ज्याच्या खिशात पैसा, तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; ज्याच्या खिशात पैसा तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा… करायची सुरुवात?
एक अतिउत्तम जॅकेट शिवणारा व्यावसायिक होता, त्याला नेहमी प्रश्न पडायचा कि “माझे जॅकेट जेमतेम १२०० रुपयांना विकले जाते, पण अशाच दर्जाचे जॅकेट शोरूमला लोक ३००० रुपयांना विकत घेतात. असं का होत असेल? मला ती किंमत का मिळत नाही?” त्याची ही समस्या घेऊन तो व्यावसायिक सल्लागार कदमांकडं आला. तेव्हा कदमांनी त्याला मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट सांगितली.
एकदा नसरुद्दीन खूप सुंदर पगडी घालून राजवाड्यात गेला. राजाला त्याची पगडी आवडली. राजा म्हणाला, “किती रुपयांत पगडी?” नसरुद्दीन म्हणाला, “१ हजार रुपयांना.”
हे बोलणे तेथे असलेल्या व्यापाऱ्याने ऐकले व राजाला त्याने पगडी खूप महाग असल्याचे सांगितले.
राजा म्हणाला, “पगडी खूप महाग आहे.” त्यावर नसरुद्दीन म्हणाला, “ही पगडी बनवायला किती खर्च आला आहे यावरच त्यांची किंमत ठरविली आहे व इतकी चांगली पगडी १ हजार रुपयांना केवळ राजाच घेवू शकतो, गोरगरीबांना ती परवडणारी नाही.”
ह्या वाक्याने राजा खुश झाला व त्याने ताबडतोब १ हजार रुपये देऊन पगडी घेतली. बाहेर आल्यानंतर नसरुद्दीन त्या व्यापाऱ्याला म्हणाला, “तुला ह्या पगडीची किंमत माहीत असेल, पण राजाची प्रशंसा आणि त्याला खुश करण्याची किंमत काय मिळते, हे मला माहीत आहे.”
मित्रहो, आपल्या उत्पादनाला जर चांगली किंमत मिळवायची असेल, तर आपले उत्पादन ज्याच्या खिशात पैसा आहे, त्यालाच विकण्याचा प्रयत्न करावा. दळभद्री लोकांच्या नादी लागू नये. तसेच कोणताही माणूस हा प्रशंसा व मानसन्मानाचा भुकेला असतो. त्यामुळे ग्राहकांची प्रशंसा करायला विसरू नये. तुमच्या उत्पादनाची किंमत ते तुम्ही कुणाला व कशा पद्धतीने विकता यावर अवलंबून आहे. जलद विचार करून ते आपले विचार दुसऱ्याच्या गळी उतरवता आले पाहिजे.
तुम्ही तुमचे उत्पादन कशा प्रकारे विकता? उत्पादन विकताना काही ठराविक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग करता का? करत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आताच सब्स्क्राइब करा.