कमी जोखीम, जास्त फायदा! : बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड


आजच्या गुंतवणूकदारांची हीच अपेक्षा असते. आयुष्यात आपण घर, शिक्षण, भविष्य यासाठी नियोजन करतो, पण पैशांसाठी योग्य नियोजन नसेल, तर ही स्वप्नं अपूर्ण राहू शकतात. बदलत्या आर्थिक परिस्थितीत गुंतवणूक करताना सुरक्षितता आणि वाढ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळेच आजकाल म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय बनला आहे. तरीही, अनेक गुंतवणूकदार शेअर मार्केटमधील चढ-उतारामुळे घाबरतात. “नफा होईल का?” किंवा “तोटा तर होणार नाही ना?” अशा शंका त्यांच्या मनात असतात. अशा वेळी एक संतुलित आणि स्मार्ट पर्याय म्हणजे *बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड*.
बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड म्हणजे काय? (What is a Balanced Advantage Fund?)
हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे, ज्यात तुमचे पैसे इक्विटी (शेअर्स) आणि डेट (कर्जरोखे) या दोन्हीमध्ये गुंतवले जातात. यालाच डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड असेही म्हणतात. या फंडाची खासियत म्हणजे तो मार्केटच्या परिस्थितीनुसार आपोआप गुंतवणुकीचे प्रमाण बदलतो. हे सोप्या उदाहरणातून समजून घेऊया, जसे गिअर असलेली सायकल चढावर हळू आणि उतारावर वेगाने चालते, तसेच हा फंड मार्केटनुसार आपली रणनीती बदलतो. जेव्हा मार्केट तेजीत असतो, तेव्हा फंड इक्विटीमधील गुंतवणूक कमी करून डेटमध्ये वाढ करतो, जेणेकरून रिस्क कमी राहते. आणि जेव्हा मार्केट मंदीत असतो, तेव्हा स्वस्तात मिळणाऱ्या शेअर्समध्ये जास्त गुंतवणूक करून भविष्यातील नफा वाढवण्याचा प्रयत्न करतो.
बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडाचे फायदे (Advantages of a Balanced Advantage Fund)
या फंडाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला सतत मार्केटवर लक्ष ठेवण्याची गरज नसते. फंड मॅनेजर तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतो. त्यामुळे गुंतवणूक अधिक सोपी आणि टेंशन फ्री होते. दुसरे म्हणजे, हा फंड तुमच्या गुंतवणुकीला स्थिरता देतो. मार्केटमधील मोठ्या चढ-उतारांमध्येही तुमचा पोर्टफोलिओ बाकी गुंतवणूकदारांच्या तुलनेने सुरक्षित राहतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. तिसरे म्हणजे, बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडावर मिळणारा नफा हा इक्विटी फंडाप्रमाणेच करासाठी गणला जातो, ज्यामुळे कराचा भार तुलनेने कमी होतो.
कर रचना (Taxation)
- २०२४ च्या बदलांनुसार, या फंडावरील कररचना स्पष्ट आहे.
- १ वर्षाच्या आत गुंतवणूक काढल्यास नफ्यावर २०% (Short-Term Capital Gains-STCG) कर लागतो.
- १ वर्षानंतर काढल्यास, १.२५ लाख रुपयांपर्यंतचा नफा करमुक्त असतो. त्यापेक्षा जास्त नफ्यावर १२.५% (Long-Term Capital Gains-LTCG) कर लागतो.
- लाभांश (Dividend) हा तुमच्या उत्पन्नात जोडला जातो आणि त्यानुसार कर आकारला जातो.
योग्य फंड कसा निवडावा?
फंड निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, फंडाची मागील कामगिरी तपासा. वेगवेगळ्या मार्केट परिस्थितीत त्याने कसा परफॉर्म केला आहे, हे पाहणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, Expense Ratio कमी असलेला फंड निवडा, कारण याचा थेट परिणाम तुमच्या परताव्यावर होतो. तिसरे म्हणजे, फंडाचे व्यवस्थापन आणि त्याखालील एकूण मालमत्ता याचाही विचार करा.
थोडक्यात सांगायचे झाले तर, बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड हा तुमच्या गुंतवणुकीचा ‘ऑटोमॅटिक गिअर’ आहे. मार्केटमधील चढ-उतारांमध्येही तो तुमची गुंतवणूक संतुलित ठेवतो आणि स्थिर परतावा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना कमी जोखीम घेऊन चांगला परतावा हवा आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. म्हणजेच “सापही मरावा आणि काठीही तुटू नये” अशी गुंतवणूक करायची असेल, तर बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड नक्कीच विचारात घ्या.
टीप: गुंतवणूक करणे हे बाजारपेठेतील जोखमींच्या अधीन आहे. कृपया कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा (Financial Adviser) सल्ला नक्की घ्या.
आणखी वाचा :




