व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?
जगात आजपर्यंत जेवढ्या गोष्टी निर्माण झाल्या त्या केवळ कल्पनेतूनच झाल्या. या कल्पनेच्या जोरावर त्या कल्पनेच्या जन्मदात्याने कार्य करायला सुरुवात केली. कोणताही अनुभव नव्हता, तरीही ते यशस्वी झाले. कारण, एकदा कल्पना करणे हाच एक वेळचा अनुभव असतो. मिकी माऊसचा जन्मदाता वॉल्ट डिस्नेने डिस्ने वर्ल्ड बनवण्याचा निर्णय घेतला.
जगातले सर्वात मोठे Amusement Park वॉल्टला बनवायचे होते. त्यासाठी लागणारी अब्जावधीची संपत्ती वॉल्टने उभी केली व जगात त्याआधी कधीच झाले नाही ते घडवण्याचा प्रकल्प सुरु केला. त्याचा भाऊ रे डिस्ने त्याच्यासोबत होता. या प्रकल्पाचे काम चालू असतानाच वॉल्ट डिस्नेला या जगाचा निरोप घ्यावा लागला.
रे डिस्नेने या प्रकल्पाचे काम पुढे चालू ठेवले. जगप्रसिध्द Disneyland तयार केले. तेव्हा पत्रकारांनी रे डिस्नेला एक प्रश्न विचारला तो म्हणजे, “हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहायला वॉल्ट असायला हवा होता असे तुम्हाला वाटत नाही का?” त्यावेळी रे डिस्नेने पत्रकाराला दिलेले उत्तर हे आजच्या लेखाचे उत्तर आहे. रे या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, “मित्रहो, वॉल्टने हा प्रकल्प पूर्ण झालेला कित्येक वेळा पाहिला आहे. आज आपण जे पहात आहोत; ते वॉल्टने कित्येक वेळा पाहिले म्हणून हे साकारले.”
खरोखरच डिस्नेलँडने पर्यटन व्यवसायातले सगळे विक्रम मोडून काढले. व्यवसाय करताना उद्योजक जे स्वप्न पाहतो, ते साकारण्यासाठी प्रयत्न करतो, तोच खरा अनुभव असतो. अनुभव हा विकत मिळत नाही किंवा तो इतरांकडून उसणवारही घेता येत नाही. तो मिळवावा लागतो. तो प्रत्यक्ष काम केल्यानेच मिळतो. अबांनींसारखे उद्योजकही त्यांच्या मुलांना त्यांचा अनुभव देऊ शकत नाहीत. ते फक्त मार्गदर्शन करु शकतात. त्यांच्या मुलांनाही अनुभव घ्यावाच लागतो.
ठराविक कामाचा अनुभव घ्यायचा झाल्यास काही मार्ग अजून आहेत. त्यामध्ये वाण्याचा मुलगा दुकानात बसून आर्थिक व्यवहार त्याच्या सवयीचे करुन घेतो. वाण्याची गिऱ्हाईकांशी बोलण्याची कला आत्मसात करुन घेतो. मारवाडी, गुजराती माणसाला या गोष्टींचे निरीक्षण करण्याची व त्याचे आकलन करण्याची संधी घरातच मिळत असते. हा अनुभवाचाच भाग असतो, संपूर्ण अनुभव नव्हे. आता ज्याला हे वातावरण मिळत नाही. अशा आपल्यासारख्या मराठी माणसाला हा अंशत: अनुभव मिळवण्याचे काही मार्ग आहेत त्यावर एक नजर टाकूयात. या मार्गाचा अवलंब केल्यास आपण वर वर्णन केलेल्या मुलांपेक्षा काहीशा जास्त वेगाने तेवढाच अनुभव कमी वेळात प्राप्त करुन घेऊ शकतो.
यशस्वी उद्योजकांची आत्मचरित्रे व चरित्रे वाचणे, त्यात असणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांची नोंद करुन ठेवणे. हा अतिशय चांगला मार्ग होऊ शकतो व ह्या नोंदीची नोंदवही कायम सोबत ठेवणे, कारण ती तुम्हाला कायमस्वरुपी मार्ग दाखवणारे होकायंत्र बनू शकते. आपल्या आसपास असणाऱ्या व आपण ज्या क्षेत्रात उद्योग करणार आहोत, त्या क्षेत्रात उद्योग करत असलेल्या लहानमोठ्या उद्योजकांना शुभेच्छा देणे व त्यांना त्याच्या यशाचे रहस्य विचारणे. आपण पुढे जाऊन तो व्यवसाय करणार असल्याची कल्पना देऊन सुरुवातीला येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करताना घ्यावी लागणारी काळजी याबाबत विचारणा करणे फायदेशीर ठरु शकते.
Youtube वर अशा अनेक उद्योजकांनी केलेली भाषण उपलब्ध आहेत, ती लक्षपूर्वक ऐकणे व त्यातील महत्वाच्या नोंदी करुन ठेवणे. काही भाषणं डाऊनलोड करून मोबाईलमध्ये घेऊन येताजाता प्रवास करताना ऐकल्यासही नवे अनुभव सहज घेता येतात. प्रत्येक उद्योजकांनी हे अनुभव मिळवण्यासाठी वाचावे असे एक पुस्तक म्हणजे – How I raised Myself from Failure to Success in Selling. हे पुस्तक फ्रँक बैटगर यांनी लिहलेले असून याची मराठी आवृत्ती (मी अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसे पोहोचलो?) गोयल प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. याच बरोबर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC of India) मध्ये एकदोन वर्षे काम करणेसुध्दा फायदेशीर ठरेल. कारण इथे कामाच्या वेळेची मर्यादा नसते व उत्तम उत्पन्न (चांगले पैसे) मिळते. आपल्याला व्यवसाय शिकण्यासाठी वेळ मिळतो.
अनुभव घेण्याचा अजून एक मार्ग म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायातील यशस्वी माणसाचा सहाय्यक (Assistant/Helper/Driver) म्हणून वर्षभर काम करणे हा होय. या माणसांचा सहवास लाभेल असे कोणतेही काम तुम्ही स्वीकारा. एका वर्षाने तुम्हाला जी अनुभवाची शिदोरी मिळेल ती एमबीए केलेल्या तरुणाहून सरसच असेल. या सर्व पध्दतीतून अनुभवसंपन्न झाल्यावर आपण प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करत आहोत.
पहिला भाग येथे पूर्ण होत आहे. या भागाचा अभ्यास (Practical and Theory) करणाऱ्या माणसाला यशस्वी उद्योजक होण्यापासून जगातली कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. तो उद्योजक होणारच.
- अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती