उद्योजकता विजडमलेखमालिका

जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील

इतिहास काय सांगतो, ‘जे तलवारी चालवतील, ते तलवारीने मरतील, जे डोकं चालवतील, ते जगावर राज्य करतील; तसेच जे तराजू चालवतील, ते संपत्ती कमवतील.’ मित्रहो, आजही तेच दिसतंय. पुस्तकं वाचणारे बुद्धीवादी सरकारमध्ये आहेत, तराजूवाले त्यांना पैसे पुरवतात आणि तलवारीची भाषा करणारे अजून मोर्चे व आंदोलन करत आहेत. यात मराठी माणूस कुठे आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तराजूवाले, आज देशातील उद्योग क्षेत्रात मुख्यतः यांचेच वर्चस्व दिसून येते, कारण हे लोक पिढ्यानपिढ्या उद्योग क्षेत्रात आहेत. स्वतःचा उद्योग कसा यशस्वी करायचा, याचाच विचार ते करतात आणि परिणामी ते यशस्वी होतात. त्यांची मुलेदेखील याच क्षेत्रात येताना दिसतात. हे पिढ्यानपिढ्या चालू राहणार. यात मराठी माणसे आहेत ती केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी.

आजकाल सोशल मीडियावर आपण शिवाजी महाराजांबद्दल पोस्ट टाकून आपण मराठी असल्याचे अभिमानाने सांगतो. स्वतःला त्यांचे वारस समजतो; परंतु शिवरायांनी नुसती तलवार नाही चालवली, तर बुध्दी चालवली. त्यांचे राजकीय डावपेच आणि गनिमी काव्यापुढे त्यांचे सर्व शत्रू हतबल झाले होते हे विसरू नका. केवळ आपली बुध्दी व दूरदृष्टीच्या साहाय्याने त्यांनी इतिहास घडवला. आजही त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणून संबोधले जाते. हा इतिहासाचा भाग आतातरी मराठी तरुणांना समजेल का? अनेकांच्या व्हॉटसअप प्रोफाईलवर तलवारीचा फोटो असतो, तेव्हा असे वाटते की अजून यांच्या डोक्यात तलवारच आहे. त्यांच्या डोक्यात बुध्दी आणि पैसा यावा हीच शिवरायांचरणी प्रार्थना.

आज तलवारीपेक्षा पैशाची धार जास्त आहे. ज्याच्याजवळ पैसा त्याचीच जास्त पॉवर. यामध्ये बहुतांशी उद्योजक आहेत. आज मराठी तरुणांनी देखील उद्योग क्षेत्रात उतरणे गरजेचे झाले आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर यश मिळवण्यासाठी केलात, तर तुमचेच भले होईल. आपल्याकडे एक म्हण आहे, “उद्योगीला महापूर, आळश्याला गंगा दूर.”

हा लेख विडीयो मध्ये पहा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button