील होसूर या एका छोट्याशा गावात टायटनचा पहिला अत्याधुनिक कारखाना उभारण्यात आला.

प्रॉडक्ट नाही, ‘दागिना’ विकला! (The Psychological Marketing)

त्यानंतर १९८७ मध्ये टायटनची घड्याळे बाजारात आली आणि त्यांनी पहिल्याच फटक्यात संपूर्ण बाजारपेठ काबीज केली. देसाई यांची सौंदर्यदृष्टी अफाट होती. त्यांनी ओळखले की, भारतीयांसाठी घड्याळ हे फक्त वेळ पाहण्याचे साधन नाही, तर तो एक दागिना आहे. त्यांनी घड्याळांना फॅशन आणि स्टेटस सिम्बॉल बनवले. टायटन रागा (Titan Raga) हे भारतीय महिलांच्या पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही रूपांना साजेसा, दागिन्यासारखा दिसणारा हा ब्रँड प्रचंड यशस्वी ठरला. दुसरा म्हणजे टायटन एज (Titan Edge), जगातील सर्वात पातळ (Slimmest) वॉटर-रेझिस्टंट क्वार्टझ घड्याळ बनवून टायटनने जागतिक स्तरावर भारतीय इंजिनिअरिंगची ताकद सिद्ध केली. त्यानंतर येतो तो नेब्युला (Nebula), १८ कॅरेट शुद्ध सोन्याची आणि मौल्यवान रत्नांची जडणघडण असलेली ही घड्याळे भारतीय विवाह सोहळ्यांची ओळख बनली.

Titan Story: पण तुम्हाला माहिते का? टायटनला घराघरात पोहोचवण्यात त्यांच्या जाहिरातींचा आणि पार्श्वसंगीताचा खूप मोठा वाटा होता. देसाई यांनी स्वतः पाश्चात्य संगीतकार मोझार्टच्या ‘सिम्फनी क्रमांक २५’ ची निवड टायटनच्या सिग्नेचर ट्यूनसाठी केली. ती कानात पडताच आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात एक आपुलकीची भावना निर्माण होते. टायटनने आपल्या जाहिरातींमधून नात्यांचे बंध जोडले. मग ती वडिलांनी मुलीला लग्नात दिलेली भेट असो, किंवा निवृत्तीच्या वेळी मिळालेला सन्मान असो. “खास लोकांसाठी, काहीतरी खास” या टॅगलाईनने भारतीयांना भावनिक साद घातली आणि हळूहळू टायटनने भारतीयांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. 

स्विस आणि जपानी कंपन्यांना आंतरराष्ट्रीय टक्कर

भारतात स्वतःचे पाय घट्ट रोवल्यानंतर देसाई यांनी टायटनचा मोर्चा परदेशी बाजारपेठीकडे वळवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विस (Swiss) आणि जपानी कंपन्यांची वर्षानुवर्षे मक्तेदारी होती. सुरुवातीला परदेशात ‘मेड इन इंडिया’ घड्याळांकडे संशयाने पाहिले गेले. पण टायटनच्या उत्कृष्ट दर्जा, आंतरराष्ट्रीय डिझाईन्स आणि परवडणाऱ्या किमती यांमुळे त्यांनी युरोप, मध्य पूर्व आशिया आणि आफ्रिकेतील ३० पेक्षा जास्त देशांमध्ये आपले स्थान निर्माण केले. आज टायटन ही जगातील पाचवी सर्वात मोठी घड्याळ उत्पादक कंपनी आहे.

बदलत्या काळाशी जुळवून घेणारा ब्रँड

आजच्या बदलत्या काळातही टायटन या ब्रँडने गेल्या ४० वर्षांपासून आपले अस्तित्व कसे टिकवून ठेवले? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच, याचे उत्तर स्पष्ट आहे काळ बदलला, लोकांच्या हातात स्मार्टफोन आले आणि घड्याळांची गरज कमी होऊ लागली. पण टायटनने सतत स्वतःमध्ये बदल घडवून आणला. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी त्यांनी Fastrack सारखा कूल आणि ट्रेंडी ब्रँड लॉन्च केला. तसेच प्रीमियम लुकसाठी Sonata आणि Xylys बाजारात आणले. आजच्या डिजिटल आणि फिटनेस युगात टायटनने अत्याधुनिक Smartwatches बाजारात आणून अ‍ॅपल आणि सॅमसंगसारख्या जागतिक टेक कंपन्यांना तगडी टक्कर दिली आहे आणि आजही टायटन आहे ब्रँड लाखो भारतीयांची पहिली पसंती आहे. 

दरम्यान २०१६ मध्ये झरक्सिस देसाई यांचे निधन झाले, परंतु त्यांनी लावलेले हे छोटेसे रोपटे आज एका महावृक्षात रूपांतरित झाले आहे. आज जेव्हा एखादा परदेशी नागरिक आपल्या मनगटावर टायटनचे घड्याळ बांधतो, तेव्हा तो फक्त वेळ पाहत नसतो, तर तो भारताची गुणवत्ता आणि कौशल्याची प्रचिती घेत असतो. म्हणूनच, टायटन हे केवळ एक घड्याळ नाही, तर तो देशाची ओळख बनलेला एक अस्सल, दिमाखदार आणि जागतिक ‘मेड इन इंडिया’ ब्रँड आहे, ज्याचा काटा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानासोबत अविरत चालत राहील.

तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिलं टायटनचं घड्याळ कधी घेतलं होतं? किंवा तुम्हाला टायटनची कोणती जाहिरात सर्वात जास्त आवडते? कमेंट्समध्ये तुमची आठवण नक्की सांगा!

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button