करिअरपरदेशातील शिक्षण

आकाशी झेप घे रे पाखरा… परदेशी शिक्षण

पारंपरिक शिक्षणाची चौकट मोडून परदेशगमन करणे हा जणू सध्याचा ट्रेंडच झाला आहे. हे सर्व होत असताना नाण्याची दुसरी बाजूसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे, या आणि अशा ट्रेंडचा फायदा आणि गैरफायदा घेणारेसुद्धा अनेकजण आपल्याला दिसतील त्यासाठी अनेक गोष्टींचा नीट बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे.

सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतातील प्रमाण गेल्या अनेक वर्षांमध्ये वाढलेले दिसते. नेमकी अशी काय कारणं आहेत ज्यामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसत आहे. तर याचा थोडा सविस्तर विचार केला असता आपल्या हे लक्षात येईल की भारतातील शिक्षणपद्धती आणि परदेशातील शिक्षणपद्धती यामध्ये असणारा सगळ्यात मोठा फरक. परदेशात मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे परदेशाबद्दल भारतीय लोकांच्या मनात असलेले आकर्षण. खरंतर फक्त पाठयपुस्तकी ही शिक्षण पद्धत परदेशात मूळातच शिकवली जात नाही.

संशोधन वृत्तीने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्यात आपण आपले मत बनवत ज्ञानार्जन करायचे अशी शिक्षण पद्धत परदेशात पाहायला मिळते. तसेच परदेशात शिक्षण घेत असताना तुम्ही तुम्हाला जो हवा तो कोर्स निवडू शकता आणि त्याचे संपूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला परदेशात मिळते. भारतात अजून अशा प्रकारची स्थिती फार कमी ठिकाणी पाहायला मिळते.

सर्वसामान्यपणे SAT, MCAT, LSAT, GMAT, GRE, IELTS आणि TOEFL अशा काही प्रवेश परीक्षा आहे ज्या तुम्हाला चांगल्या मार्काने पास करणे गरजेचे आहे. तसेच त्या त्या विद्यापीठाच्या याव्यतिरिक्त जर काही परीक्षा असतील, तर त्या सुद्धा नीट समजून घ्याव्या लागतील. परदेशात शिक्षण म्हणजे पहिला डोळ्यासमोर प्रश्न उभा राहतो तो आर्थिक. अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची ही बाजू आहे. एकदा ठिकाण नक्की झाले की त्या ठिकाणाचे चलन आणि त्याची तुलना भारतीय रुपयासोबत केली असता साधारण अंदाजे खर्च आपण काढू शकतो.

आर्थिक बाजू फार मोठी वाटत असली, तरी अनेक परदेशी विद्यापीठे यासाठी शिष्यवृत्तीदेखील पुरवतात. हे सर्व करताना आपण मात्र चोखंदळपणे नीट सगळ्याचा अभ्यास करून परदेशी शिक्षणाचा पर्याय निवडणे गरजेचे आहे.

परदेशात शिक्षणासाठी वाढणारी मागणी पाहून अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. खूप प्रकारची आमिषं दाखवून फसवणूक केली जाते या सगळ्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. फक्त परदेशात शिक्षण घेणे हा उद्देश न ठेवता त्यासोबतच नोकरीची त्या देशातील संधी पाहणे हे खूप गरजेचे आहे.

अगदी शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे नक्की करता तेव्हा तुमचे ठिकाण पक्के झाल्यानंतर ज्या देशात आणि ज्या शहरात तुम्ही शिक्षण घेणार आहात, काही वर्षे राहणार आहात; तेव्हा त्या शहराची आणि देशाची संपूर्ण माहिती, कायदे आणि जीवनपद्धतीचा काही प्रमाणात अभ्यास करून जाणे गरजेचे आहे. जेणेकरून तिथे गेल्यानंतर तुम्हाला कमीतकमी अडचणींचा सामना करावा लागेल.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण पहा
Close
Back to top button