अर्थजगतआर्थिकलेख

बचत छोटी – शक्ती मोठी | आजच करा तुमच्या भविष्याची आर्थिक योजना | Plan Your Financial Future Today.

पैसा कमावणे ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. पैशांशिवाय माणूस जगू शकत नाही. एक चांगले जीवन जगण्यासाठी जवळ मुबलक पैसा असणे खूप गरजेचे आहे. पण पैसे कमावण्यासोबतच पैशांची बचतही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक लोकांना पैशाची बचत कशी करावी, हे कळत नाही. त्यामुळे अनेकदा अशा लोकांच्या हातून खूप पैसा खर्च होतो.  पण, हे ही बचत काही एका रात्रीत होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. 

तुमची बचत तुमच्या चेहऱ्यावर दिसत असते. भरपूर बचत गाठीशी असल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या वागण्याबोलण्यातून जाणवत असतो. उत्पन्न जेमतेम असल्याने बचत करू शकत नाही, असा फार मोठा वर्ग आपल्याकडे आहे. हातातोंडाशी गाठ आहे, अशा उत्पन्न गटातील लोकांना बचत करणे कठीण असते, जीवनावश्यक खर्च एका मर्यादेपेक्षा कमी होऊ शकत नाहीत, म्हणून उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे हाच पर्याय योग्य ठरतो.

कोण किती कमावतो, यापेक्षा त्याच्या कमाईतून किती प्रमाणात बचत करतो, किती अतिरिक्त खर्च करतो यांसारख्या बाबींवर त्या व्यक्तीची दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती क्षमता आणि त्याचे आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून असते.

कमी किंवा योग्य तितकाच खर्च करणे हा बचतीचा मूलमंत्र आहे; परंतु बरेच जण बचतीचा विचार करण्यापेक्षा कुठे, कसा आणि किती खर्च करता येईल याच विचारात जास्त असतात.

खर्च किती, कसा, कुठे आणि का करावा हा व्यक्तीसापेक्ष प्रश्न आहे. तरीही उत्पन्नाच्या तुलनेत आणि बचतीचे व्यवस्थापन ठरवून केल्यास आर्थिक अडचणी येत नाहीत.

 उदाहरण १ :

निशा आणि पंकजचा रविवार उजाडला तोच मुळी कागद आणि पेन घेऊन. प्रत्येक खोलीत काय फर्निचर करायचं याचा आराखडा दोघांनी मिळून तयार केला. गेल्या कित्येक महिन्यांत दोघांच्या पगारातले थोडे थोडे करत बरेच पैसे त्यांनी त्यांचे घर सजवण्यासाठी साठवले होते.

उदाहरण २ :

रोजंदारीच्या कामावर जाणारा रघू आज खुश होता. गावाकडे असणारी त्याची बायको, मुलं लवकरच त्याच्याबरोबर राहण्यासाठी येऊ शकणार होती. कारण आजच तो एक खोली भाड्याने घेण्यासाठी मालकासोबत व्यवहार करून आला होता. रोजच्या कामाचे मिळणारे पैसे अगदी गरजेपुरते थोडे वापरून बाकीचे पैसे त्याने शेठच्या सांगण्यावरून बँकेत साठवले होते.

निशा-पंकज असोत की रघू असो, रोजच्या दैनंदिन खर्चाशिवाय अधिकचा खर्च ते करू शकत होते. हे त्यांना कसे सहज शक्य झाले? याचे उत्तर म्हणजे त्यांना मिळणाऱ्या कमाईच्या पैशातून काही पैसे त्यांनी वेगळे काढले होते, बचत केली होती. उत्पन्नातील सर्वच्या सर्व पैसे त्यांनी लगेच खर्च केले नव्हते.

अविचाराने खर्च करणारी, कोणाच्याही साहाय्याशिवाय लढणारी आणि प्रत्येक गोष्टीची घाई करणारी व्यक्ती लवकर लयास जाते.

साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर मिळालेले सर्वच उत्पन्न उधळून न देता काही रक्कम हाती राखणे महत्वाचे आहे. हातात आले आणि उडवून लावले असे न करता उत्पन्नातून खर्च वजा जाता जी शिल्लक आपल्याकडे उरते ती रक्कम म्हणजे बचत! बचतीचे हे सूत्र कोणत्याही बाबतीत लागू पडते, पैसा असो, वेळ असो, अन्न धान्य असो की पाणी असो, बचत सर्वव्यापी आहे.

Add a heading 7

बचतीची सुरुवात कशी करावी : 

1. तुमच्या खर्चाची नोंद करा

पैसे वाचवण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या खर्चाची तुम्हाला चांगली जाणीव असणे. लोक पुरेशी बचत करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे खर्च केल्यानंतर फारसा पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे तुम्ही एका विशिष्ट महिन्यात खर्च केलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. 

2. कर्ज नियोजन

जेव्हा तुमचे उत्पन्न कमी असते तेव्हा कर्ज सामान्यतः अटळ असते. तुमच्यावर एकूण किती कर्ज आहे, ते कर्ज तुम्ही किती दिवसात आणि कसे फेडणार आहात याचा आराखडा तुमच्याकडे आधीच तयार असणे आवश्यक आहे. नियोजन केलेले असेल तर त्या कर्जाचा अतिरिक्त ताण न येता सुलभरित्या तुम्ही त्या कर्जाची परतफेड करू शकाल.

3. बजेट तयार करा

तुमचा पैसा कुठे जात आहे हे एकदा तुम्हाला कळले की, तुम्ही तुमच्या पैशांचे वाटप कसे करायचे यावर विचार  करून निर्णय घेऊ शकता. आपण प्रत्येक खर्चाचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. घरभाडे, कर्ज यांसारखे निश्चित खर्च आहेतच; पण जेवण, वाहतूक आणि मनोरंजन यांसारख्या खर्चांवर नियंत्रण ठेवता येवू शकते. 

4. मोठी बचत करण्यासाठी लहान प्रारंभ करा

तुमच्या करिअरच्या सुरुवातीला तुमचे उत्पन्न फारसे जास्त नसेल. बर्‍याच वेळा, सर्व खर्चानंतर खूप कमी गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम उरते. तरीही जमेल तेवढी बचत करत जा. तुम्ही केलेली छोटी सुरुवातच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. जसजसे उत्पन्न वाढते तसतसे गुंतवणुकीचे प्रमाण वाढवता येते.

5. बचतीची उद्दिष्टे सेट करा

बचत उद्दिष्टे सेट केल्याने प्रारंभ करणे खूप सोपे होते. प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे ठरवून सुरुवात करा.

काही अल्प-मुदतीची  उद्दिष्टे (ज्याला साधारणत: 1-3 वर्षे लागू शकतात) उदा. नोकरी गमावल्यास किंवा इतर आणीबाणीच्या परिस्थितीत 6 महिने ते एक वर्षाचा खर्च करण्यासाठी आणीबाणी निधी, सुट्टीसाठी पैसे वाचवणे, नवीन खरेदी करण्यासाठी बचत करणे.

दीर्घकालीन बचत उद्दिष्टे अनेक वर्षे किंवा अगदी दशके लांब असतात आणि त्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो : निवृत्तीसाठी बचत करणे, तुमच्या मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे टाकणे, दुसऱ्या घरासाठी बचत करणे किंवा तुमच्या सध्याच्या घराचे नूतनीकरण करणे.

6. तुमचे प्राधान्यक्रम ठरवा

तुम्हाला करावयाच्या प्रत्येक गोष्टीची प्राथमिकता ठरवा. कोणती गोष्ट जास्त गरजेची आहे तिला आधी प्राधान्य द्या. कमी आवश्यक असणाऱ्या बाबी नंतर ठेवा. तुमची उद्दिष्टे ठरवा आणि ती कोणत्या क्रमाने तुम्हाला साध्य करायची आहेत याचे नियोजन करा.

शिक्षण, घर, वृद्धापकाळ अशा कोणत्याही कारणासाठी तुम्हाला पैसा लागणार नसेल तरीसुद्धा निदान तुमच्या आत्मविश्वासासाठी तरी तुम्ही बचत ही केलीच पाहिजे. तुम्ही किती ताठ मानेने चालता याच्याशी तुमच्या बचतीच्या स्थितीचा खूप जास्त संबंध आहे. तुमच्या बचतीच्या स्थितीवरून तुमची समाजातील पत ठरणार हे मात्र नक्की !

हे पण वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button