दिनविशेष

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री यांची जयंती

पेपर वाटण्यापासून खडतर आयुष्याची सुरवात करणाऱ्या एका व्यक्तिवर जेव्हा जगातील लहानमोठ्या सर्व पेपर्समधे स्तुती करणारे रकानेच्या रकाने लिहुन येतात तेव्हा ‘अतिसामान्य ते असामान्य’ ह्या प्रवासाचे ते एक उदाहरण ठरते. अनेक मार्गदर्शक पुस्तकांतून आशावादी लिखाण करुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी व युवकांना सत्य, विकास, नीतिमत्ता व राष्ट्रनिर्माणाचा मार्ग दाखवणाऱ्या ह्या महापुरुषाचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा विश्व विद्यार्थी दिवस म्हणुन साजरा केला जातो तो ह्यासाठीच.

एकदा डॉ.साहेब मिसाईल चाचणीत इतके रममाण झाले की, स्वतःच्या भाचीचेही लग्न विसरून गेले. कधी शाळेत जेवणाच्या पंगतीत आनंदाने लहान मुलांना वाढणे, तर कधी आपली खुर्ची इतरांपेक्षा वेगळी आहे हे आढळल्याने ‘मलाही साधीच खुर्ची द्या’ म्हणत बडेजाव टाळणे, अगदी 2012 ला देशाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रपती पदाबाबत राजकारण होणे योग्य नसून सर्वसंमती असेल, तरच मी उभा राहील’ म्हणत राष्ट्रपतीपदावर सुद्धा पाणी सोडणे, वयाच्या 83 व्या वर्षीही युथ आयकॉन असणे किंवा राष्ट्रप्रमुख असतानाही आपल्यात एक कॉमन मॅन जपणे, असे कितीतरी पैलू आपल्याला डॉ. कलामांनी आधुनिक काळातही एका साधुप्रमाणे निर्मोही आयुष्य व्यतीत केल्याचे दाखले देतात.

जगातील सर्वश्रेष्ठ संशोधकांपेेकी एक असूनही शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपली ओळख केवळ एक शिक्षकाची रहावी, कारण ‘शिक्षकांची राष्ट्रनिर्माणातील भूमिका अतुलनीय असते’, असे म्हणत ज्ञानदानाच्या पवित्रकार्याचा केलेला योग्य असा गौरव करणे असो, नातलग दिल्लीला आल्यावर स्वतःच्या खिशातून केलेला त्यांच्यावरचा खर्च असो किंवा कायम गरजू संस्थाना केलेले आपल्या मासिक मानधनाचे वाटप असो, ही उदाहरणे अगदी सहज सांगतात की, ह्या आदर्श व्यक्तिमत्वाची, ट्रक भरून असणारी एकमेव संपत्ती म्हणजे पुस्तके का होती. एकीकडे “स्वप्न म्हणजे ते नाही, जे तुम्हाला झोपेत पडते; स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपूच देत नाही” म्हणणारे राष्ट्रसमर्पित व्यक्तिमत्त्व, तर दुसरीकडे, low aim is a crime, स्वप्ने मोठीच बघा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा’ म्हणणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व.

लेखक म्हणून डॉ. कलाम यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली. “विंग्स ऑफ फायर” हे त्यांचं आत्मचरित्र विशेष प्रसिद्ध आहे, ज्यात त्यांच्या जीवनातील संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे. “इग्नाइटेड माइंड्स”, “इंडिया २०२०” आणि “माय जर्नी” या पुस्तकांतून त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी आपल्या कल्पना मांडल्या. त्यांचं स्वप्न होतं की भारत २०२० पर्यंत एक महासत्ता बनेल, आणि या उद्दिष्टासाठी त्यांनी आयुष्यभर युवकांना प्रेरणा देण्याचं कार्य अविरत केलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button