रोज ५ किमी चाला, ५ पाने वाचा व श्रीमंत व्हा!
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजचा विषय आहे; रोज ५ किमी चाला, ५ पाने वाचा व श्रीमंत व्हा! करायची सुरुवात?
जगभरात श्रीमंत व्यक्तींच्या आचरणाचे अध्ययन करण्यात आले, त्यात असे लक्षात आले की, जवळपास सर्व श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती नियमित वाचन करतात, तर गरीब लोक टीव्ही पाहतात व मोबाईलवर टाईमपास करतात. एखाद्या पुस्तकाच्या वाचनाने, त्यातील एखाद्या घटनेने आयुष्यात मोठी प्रेरणा मिळून आपले जीवन बदलू शकते. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतात.
ग्रंथ आमुचे साथी… ग्रंथ आमुच्या हाती…
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या… अंधाराच्या राती…
या ग्रंथांच्या तेजामधुनी, जन्मा येते क्रांती,
ग्रंथ शिकविती माणुसकी अन ग्रंथ शिकविती शांती
निराश जीवा धीर धरूनी पुढे घेऊनी जाती…
वाचन माणसाला विचाराने व कृतीने श्रीमंत करते, त्यामुळे तो शांत राहायला शिकतो. यामुळेच जसे उत्तम शरीरासाठी रोज किमान व्यायाम व दोन वेळचे जेवण लागते, तसे उत्तम बुध्दीसाठी रोज किमान ५ पाने वाचणे आवश्यक आहे. जगात ज्या ज्या व्यक्तींचा विकास झाला तो वाचनामुळेच. टीव्ही, मोबाईलमुळे तर ऱ्हास आणि वाटोळे झाले. मोबाईलच्या व्यसनामुळे अर्धी तरुण पोरं वेडी व ॲडिक्टेड झाली. मोबाईलमुळे झोपेच्या वेळेचे चक्र बिघडून मन अशांत होते.
वाचन करणाऱ्या माणसाची कल्पनाशक्ती विकसित होते व तो नवनवीन गोष्टी शिकत राहतो. तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणारे, तुम्हाला प्रेरणा देणारे, तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंगला (कल्पक विचारशक्ती) चालना देणारे माहितीपूर्ण वाचन करा. राजकीय चिखलफेक, अपघात, बलात्कार, खून मारामाऱ्या, भ्रष्टाचार, आंदोलने, मोर्चे, खंडणी, आत्महत्या अशा संबधी बातम्या व माहिती देणारे वाचन करू नये, त्यामुळे तुमचे मन व विचारही कलुषित होतात.
रोज ५ किमी चालण्याने रक्तदाब, हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. रोज चालायची सवय मेंदूसाठी फायदेशीर ठरते. चालण्यामुळे ताणतणाव कमी होतो. मुडही फ्रेश राहतो. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
त्यामुळे आयुष्यात श्रीमंत व निरोगी होण्यासाठी माणसाने रोज किमान ५ किमी चालावे, किमान ५ पाने वाचावी व पाच वाक्ये लिहावीत आणि मोबाईल व टीव्ही यांचा गरजेपुरताच वापर करून त्यापासून दूर व्हावे, मग बघा श्रीमंती तुमच्या घरी कशी आपोआप चालत येईल.
तुम्ही सध्या कोणतं पुस्तक वाचताय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी नवी अर्थक्रांती चॅनेल आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा