फंडांचा फंडा नवीन वर्षांतील अपेक्षा
भांडवल बाजार हाच योग्य गुंतवणूक पर्याय असल्याची जाणीव कोविड साथीनंतर भारतीय गुंतवणूकदारांना झाली. सन 2020 मध्ये निर्देशांकाने मागील काही वर्षातील मोठा नीचांक दाखवून त्याच वर्षात नवा उच्चांकही प्रस्तापित केला. त्यामुळेच अनेक नव गुंतवणूकदार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भांडवल बाजाराकडे वळले. म्युचुअल फंड योजना म्हणजे भांडवल बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचे माध्यम.
या योजनांमध्ये नंतरच्या कालावधीत उत्तम परतावा मिळाल्याने गुंतवणूकदारांचे मनोबल वाढले आणि एसआयपीचा ओघ सुरू झाला. याच काळात मिडकॅप स्मॉलकॅप नव्या बावन्न आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचले. भुराजकीय परिस्थिती आणि ट्रम्प यांचे हेकेखोर धोरण यामुळे गेल्या दोन वर्षात बाजारात बरीच पडझड झाली. वाढलेल्या शेअर्सच्या किंमती बऱ्याच खाली आल्या.
निर्देशांकात जास्त वजन असलेले मोजकेच शेअर्स गेले दोन वर्षे शेवटच्या तिमाहीत वाढल्याने निर्देशांकाचा परतावा उत्तम दिसूनही प्रत्यक्षात गुंतवणूकदारांच्या बाजारमूल्यात फारशी वाढ दिसली नाही किंवा त्यात घट झाली आहे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.
गेले काही महिने विदेशी वित्तसंस्था भारतीय बाजारातील गुंतवणूक काढून घेत आहेत. स्वदेशी गुंतवणूक संस्था सातत्याने खरेदी करीत आहेत यात गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास महत्वाचा आहे. यापूर्वी जेव्हा बाजार खाली येत असेल किंवा विदेशी वित्तसंस्था मोठ्या प्रमाणावर विक्री करत असल्यास सर्वसामान्य गुंतवणूकदार घाबरून शेअर्स विकत, आपली म्युचुअल फंडातील गुंतवणूक काढून घेत असत. त्यामुळे बाजार अजून खाली येत असे.
अलीकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारावर जो विश्वास दाखवला तो त्याच्या आर्थिक प्रगल्भतेत झालेली वाढ दाखवत आहे.
सन 2023 मध्ये समभाग आणि एसआयपीमध्ये वाढ झाली. म्युचुअल फंड उद्योगाची मालमत्ता 50 लाख कोटींच्यावर पोहीचली. सन 2024 मध्ये समभाग आधारित फंड आणि एसआयपी मध्ये विक्रमी वाढ झाली. मागीलवर्षी नफावसुली आणि बाजारातील सुधारणा यामुळे विशेषतः मिडकॅप स्मॉलकॅपमधील समभाग गुंतवणूक कमी झाली असली एकूण मालमत्तेच्या बाजारमूल्यात वाढ झाली आहे.
त्या वर्षभरात एसआयपी गुंतवणूक सातत्याने दरमहा 29000 कोटींच्यावर राहिली. सध्या विविध लार्ज कॅप फंडातून मिळालेला परतावा सर्वसाधारण तर मिडकॅप, स्मॉलकॅप, थीमॅटिक योजनांतून मिळालेला परतावा संमिश्र आहे. सोने आणि चांदी यांनी मागच्या वर्षभरात अपवादात्मक असा परतावा दिला, त्यामुळे केवळ त्यावर आधारित फंड जोरदार आहेत.
ज्या योजना विविध मालमत्ता प्रकारात (Multi asset) गुंतवणूक करतात त्यांचा परतावाही त्यांच्या सोन्याचांदीतील गुंतवणूकीमुळे लक्षणीयरीत्या वाढला.
● मान्यताप्राप्त निर्देशांक पाहिले असता निर्देशांकावर अधिक प्रभाव असणारे समभाग संख्येने कमी आहेत पण त्यांचा एकत्रित प्रभाव अधिक आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास निफ्टी फिफ्टी मधील पन्नास कंपन्यांचा विचार करता 2% हून अधिक वजन असलेल्या केवळ 15 कंपन्या असून त्यांचे निर्देशांकावरील एकूण वजन 70% हून अधिक आहे. त्यामुळे त्यात वाढ झाली की निर्देशांक वाढतो पण आपला गुंतवणूक संचाचे मूल्य वाढलेले दिसत नाही. जवळपास सर्व निर्देशांकाची स्थिती थोड्याफार फरकाने अशीच आहे. यावर्षीही यात बदल होण्याची शक्यता कमी वाटते. त्यामुळे केवळ निर्देशांकावर अवलंबून न राहता यापुढे असे विशिष्ट समभाग नेमके शोधून योग्य वेळी त्यात गुंतवणूक केल्यास लाभदायी ठरेल. त्यामुळे अशा प्रकारची गुंतवणूक कल्पना असलेल्या (मल्टी फॅक्टर) योजनांत या वर्षी वाढ होऊ शकते.
● जागतिक अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या भावात आलेली अभूतपूर्व तेजी या वर्षीही कायम राहील असे वाटते. या योजनांतून मिळणारा परतावा मागील वर्षाएवढा नसला तरी आकर्षक निश्चित असेल.
● मध्यंतरी संरक्षण क्षेत्रांत तेजीचे वातावरण होते त्यानंतर त्यातील जोर कमी झाला. आपले मैत्रीसंबध टिकवण्याची वाढवण्याची इच्छा असली तरी आजूबाजूला असलेले देश सातत्याने काहीतरी कुरबुरी करत असतात. त्यामुळे यापुढे संरक्षण खर्चात वाढ करावी लागेल. त्याचा फायदा या क्षेत्रातील फंड योजनांना होईल.
● भाव अस्थिर असले कंपन्यांची कामगिरी आणि सरकारी धोरण यांचा प्रभाव त्यांच्या बाजार मूल्यावर पडत असतो. यावर्षी पहिली सहामाही सर्वसाधारण तर दुसरी सहामाही अधिक आकर्षक असण्याची शक्यता वाटते. जीएसटीमधील सुधारणामुळे मागणीत झालेली वाढ आणि त्यामुळे अपेक्षित असलेले करसंकलन या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहित प्रतिबिंबित होईल. यांचा प्रभाव म्युचुअल फंड योजनांवर पडू शकतो.
● डॉलरच्या किमतीत होणारी वाढ काही गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहे, ते म्युचुअल फंडाच्या माध्यमातून केवळ अमेरिकेत नव्हे तर अन्य विकसित, विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी शोधत आहेत. मर्यादित स्वरूपात त्या उपलब्ध असल्या तरी अशा योजनांमध्ये वाढ अपेक्षित आहे.
● योजना छोट्या शहरात पोहोचाव्या आणि महिलांचा सहभाग वाढावा म्हणून सेबीने योजलेले उपाय.
● डिरिव्हेटिव संबंधात नियामक आणि सरकार यांनी निश्चित भूमिका घेणे गरजेचे असून देशी वित्तसंस्थांना मर्यादित स्वरूपात असे व्यवहार करण्याची परवानगी दिल्यास ते दुधारी शस्त्र असले तरी त्यातून सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ शकते.
म्युचुअल फंड उद्योगावर विपरीत परिणाम होऊ शकणारे घटक :
● ट्रम्प यांचे टेरिफ धोरण त्यांनी मारलेल्या कोलांटउड्या पाहता त्यात असलेली अनिश्चितता त्यांचे उद्योगावर होणारे बरेवाईट परिणाम.
● लागोपाठ बराच काळ अपेक्षित परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांचे मनोधैर्य टिकून न राहण्याची शक्यता.
● नियामकांचे धरसोड धोरण त्याच्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाया आणि नंतर घ्यावी लागणारी माघार यामुळे गुंतवणूकदारांचे संरक्षण होते का? याविषयी निर्माण होत असलेला संभ्रम.
● “युद्ध म्हणजे रक्तरंजित राजकारण आणि राजकारण म्हणजे रक्तरंजीत युद्ध” अशा आशयाचे एक वचन आहे. तरीही युद्धे होत असतातच देशाच्या अर्थकारणावर त्यांचे अप्रत्यक्ष परिणाम होतातच.
या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार अधिक सुजाण होऊन त्यातील जोखीम समजून घेऊन म्युचुअल फंड योजनांत जाणीवपूर्वक गुंतवणूक करतील. माहितीचा अभाव आणि माहितीचा महापूर यातून आपल्याला आवश्यक असलेल्या खात्रीपूर्वक माहितीच्या आधारे गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करूनच आपले गुंतवणूक निर्णय घेतील.
त्यांना प्राथमिक माहिती आहे असे गृहीत धरून त्यांच्या शंका, संभाव्य अडचणी आणि अपेक्षा विचारात घेऊन अधिक उपयुक्त आणि जास्तीची माहिती देणे हा लेखमालेचा हेतू आहे. आपल्या शंका, अडचणी, अपेक्षा समजल्या तर त्यांचा यथोचित अंतर्भाव यापुढील लेखांतून केला जाईल.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
📧 udaypingale23@gmail.com