यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.
आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. संघर्षाविना सहज मिळतील अशा खूप कमी गोष्टी राहिल्यात. आज कष्टाशिवाय पर्याय नाही. चिकाटी आणि संयम आत्ताच्या तरुण पिढीमध्ये कमी असल्याकारणाने उतावळेपणात झटपट श्रीमंत व्हावे असे त्यांना वाटत असते. लॉटरी, मटका, जुगार अशा सवयींमुळे अनेक तरुणांचं अक्षरशः संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं.
घरबसल्या लाखो-करोडो कमवा, तुमचे पैसे दुप्पट करा, नेटवर्क मार्केटिंग मधून करोडपती व्हा अशा अनेक फसव्या जाहिराती दररोज वर्तमानपत्रांमध्ये झळकत असतात. अशा झटपट आणि क्षणात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी तरुण वर्ग फसतो आणि बळी पडतो. शेवटी अपयश आणि निराशा वाट्याला येते. मला कोणीतरी गॉडफादर भेटेल, श्रीमंत बनण्याची एखादी मोठी संधी चालून येईल किंवा देवाचा साक्षात्कार होईल अशी आपण अपेक्षा धरुन बसतो. अचानक राजयोग येऊन माझ्या आयुष्याला एका दिवसात कलाटणी मिळेल, माझं आयुष्य बदलून जाईल असं बहुतेकांना वाटत असतं. प्रयत्न, चिकाटी, परिश्रम, कष्ट, संघर्ष करण्याऐवजी सगळं सहज व्हावं, सहज मिळावं असं वाटत असतं. मात्र यशाला शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटने मिळालेलं यश हे शाश्वत देखील नसतं. अचानक एखादी संधी चालून येईल किंवा कोणीतरी आपल्या मदतीला येईल अशी आशा वाटणे हे स्वतःच्याच नाकर्तेपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे.
जेव्हा आपला स्वतःचा स्वतःच्याच सामर्थ्यावर विश्वास नसतो तेव्हा अशा प्रकारच्या निरर्थक अपेक्षा आपण धरून राहतो. मित्रांनो तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, जे कोणते ध्येय साध्य करायचे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला रणांगणात उतरावं लागेल, स्वतः झगडावं लागेल. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं काही ना काही कारण आहे, ते कारण आपल्याला शोधायचंय आणि त्या कारणाच्या पूर्ततेसाठी काम करायचंय. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी मेहनतीचा यज्ञ प्रत्येकाला पेटवावाच लागतो. शॉर्टकटने मिळालेल्या यशानं तुम्ही जितके लवकर वर जाता, तितक्याच लवकर तुम्ही खाली देखील येता. थ्री इडीयट्स मध्ये आमिर खानने म्हटल्याप्रमाणे “सक्सेस के पीछे मत भागो, मेहनत इतनी करो की सक्सेस खुद आपके पीछे आयेगी.
Shortcut आणि Smartwork मध्ये काय फरक आहे?
1. Shortcut :
- हे काम जलद पूर्ण करण्यासाठी वापरलेले छोटे मार्ग किंवा तात्काळ उपाय असतात.
- शॉर्टकट कधी कधी गुणवत्ता किंवा दीर्घकालीन परिणामांवर परिणाम करू शकतो.
- शॉर्टकटमध्ये फक्त काम पटकन संपवणे हे उद्दिष्ट असते, त्यामागे ठराविक उद्दिष्ट किंवा हेतू नसतो.
उदाहरण: प्रोजेक्टमध्ये आवश्यक माहिती न वाचता थेट निष्कर्ष लिहिणे.
2. Smart Work :
- हे काम चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध मार्गाने कमी वेळात पूर्ण करण्याचे तंत्र आहे.
- स्मार्ट वर्कमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरून कामाचे नियोजन केले जाते.
- दीर्घकालीन यश आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.
Shortcut वापरल्याने फक्त तात्पुरते फायदे मिळतात, तर Smart Work दीर्घकालीन आणि शाश्वत यशाकडे नेते.
Smart Work म्हणजे काय?
Smart Work म्हणजे कमी वेळेत अधिक परिणाम साधणे. मेहनत कमी पण ती मेहनत योग्य दिशेने करणे महत्त्वाचे आहे. शॉर्टकट घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
Smart Work कसे करावे?
कामाचे प्राधान्य ठरवा: सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा, त्याला सुरुवातीला प्राधान्य द्या.
तंत्रज्ञानाचा वापर करा: तंत्रज्ञानाचा वापर करून कामे सोपी करा. उदा. ऑटोमेशन साधने.
वेळेचे नियोजन: कामाचे छोटे भाग करा आणि त्यासाठी वेळेची मर्यादा ठरवा.
काम सोपवा: आवश्यकतेनुसार इतरांना काम सोपवा.
नवीन कौशल्ये शिकत रहा: नवीन तंत्र आणि पद्धती शिकून स्वतःला कायम अपडेट ठेवा
यामुळे तुम्ही शॉर्टकट घेत असतानाही अधिक परिणामकारकपणे आणि हुशारीने काम करू शकाल.
यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :
धैर्य आणि सातत्य: प्रत्येक टप्प्यावर मेहनत आणि सातत्य ठेवणे.
योग्य नियोजन: कोणतेही काम व्यवस्थित योजना बनवून करणे.
समर्पण: यशासाठी तुमच्याकडे ठाम ध्येय असणे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.
शिकण्याची तयारी: चुका झाल्यावर त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे.
यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, परंतु शहाणपणाने काम केल्यास योग्य वेळी यश नक्कीच मिळेल. Smart Work हा यश मिळवण्याचा मार्ग असू शकतो; पण Short Cut नाही.
आणखी वाचा :
- अंतः अस्ति प्रारंभः
- ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत.
- एका रात्रीत मिळणारे यश मिळवण्यासाठी किती वेळ लागतो?