बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा
पूर्वीच्या काळात नावारुपाला येण्यासाठी जगावेगळं काहीतरी करून दाखवावं लागायचं. एखाद्या क्षेत्रात यशस्वी होऊन दाखवावं लागायचं. मात्र, आता हे सर्व सोप्पं झालं आहे. सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्धी मिळवणं खूप अवघड राहिलं नाही. डान्स व्हिडिओ बनवून किंवा कुणाचीही नक्कल करून लोकं रातोरात प्रसिद्धी झोतात आल्याचे आपण पाहत आहोत. काही लोकं अशीही आहेत, जी फक्त चहा विकून जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्यापैकीच एक आहे डॉली चायवाला. डॉली चायवाला हा बऱ्याच लोकांना माहिती असेल. मात्र, ज्यांना तो माहिती नाही, त्यांना या लेखातून नक्कीच समजेल.
‘डॉली चायवाला’ (Dolly Chaiwala) हा बहाद्दर त्याच्या चहा बनवण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या स्टॉलचे नाव ‘डॉली की टपरी’ (Dolly Ki Tapri) असे आहे. याच नावाने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक भारतीयांसोबतच परदेशी व्यक्तीही डॉली चायवालासोबत व्लॉग बनवताना दिसतात. मात्र, यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचं कारण जरा वेगळं आहे.
डॉली चायवाला याने कुठल्याही साध्या सुध्या नाही, तर चक्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील असलेले अब्जपती आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना चहा पाजला आहे. “वन चाय प्लीज” म्हणत बिल गेट्स ‘डॉली की टपरी’वर चहा पिण्यासाठी हजर झाले होते आणि डॉलीचा चहा पिऊन तेदेखील त्याचे दीवाने झाले. खुद्द बिल गेट्स यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही भारतात प्रत्येक ठिकाणी इनोव्हेशन पाहू शकता. अगदी साधा चहा बनवतानाही.”
आता हा व्हिडिओ जगभरात आगीसारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ६ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि ४५ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, ११ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोण आहे डॉली चायवाला?
माध्यमांतील वृत्तांनुसार, डॉली चायवाला नागपूरच्या सदर भागातील वीसीए स्टेडिअमजवळ ‘डॉली की टपरी’ नावाने चहाचा स्टॉल चालवतो. डॉली चायवाला सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. नागपूरमध्ये लोक दूरहून या प्रसिद्ध चहावाल्याच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी हजेरी लावतात. डॉली चायवाल्याविषयी बोलायचं झालंं, तर त्याचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. तो आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने चहा विकून सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. त्याचे इंस्टाग्रामवर १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
डॉली चायवाला एवढा प्रसिद्ध आहे तरी का?
चहाच्या दुनियेत डॉली चायवाला हे नाव आता छोटे राहिले नाहीये. त्याच्या अनोख्या पेहरावासोबतच त्याच्या चहा देण्याच्या टेक्निकमुळे त्याची तुलना चक्क आयकॉनिक, दिग्गज हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपशी केली जाते. त्याच्या ट्रेंडी सेटअप आणि चहा बनवण्याच्या आकर्षक पद्धतीमुळे तो एक सेन्सेशन बनला आहे. स्टायलिश ग्लासेसमध्ये चहा देण्यापासून ते सिगारेट आणि टॉफी क्रिएटिव्ह पद्धतीने देण्यापर्यंत, डॉलीची टपरी नेहमीच चहाच्या शौकिनांनी गजबजलेली असते.
लोकांच्या प्रतिक्रिया
जेव्हा डॉली चायवाल्याचा बिल गेट्स यांच्यासोबतचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला, तसा अनेक लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला. अनेकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या की, “मला वाटते की, हे एआय जनरेटेड आहे.” एकाने असेही म्हटले की, “हा डीपफेक आहे का?” दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटले की, “सर, तुमचे बिल ५६७८९० डॉलर्स इतके झाले.” आणखी एकाने कमेंट केली की, “डॉली चायवाला नाही, तर इंडियन जॅक स्पॅरो.”
बिल गेट्स यांचा भारत दौरा
खरं तर, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी २८ फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये मायक्रोसॉफ्टच्या भारत विकास केंद्राचा दौरा केला होता. याच ठिकाणी हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ शूट करण्यासाठी डॉली चायवाल्याला बोलावण्यात आले होते. डॉलीचा भाऊ शैलेश याने माध्यमांशी बोलताना या गोष्टीचा खुलासा केला. शैलेशनुसार, डॉलीला कोलॅबरेशन व्हिडिओ शूट करण्यासाठी बिल गेट्स यांच्या ऑफिसकडून बोलावण्यात आले होते. शैलेशने हा संपूर्ण नागपूरसाठी गौरवाचा क्षण असल्याचे सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे, डॉलीला हे माहितीच नव्हते की, आपण कुणाला चहा पाजला आहे. तो जेव्हा नागपूरमध्ये परतला, तेव्हा त्याला त्याच्या मित्रांनी जाणीव करून दिली. तेव्हा कुठे डॉलीला समजले की, आपण कुठल्याही साध्या सुध्या व्यक्तीला नाही, तर बिल गेट्स यांना चहा पाजला आहे. एका रिपोर्टरने डॉलीला विचारले की, त्याला आता कोणाला चहा पाजायचा आहे? यावर डॉलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. आता नरेंद्र मोदी डॉली चायवाल्याच्या चहाचा आस्वाद घेतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.