उद्योजकताबिझनेस स्टोरीझ

जिद्दीला सलाम! 50 लाखांचे लोन घेऊन शून्यातून हजारो कोटींचे साम्राज्य उभे करणारा बहाद्दर, रंजक स्टोरी वाचाच

शून्यातून भलंमोठं साम्राज्य निर्माण करण्याची धमक आपल्याकडे असायला पाहिजे. अशीच धमक टीएस कल्याणरमन यांच्यात होती. त्यामुळेच त्यांची आज फक्त भारतातच नाही, तर जगात ख्याती पसरली आहे. एक काळ होता, जेव्हा त्यांनी कर्ज काढून स्वतःचं ज्वेलरी शॉप सुरू केले होते. मात्र, आज तोच एक प्रचंड मोठा ब्रँड बनला आहे. आज त्यांचे ज्वेलरी दुकानं एका शहरापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण देशात पाहायला मिळत आहेत.

आम्ही ज्या ज्वेलर्सबद्दल बोलत आहोत, ते इतर कोणी नसून कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers) आहे. कल्याण ज्वेलर्स हे नाव, गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वांनीच ऐकले असेल. कल्याण ज्वेलर्सचे संस्थापक टीएस कल्याणरमण (TS Kalyanraman) यांची एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याची कहाणी वेगळी आणि प्रेरणा देणारी आहे. कल्याणरमण यांनी शून्यातून सुरुवात करून यशाचे शिखर गाठले आहे. चला तर, त्यांच्या रंजक प्रवासाविषयी जाणून घेऊयात.

व्यापारी कुटुंबात जन्म

अब्जपती लोकांच्या पंक्तीत विराजमान झालेल्या टीएस कल्याणरमण यांचा जन्म भारत देश स्वतंत्र होण्याच्या चार महिन्यांपूर्वी म्हणजेच २३ एप्रिल १९४७ रोजी केरळच्या त्रिशूर येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना व्यवसायाचे बाळकडू बालपणीपासूनच मिळाले होते. त्यांचे वडील टीआर सीतारामय्या कपड्याचे व्यापारी होते. तसेच, कल्याणरमण यांचे आजोबा हे पुजारी होते. मात्र, नंतर त्यांनी व्यवसायात उडी घेतली होती. रंजक बाब अशी की, कल्याणरमण हे अवघ्या १२ वर्षांच्या वयातच आपल्या वडिलांसोबत त्यांच्या दुकानात मदतीसाठी जायचे. तिथेच त्यांनी व्यवसायाची बाराखडी शिकली होती. मात्र, शालेय शिक्षणही तितकेच गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी केरळच्या श्री केरळ वर्मा कॉलेजात ऍडमिशन घेतले आणि याच कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली.

कर्ज घेऊन सुरू केला व्यवसाय

हा व्यवसाय ५ भावांमध्ये विभागला होता. त्यांना ज्वेलरी शॉप्सने भरलेल्या त्रिशूरच्या मार्केटमध्ये कपड्यांचे दुकान मिळाले होते. मात्र, आजूबाजूच्या दुकानांपासून प्रेरित होऊन त्यांनी आपल्या पारंपारिक कौटुंबिक व्यवसायातून काढता पाय घेतला. गाठीशी २५ लाखांची बचत होती; मात्र, ज्वेलरी शॉप सुरू करण्यासाठी एवढे रुपये पुरेसे नव्हते. त्यासाठी त्यांनी बँकेकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्याकडे ७५ लाख रुपये जमा झाले होते. याच रक्कमेतून त्यांनी त्रिशूरमध्ये १९९३साली एक ज्वेलरी शॉप सुरू केले. हीच ती कंपनी, जिला आज संपूर्ण जग कल्याण ज्वेलर्स म्हणून ओळखते.

The inspiring story of T.S. Kalyanaraman

एकदम सोपी होती आयडिया

आपल्या व्यवसायात पारदर्शकता ठेवण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली. जुन्या पारंपरिक बुकलेट्सचा वापर न करता त्यांनी ग्राहकांसाठी जी ज्वेलरी दुकानात ठेवली होती, त्यासोबत त्यांची मूळ किंमतही लावली. कल्याणरमन यांनी व्यवसायात उतरण्यापूर्वी ज्वेलरीची जी दुकानं पाहिली होती, ती खूपच छोट्याशा जागेत असल्याचे त्यांनी हेरले होते. यामुळे आपले वेगळेपण सिद्ध करायचे तर आपण व्यवसायात उतरताना, आपले दुकानही तितकेच प्रशस्त असायला हवे, हे त्यांनी ठरवले. त्यांनी सुरुवातीला तब्बल ४००० स्क्वेअर फूट जागेवर मोठे दुकान सुरू केले. ज्यामुळे लोकांना ज्वेलरी खरेदी करताना रियल-टाईम अनुभव मिळेल. विशेष म्हणजे, त्यांनी लढवलेली ही शक्कल यशस्वी ठरली.

पहिल्या वर्षाच्या अखेरपर्यंत कल्याण ज्वेलर्सने ३० लाख रुपयांचा सेल केला होता. त्यांच्या दुकानात लोकांना प्रीमिअम अनुभव घेता येत होता. कारण, त्यांनी एसी, स्वच्छ टॉयलेट्स आणि पार्किंगच्या सुविधाही उपलब्ध केल्या होत्या. यानंतर त्यांनी पल्लकड येथे आणखी एक ४००० स्क्वेअर फूटाचे दुकान सुरू केले. मात्र, यावेळी त्यांना एक गोष्ट शिकायला मिळाली, जी त्यांना यापूर्वी माहितीदेखील नव्हती. खरं तर, त्रिशूर आणि पल्लकडमधील ५६ किमीच्या परिघातही दागिन्यांची वेगळी बाजारपेठ होती. म्हणून, त्यांनी हायपर-लोकल टचवर लक्ष केंद्रित केले आणि पल्लकडमधील आपले ज्वेलरी शॉप यशस्वी करून दाखवले.

How T.S. Kalyanaraman built a jewelry giant

दशकभरात सुरू केली ३२ दुकाने

सन १९९८मध्ये कोयम्बतूर बाँब ब्लास्ट झाला आणि त्यांना आपला व्यवसाय पल्लकडच्या सीमेजवळील शहरात शिफ्ट करावा लागला. कल्याणरमण यांना वाढती मागणी हाताळण्यासाठी राज्यात अनेक दुकाने सुरू करायची होती. २०१२ साल उजाडताच त्यांनी केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे दागिण्यांची ३२ दुकाने सुरू केली. पाहता पाहता कल्याण ज्वेलर्स दक्षिण भारतातील स्टार ब्रँड तयार झाला.

दक्षिण भारताबाहेर विस्तारला व्यवसाय

बीआयएस प्रमाणपत्रासह १०० टक्के प्युअर सोने विकणारा पहिला ब्रँड असणाऱ्या कल्याण ज्वेलर्सने दक्षिण भारताबाहेरही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. यासाठी त्यांनी २०१२मध्ये अहमदाबाद येथे आपले दागिण्यांचे दुकान सुरू केले. यावेळी त्यांनी मोठा डाव खेळला. त्यांनी ‘माझे सोने, माझा हक्क’ (My Gold, My Right) या कँपेनसह महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आपला ब्रँड अँबेसेडर बनवले.

How T.S. Kalyanaraman built a jewelry giant

कँपेनमुळे बनला ५ हजार कोटींचा ब्रँड


अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या या कँपेनमुळे कल्याण ज्वेलर्स ५ हजार कोटी रुपयांचा ब्रँड बनला. एवढंच नाही, तर तब्बल ९० कोटी मार्केटिंग बजेटसह बॉलीवूड इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेत्री कॅटरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन आणि इतर सेलिब्रिटींसोबत करार केला. यानंतर कल्याणरमणजींनी पहिल्यांदा देशाबाहेर झेप घेतली. त्यांनी २०१३ मध्ये यूएईमध्ये फक्त एकाच दिवसात आपली ६ दुकाने सुरू केली.

कल्याण ज्वेलर्सने हायपर लोकल दृष्टिकोन ठेवत आणि वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वेगवेगळ्या ज्वेलरीही लाँच केल्या आहेत. त्यात मुहुरत या वेडिंग ज्वेलरी आणि अनोखी, झिया, तेजस्वी या डायमंड ज्वेलरींचा समावेश आहे. यामुळे त्यांच्या प्रगतीत वेगाने वाढ होत आहे. 2020पर्यंत कल्याण ज्वेलर्सने आपला व्यवसाय 140 दुकानांपर्यंत नेला आणि तब्बल १० हजार कोटी रुपयांची कंपनी बनण्याचा बहुमानही मिळवला.

शेअर मार्केटमध्ये प्रवेश

कल्याण ज्वेलर्स कंपनीचा IPO २६ मार्च, २०२१मध्ये NSE आणि BSE लिस्ट झाला. ही कंपनीची सर्वात मोठी भरारी ठरली. स्टॉक मार्केटला लिस्ट झाल्यानंतर कल्याण ज्वेलर्सने टाटासारख्या बलाढ्य पाठबळ असलेल्या टायटन आणि पीसी ज्वेलर्सलाही टक्कर दिली. सध्या कल्याण ज्वेलर्सच्या शेअरची किंमत 339 रुपयांपेक्षा जास्त आहे.

कल्याण ज्वेलर्सचे बाजारमूल्य

आज घडीला टीएस कल्याणरमण हे भारतातील सर्वात श्रीमंत ज्वेलर मानले जातात. कल्याण ज्वेलर्सने मागील वर्षी ४३२ कोटींच्या नफ्यासह १४०७१ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. विशेष म्हणजे, कल्याण ज्वेलर्स हा ब्रँड किती मोठा आहे याचा अंदाज त्यांच्या एकूण दुकानांच्या संख्येवरूनच येतो. सध्या संपूर्ण भारत आणि यूएईत कल्याण ज्वेलर्सचे तब्बल २०० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

How T.S. Kalyanaraman built a jewelry giant

या लेखाचा शेवट करताना टीएस कल्याणरमण यांच्याविषयी आणखी एक खास गोष्ट सांगावीशी वाटते. ती अशी की, वयाची सत्तरी (७३) पार करूनही कल्याणरमण आजही दर महिन्याला कोणत्याही १५ ग्राहकांना फोन करतात. तसेच, त्यांच्याकडून आपल्या दागिन्यांविषयी प्रतिक्रिया जाणून घेतात. यावरूनच समजते की, कल्याणरमण हे ग्राहकांशी आणि आपल्या व्यवसायाशी किती प्रामाणिक आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button