रंजक-रोचक माहिती

काय आहे विपश्यना ध्यान पद्धती?

गौतम बुद्ध यांनी सुमारे २५०० वर्षांपूर्वी शोधून काढलेले हे आत्मनिरीक्षण आणि सजगतेचे तंत्र म्हणजेच विपश्यना. याच तंत्राचा प्रसार आचार्य सत्यनारायण गोयंका हे व्यापारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने  आधुनिक काळात प्रभावीपणे केला. त्यांनी विपश्यना ध्यानाचा प्रचार करताना आत्मशुद्धी आणि शांततेवर भर दिला. विपश्यना म्हणजे वास्तवाचं तटस्थ निरीक्षण, ज्यामुळे आपले विचार, भावना आणि अनुभव यांचे मूल्यांकन करता येते.

आचार्य गोयंका यांनी शिकवलेले विपश्यना तंत्र हे कोणत्याही धर्म, जाती किंवा सांप्रदायिक बंधनातून मुक्त आहे. त्याचा उद्देश व्यक्तीला मानसिक आरोग्य आणि आंतरिक शांती मिळवून देणे आहे. विपश्यना ध्यानाद्वारे मनाची शांतता, तणावाचे नियमन, चिंता आणि नैराश्यावर मात करता येते. नियमित सरावाने व्यक्तीला स्वतःच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवता येतो.

या लेखात आपण विपश्यना काय आहे आणि या  ध्यानाच्या नियमित सरावामुळे तणावमुक्त जीवन जगण्याची आणि मानसिक स्थैर्य टिकवण्याची कला कशी आत्मसात करता येते, याबद्दल जाणून घेणार आहोत. विपश्यना ध्यान हे केवळ मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर समग्र जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे.

काय आहे विपश्यना?

विपस्सना (पाली) किंवा विपश्यना (संस्कृत) ही गौतम बुद्धांनी शोधून काढलेली आणि शिकवलेली एक प्राचीन ध्यान पद्धती आहे. आजच्या काळात, ही पद्धत जागतिक स्तरावर विपश्यना या नावाने प्रचलित आहे. ‘विपस्सना’ या पाली शब्दाचा अर्थ ‘स्वतःच्या आत खोलवर पाहणे’ असा होतो. बुद्धांनी या ध्यान पद्धतीच्या आचरणातून सत्य आणि अंतर्ज्ञान शोधले आणि याचा वापर करून त्यांनी आत्मबोध साधला असे म्हटले जाते.

विपश्यना  ध्यानामुळे आपल्याला मनाच्या गाभ्यात डोकावण्याची आणि आपल्या विचारांचा सखोल अभ्यास करण्याची क्षमता मिळते. या पद्धतीतून मनाला शांती, संतुलन, आणि अंतर्गत समजूत मिळते. गौतम बुद्धांनी या ध्यान पद्धतीद्वारे दुःख, तणाव आणि अशांततेतून मुक्तीचा मार्ग दाखवला. विपश्यना केवळ ध्यान न राहता, ती एक जीवनशैली आहे ज्यातून आपण आत्म-शुद्धीकरण आणि सत्याच्या शोधाकडे प्रवास करतो.

आनापान ही विपश्यना ध्यानाच्या अभ्यासाची प्रारंभिक पायरी आहे. आनापान म्हणजे श्वासोच्छवासाचे निरीक्षण करणे, जसे ते आत येते आणि बाहेर जाते. यामुळे मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत होते. श्वासोच्छवासाचे निरीक्षण हे ध्यानासाठी आवश्यक आहे कारण ते नेहमी उपलब्ध असते. याशिवाय, श्वसनाच्या लयीचा मनाशी घनिष्ठ संबंध असतो. जेव्हा मनात राग, भीती, वासना, मत्सर किंवा इतर नकारात्मकता येते, तेव्हा श्वासोच्छवासाची लय वेगवान आणि स्थूल होते. नकारात्मकता कमी होताच, श्वासोच्छवासाची लय सामान्य होते.

आनापान केल्यावर आपलं स्थूल मन नासिकांच्या द्वारावंर नैसर्गिकरित्या सुक्ष्म झालेलं असतं आणि याच सुक्ष्म मनाच्या आधारे अवयवांची संवेदना जाणवायला सुरुवात होते. सुरुवातीला संवेदना सुद्धा स्थूल स्वरूपाच्या असतात. उदा. हात पाय अवघडणं, कपड्यांचा किंवा वाऱ्याचा स्पर्श, घामाची जाणीव, खाज येणं, शरीरावर रोमांच येणं अशा वेगवेगळ्या संवेदना जाणवतात. या संवेदनांकडे केवळ पाहायचं, अनुभवायचं आणि मनात नोंद ठेऊन त्यांवर कुठल्याही प्रकारची शारीरिक अथवा मानसिक प्रतिक्रिया द्यायची नाही आणि बघता बघता संवेदना सुक्ष्म होतात. संपूर्ण शरीरभर या सुक्ष्म संवेदना जाणवायला सुरुवात होते. यांचेच साक्षी भावाने आणि तटस्थ भावाने निरीक्षण सुरु ठेवायचं म्हणजेच संवेदना वाईट आणि चांगली न मानता फक्त संवेदना आहे, उत्पाद होऊन पुन्हा नष्ट होईल असा भाव ठेवायचा आणि बघता बघता यातून मनस्थैर्य जाणवायला सुरुवात होते आणि ध्यान प्राप्त व्हायला लागते.

पुनरुज्जीवन आणि प्रसार

मुळची भारतीय असलेली ही साधना गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर काही वर्षांनी लोप पावली होती. मात्र गुरुशिष्य परंपरा असलेली ही साधना तिच्या मूळ स्वरुपात म्यानमारमधील काही अनुयायांनी आपल्या नियमित सरावाने जपून ठेवली होती. सत्यनारायण गोयंका हे मूळचे भारतीय व्यापारी त्या काळात म्यानमार मध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या व्यापारातील अपयशामुळे त्यांना नैराश्य आले आणि विविध आजारांनी ते ग्रसित झाले. तेव्हा एका मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी म्यानमारमधील “आचार्य सयाग्यी यू बा खिन” हे निवृत्त सेनेतील अधिकारी यांच्याकडे विपश्यना साधनेचे शिक्षण घेतले आणि  जवळपास चौदा वर्ष साधनेचा नियमित सराव करून ते भारतात वास्तव्यास आले आणि भारतासोबत  जगभरात या साधनेचा प्रसार केला. गोयंका यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी विपश्यना ध्यान पद्धतीच्या माध्यमातून आत्मशांती आणि मानसिक समतोल साधला. १९६९ मध्ये आचार्यपद स्वीकारल्यानंतर त्यांनी बिहारच्या बुद्धगया येथे पहिले विपश्यना शिबिर आयोजित केले. याच वर्षी ३ ते १४ जुलै दरम्यान मुंबईतील एका धर्मशाळेत त्यांनी पहिल्या विपश्यना शिबिराचे आयोजन केले, ज्यामुळे विपश्यना ध्यानाची लोकप्रियता भारतभर वाढू लागली.

१९७६ साली गोयंका यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ‘विपश्यना विद्यापीठ’ स्थापन केले. हे केंद्र जगभरातील साधकांसाठी महत्त्वाचे ध्यानस्थळ बनले. पुढे १९८५ साली त्यांनी इगतपुरी येथेच ‘विपश्यना संशोधन केंद्र’ उभारले. ज्यामुळे विपश्यना ध्यानावर आधारित संशोधन व अध्यापनाला एक नवे व्यासपीठ मिळाले.

गोयंका यांच्या कार्याचा सन्मान म्हणून, भारत सरकारने त्यांना २०१२ साली सामाजिक सेवेसाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. गोयंका यांनी विपश्यना साधनेला समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचवून एक शांत, तणावरहित, आणि समतोल समाज निर्माण करण्यासाठी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे विपश्यना ध्यानाला जागतिक स्तरावर मान्यता व लोकप्रियता प्राप्त झाली.

विपश्यनेचे मानसिक आरोग्यासाठी फायदे

१) ताण-तणाव कमी करणे

विपश्यनेचा प्रमुख फायदा म्हणजे तणाव कमी होणे. शरीरातील संवेदनांबद्दलची जागरूकता वाढवल्याने व्यक्ती मानसिक तणावाची ओळख करून त्यावर सकारात्मक उपाय करू शकते. यामुळे मन:शांती आणि मानसिक स्थिरता मिळते, जी रोजच्या जीवनातील तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरते.

२) चिंता व्यवस्थापन

चिंता बहुतेकदा मनातील अनावश्यक विचारांमुळे, भूतकाळातील घटना पुन्हा पुन्हा आठवून किंवा भविष्याची सतत काळजी करून निर्माण होते. विपश्यना साधनेतून वर्तमान क्षणात तटस्थ राहण्याची कला शिकता येते, ज्यामुळे चिंता कमी होते आणि मनाला शांती अनुभवता येते.

) आत्म-जागरूकता

विपश्यना साधना आत्म-शोधासाठी एक प्रभावी मार्ग आहे. या पद्धतीद्वारे व्यक्ती स्वतःला जसे आहे तसे स्वीकारण्याचे शिकतात, त्यांच्या विचारांचे, भावना आणि संवेदनांचे आकलन करून त्यावर कोणतीही निर्णयशुद्ध प्रतिक्रिया न देण्याची कला शिकतात. यामुळे आत्म-सन्मानात वृद्धी होते आणि एक सकारात्मक आत्म-प्रतिमा निर्माण होऊ शकते.

४) भावनिक नियमन

विपश्यनाद्वारे, व्यक्ती त्यांच्या भावनांचे निरीक्षण आसक्ती किंवा घृणेशिवाय करण्यास शिकतात. यामुळे भावनिक बुद्धिमत्ता सुधारते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या भावनांना अधिक संतुलित आणि सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देता येतो.

5) सुधारित एकाग्रता

विपश्यना साधना एकाग्रतेला तीक्ष्ण करण्यावर जोर देते. अभ्यासक किंवा साधक जसजसे संवेदनांचे निरीक्षण करण्यात अधिक कुशल होतात, तसतसे त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नैसर्गिकरित्या वाढते. याचा फायदा काम आणि नातेसंबंधांसह जीवनाच्या विविध पैलूंमध्ये होऊ शकतो.

विपश्यना कोण करू शकतो?

विपश्यना ही दुःख मुक्तीची साधना आहे, म्हणून यात जात, पात, धर्म, लिंग, देश, विदेश असा भेद राहत नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, यहूदी–सर्व धर्मांच्या लोकांना या साधनेचा लाभ घेता येतो. यात कुठल्याही धर्माची विशेषता नसून, ती फक्त एक साधना आहे जी आपल्या जीवनाला सुलभ बनवण्यास मदत करते.

महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेर विपश्यना केंद्र आहेत, ज्यात विविध शिबिरे घेतली जातात. १० दिवसीय शिबीर हे नवीन साधकांसाठी असते. यात साधकांना सर्व नियमानुसार पालन करणे बंधनकारक असते. आपल्याला गूगलवर विपश्यना सर्च करून फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर शिबीर केंद्रातून फोन येतो आणि ते विचारपूस करतात. यानंतर आपण दहा दिवसांच्या शिबीरात प्रवेश घेऊन साधना शिकू शकतो.

या शिबीरासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. हे शिबीर पूर्णतः मोफत आहे. तथापि, साधक इच्छुक असल्यास, आपल्या सोयीनुसार दान देऊ शकतो.

मित्रांनो, आजच्या युगात ध्यानाचे महत्व अत्यंत वाढले आहे. जीवनाच्या गतीमुळे आणि ताण-तणावामुळे ध्यान एक महत्त्वाचं साधन ठरलं  आहे. ध्यान आपल्याला मानसिक शांतता, आत्मसमर्पण आणि एकाग्रता साधायला मदत करते. यामुळे आपले मन शांत आणि केंद्रित राहते, ज्यामुळे दैनंदिन आव्हानांचा सामना करणे सोपे जाते.

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button