स्टार्टअपस्टार्टअप विश्व

‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार

इंटरनेटच्या आधारे चालणाऱ्या या माध्यम स्वरूपात काही क्षणांमध्ये अनेक लोकांपर्यंत पोहोचता येतं. तुमचा व्यवसाय काय आहे, कोणासाठी आहे, त्याची किंमत काय इत्यादी सर्व महत्वाच्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक सर्वोत्तम साधन म्हणावं लागेल. सोशल मीडियाच्या मदतीने व्यवसाय वाढवत असताना मार्केटिंग स्ट्रॅटेजी पक्की असली पाहिजे असं म्हणतात, मात्र मार्केटिंग म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय? हे जाणून घेऊया…

मार्केटिंग म्हणजे काय?

एखादा विक्रेता जेव्हा त्याच्याजवळ असलेल्या सेवा आणि उत्पादनांचा प्रचार करतो तेव्हा त्याला मार्केटिंग करणं असं म्हणतात किंवा आपला ग्राहकवर्ग कोणता आहे, त्यांची गरज काय आहे हे ओळखून त्यांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करणं याला मार्केटिंग म्हटलं जाऊ शकतं. तुमच्याजवळ असलेली वस्तू ग्राहकांच्या मनात उतरावी, त्यांच्या पसंतीस यावी आणि त्यांना वाटावं की आपली गरज इथेच पूर्ण होऊ शकते आणि त्यांना ती खरेदी करण्याची इच्छा व्हावी म्हणजेच सोप्या शब्दांत मार्केटिंग होय. वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही जाहिराती पाहिल्याच असतील जिथे डोळ्यांना भावणाऱ्या शब्दांमध्ये प्रॉपर्टीची जाहिरात केली जाते. ती जाहिरात वाचून आपल्या मनात देखील असंच एखादं घर असावं अशी इच्छा निर्माण होते आणि यालाच आपण मार्केटिंगची जीत म्हटली पाहिजे. 

व्यवसाय म्हटलं की मार्केटिंग हा त्याचा अविभाज्य भाग ठरतो, कारण मार्केटिंगमध्ये एखादा उपक्रम यशस्वी बनवण्याची किंवा मुळापासून उखडून टाकण्याची ताकद असते. यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही वावरत असलेल्या बाजाराचा अभ्यास केला जातो, या अभ्यासामधून ग्राहकांची गरज ओळखायला मदत होते आणि सोबतच आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत याचं ढोबळ चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. हा अभ्यास झाल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी विकणार आहोत, त्याची किंमत किती असेल, त्याचं पॅकेजिंग कसे असेल, देवाण-घेवाणीमधून आपण जास्तीत जास्त विक्री करून महसूल कसा उभा करू शकतो याची आखणी केली जाते. 

मार्केटिंगमधल्या 4Ps कोणत्या?

१) Product: कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग कॅम्पेन सुरु करण्याअगोदर विक्रेत्याला तो विकत असलेल्या वस्तू किंवा सेवेबद्दल माहिती असली पाहिजे, कारण संपूर्ण कॅम्पेन याच उत्पादन किंवा सेवांवर अवलंबून असते. आपण विकत असलेल्या वस्तू ग्राहकांना कशाप्रकारे मदत करतील, आपण बाजाराची गरज पूर्ण करणारी वस्तू बाजारात विकत आहोत का याची माहिती विक्रेत्याला असली पाहिजे. 

२) Price: विक्रेता विकत असलेल्या वस्तूची किंमत म्हणजे प्राईस. यामध्ये युनिटची किंमत, वितरणाचा खर्च, विपणनाचा खर्च इत्यादी घटक ग्राह्य धरले जातात. ग्राहकांकडून त्या वस्तूसाठी किती प्रमाणात मागणी आहे किंवा प्रतिस्पर्धी तीच वस्तू कोणत्या किमतीत विकतोय यांवर वस्तूची किंमत ठरते. 

३) Place: विक्रेता उत्पादन किंवा सेवा कशाप्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे याचा विचार देखील विपणनात केला जातो. आधी बऱ्यापैकी वस्तूंची विक्री प्रत्यक्षात व्हायची, मात्र आता सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात ऑनलाईन देखील वस्तू विकल्या जातात. 

४) Promotion: विक्रेता विकत असलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे प्रमोशन. जाहिरात, जनसंपर्क, सोशल मीडिया इत्यादींच्या मदतीने वस्तूंचा प्रचार केला जातो. 

मार्केटिंगचे प्रकार किती आहेत?

१) ब्लॉग मार्केटिंग: संबंधित ग्राहकांपर्यंत ब्लॉगिंगच्या माध्यमातून आवश्यक माहिती पोहोचवणे म्हणजे ब्लॉग मार्केटिंग होय. यामध्ये विक्रीसाठी निवडलेल्या वस्तूंची विशिष्ट माहिती दिली जाते. 

२) इंटरनेट मार्केटिंग: आजच्या जगात अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेटशिवाय चांगला पर्याय उपलब्ध नाही आणि म्हणूनच उत्तमरित्या इंटरनेटचा वापर करून विपणन केल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. 

३) प्रिंट मार्केटिंग: आपण जरी इंटरनेटच्या युगात वावरत असलो तरीही वर्तमानपत्र आणि मासिकांचा वाचकवर्ग आजही अफाट आहे आणि परिणामी लक्षवेधी छायाचित्रे, दर्जेदार लिखाण केल्यास वाचकांच्या मनात जागा निर्माण करता येते. 

४) सोशल मीडिया मार्केटिंग: सोशल मीडियाचा वापर किती प्रमाणात केला जातो याबद्दल विशेष काही नमूद करण्याची गरज नाही. लाखो, कोट्यवधी लोकं दर दिवशी हातात मोबाईल घेऊन वावरत असतात आणि म्हणूनच तांत्रिक जगात वावरत असताना सोशल मीडिया मार्केटिंग हा पर्याय उपयुक्त ठरतो. Instagram, Facebook, Twitter  यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ग्राहकांना आकर्षित करण्यात मदत करतात. 

५) व्हिडिओ मार्केटिंग: कदाचित तुम्हाला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या ‘Reels’ बद्दल माहिती असेल. व्हिडीओ मार्केटींगद्वारे अगदी ३० सेकंदांमध्ये अत्यावश्यक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते आणि तांत्रिक घटकांमुळे अधिक आकर्षकदृष्ट्या आपली गोष्ट मांडता येते. 

६) SEO मार्केटिंग: Pay-Per-Click या संकल्पनेवर आधारित चालणाऱ्या या उपक्रमात स्पर्धात्मक जगात वावरणाऱ्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या पुढे स्वतःला ठेवण्यासाठी सर्च इंजिनला पैसे दिले जातात. वाचकांनी अधिकाधिक लक्ष द्यावे, कंपनीची साईट उघडून बघावी म्हणून SEOची प्रक्रिया वापरली जाते. 

मार्केटिंगची मदत घेतल्यामुळे तुम्ही कोणती उत्पादने विकत आहात याची सविस्तर माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात मदत मिळते. जास्तीत-जास्त लीड्स मिळवल्यामुळे दीर्घकाळासाठी ब्रॅण्डची विक्री वाढते. सध्या आपण शर्यतीच्या जगात वावरत आहोत. जिथे मार्केटिंगमधून मिळणाऱ्या मदतीची गरज सर्वाधिक आहे. अनेकवेळा तुम्ही मार्केटिंगच्या मदतीने स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करू शकता, ज्यामधून नफा वाढतो.

आणखीन वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button