“अंधश्रद्धेला तिलांजली द्या… विवेक, ज्ञान आणि विज्ञानाचा पाठपुरावा करा…
कष्ट करा, जोखीम उचला, ध्येये बाळगा…
उद्योग करा, पैसा कमवा…!!!”
एकदा एका दुकानदाराने ज्योतिष्याला विचारले की, “माझे दुकान चालत नाही, काय करू?” ज्योतिषी म्हणाला,”ही घे घोड्याची नाल, फक्त ५००० रुपयांना. दुकानावर लाव, मग बघ. दुकान चांगले चालेल.” दुकानदाराने थोडा विचार केला. नाल घोड्याची आहे मग आपण घोड्यालाच विचारले तर? मग तो घोड्याकडे गेला आणि त्याला विचारले,”तुझी नाल दुकानाला लावल्याने माझे दुकान चालेल का?” घोडा हसला आणि म्हणाला,”अरे बाबा, नाल लावून पैसा मिळत असेल तर मी कशाला दिवसभर टांगा ओढला असता? नाल हे प्रतीक आहे, घोड्यासारखं वेगवे धावत पळत राहण्याचं, काम करण्याचं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नव्हता.” कोणत्याही निष्पाप प्राण्याचा बळी न देता स्वतःची करंगळी कापून मंदीरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… देवावर श्रद्धा असूनही महाराजांनी आपल्या गडकिल्ल्यांना कुठल्याही देवाचे नाव दिले नाही, गणपतीचे सुद्धा नाही… अंधश्रद्धेला कधीच प्रोत्साहन दिले नाही. शिवराय कुठेही लिंबू-मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव-देवस्की करत बसले नाहीत. ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले… कोणताही गड जिंकल्यावर तिथे कधीच सत्यनारायण घातला नाही… अमावस्या अशुभ मानली जाते. काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या रात्री व्हायच्या. कारण अंधाराचा फायदा घेण्यासाठी ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत. गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे. शहाजीराजेंच्या मृत्युनंतर माँसाहेब जिजाऊ सती गेल्या नाहीत. तर त्यांच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या. महाराजांचा स्वतःवर, स्वतःच्या बुद्धीवर व मनगटावर पूर्ण विश्वास होता… रायगडावर काम घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेवल्याशिवाय परत पाठवायचे नाही, हा नियम….
हे वाचल्याने तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार नाही, परंतु तुमच्या विचारात आणि जीवनात सकारात्मक बदल करू शकतात… मी आशा करतो की हा लेख वाचून समाजात अंधश्रद्धा निर्मूलन होण्यासाठी प्रबोधन होईंल, लोकं अंधश्रद्धा सोडून स्वावलंबी बनतील आणि खऱ्या श्रद्धेतून उघड्या डोळ्याने सत्य पाहतील. मी बऱ्याच लोकांना पहिले आहे की त्यांनी यशासाठी किंवा आपल्या समस्या सोडवण्यासाठी अंधश्रद्धेचा मार्ग अवलंबला आणि बरबाद झाले. असे तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या बाबतीत होऊ नये हीच माझी भावना आहे. त्यामुळे वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात कोणताही मोठा निर्णय घेताना एकट्याने निर्णय घेऊ नका. चर्चा होणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांशी चर्चा करा, सल्ला घ्या. तर्कशास्त्र सांगणार्या गोष्टी स्वीकारा आणि आपण स्वतःला व इतरांना दिलेल्या आश्वासनांवर ठाम रहा. देव माझ्यासाठी अस्तित्वात आहे. पण ती माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. बरेचजण नकली ज्योतिष्यांकडे जाऊन फसताना मी पहिले आहे. मी या गोष्टीला विरोध करीत नाही परंतु आपले भविष्य सांगणारे लोकसुद्धा काही मोठे विचारवंत नाहीत, जर त्यांना खरोखर काय घडणार आहे हे माहित असते तर त्यांचे स्वतःचे जीवन वेगळे असते. कोणतीही ग्रहांची हालचाल किंवा स्थिती काय होणार आहे, ते ज्योतिषी ठरवू शकत नाही. आपली स्वतःची उर्जा, आपले विचार आणि आपले व्हाइब आपले जीवन बदलू शेतात. आज बाजारात बरेच लोक अंगठ्या आणि रंगीत खडे विकण्याचे धंदे करतात. पण तुमचे आयुष्य कोणतेही अंगठी किंवा खडा बदलू शकणार नाही, ते तुम्हीच बदलू शकाल. मूळ किंवा आधार नसलेल्या अंधश्रद्धांसाठी बळी पडण्याऐवजी आपल्याला आपल्या जीवनात जी ध्येये आणि लक्ष्ये आहेत त्यासाठी उघड्या डोळ्यांनी लढा देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला लक्षाधीश व्हायचे आहे, जर आपण कठोर परिश्रम केले तरच..
आपल्या आवडत्या मुलीशी लग्न करण्याची तुमची इच्छा आहे, पण जर तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहून तिच्यासाठी जगाशी लढा देत असाल तरच… फक्त तुम्हाला तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. संकटकाळात, अडचणींत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अपयश आल्यास स्वतःला दोषी समजण्यात आणि एकटेपणात आपला आपल्याच निर्णयावर विश्वास नसतो; म्हणून लोक केवळ ज्योतिष्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीवर निर्णय घेतात. भविष्यवाणी क्वचितच खरी ठरते; परंतु या नादात ज्या वाईट गोष्टींमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते, त्या गोष्टींवरच आपले लक्ष केंद्रित केले जाते. भविष्य सांगणाऱ्या लोकांना आपल्याबद्दल किंवा आपल्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नसते. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणे थांबवा. लक्षात ठेवा, जगाचा विनाश होणार असा खूप वेळा दावा केला गेला होता, परंतु तसे झाले का कधी? आणि होणारही नाही हे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे. शहाणपणाने आणि तार्किकदृष्ट्या विचार करा.