जिद्द... उत्तुंग यशाचीस्टार्टअप

शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…

आता जर का इतिहासात डोकावून पाहिलं तर पैशांचा शोध लागण्यापूर्वी लोक मालाची/वस्तूंची देवाण-घेवाण करून (Barter System Of Exchange) संसाराची गाडी ओढायचे याचा प्रत्यय येतो, त्यामुळे व्यवसाय हा आपल्या जगण्याचा भाग आधीपासूनच होता असं म्हणायला हरकत नाही. तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय उद्योजक विश्वात अनेक नावं जोडली गेली आणि त्यांपैकी गाजणारं आणि अनेक लोकांसाठी प्रेरणा बनलेलं एक नाव म्हणजे नमिता थापर होय… 

काय आहे शार्क टॅंक इंडिया?

नमिता थापर हे नाव ऐकलं की सर्वात अगोदर डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमावलेला कार्यक्रम; शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India). तुम्हाला माहिती आहे का? शार्क टॅंक हा काही प्रामुख्याने भारतीय कार्यक्रम नाही. वर्ष 2001 मध्ये जपानमधून या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती, पूढे अमेरिकेमधील ABC वाहिनी आणि नंतर भारतात सोनी वाहिनीवरून याचे प्रक्षेपण व्हायला सुरुवात झाली. या कार्यक्रमात उद्योजक बनण्याची किंवा व्यवसाय वाढवण्याची इच्छा मनात घेऊन आलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मदत केली जाते आणि भारतात शार्क टॅंक इंडिया म्हटलं की, “So for that reason, I am OUT!!” म्हणणारी नमिता हमखास सर्वांना आठवते.

नमिता थापर: बालपण आणि शिक्षण 

एम्क्युअर फार्मासुटिकल्सची (Emcure Pharmaceuticals) सर्वेसर्वा आणि शार्क टॅंक या  कार्यक्रमामध्ये सर्वांची ‘Pharm’माँ’ बनलेल्या नमिताचा जन्म पुण्यातला. वर्ष 1977 मध्ये सतीश आणि भावना मेहता यांच्या पोटी जन्म घेतलेल्या नमिता यांनी प्राथमिक ते थेट CA पर्यंतचं शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं आणि पुढे MBA चं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेच्या दिशेने झेप घेतली, अमेरिकेतील प्रसिद्ध ड्यूक विद्यापीठातून नमिता थापर यांनी सदर पदवी प्राप्त केली असून परदेशातच त्यांच्या हेवा वाटावा अश्या करियरचा श्रीगणेशा झाला होता.

करियरच्या सुरुवातीला उद्योजिका बनण्याच्या विचार कदाचित नमिता यांच्या मनात नसावा कारण एक किंवा दोन नाही तर तब्बल सहा वर्ष त्यांनी अमेरिकेतील गायडंट कॉर्पोरेशनमध्ये कामाचा पक्का अनुभव कमावला आहे. 

भारतात परतल्यानंतर एम्क्युअर फार्मासुटिकल्स हा त्यांनी निवडलेला दुसरा पर्याय होय. नमिता थापर यांचे वडील म्हणजेच सतीश मेहता हेच सदर कंपनीचे संस्थापक असल्याने नमिता यांच्यावर कोवळ्या वयातच व्यवसायाचे संस्कार झाले होते, आणि आत्ताच्या घडीला त्या कमावत असलेलं नाव हे याच पक्क्या शिकवणीचा परिणाम म्हणावा लागेल. आपण म्हणतोच ना, ‘जे पेरावं, तेच उगवतं’ नमिता थापर देखील याच उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण वाटतात. 

व्यवसाय आणि शार्क टॅंक

आपल्यापैकी अनेकजण नमिता थापर यांना ओळखतो ते शार्क टॅंकमुळे, त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात नसलेल्या नमिता या नेमक्या कोणत्या कारणाने व्यवसायाच्या दिशेने वळल्या असतील आणि शार्क टॅंकपर्यंत नेमकी कशी मजल मारली असेल हे प्रश्नचिह्न कायम राहतंच. तर सहा वर्ष अमेरिकेत नोकरी केल्यानंतर नमिता भारतात परतल्या. सतीश मेहता यांनी वर्ष 1981 मध्ये एम्क्युअर फार्मासुटिकल्सची स्थापना केली होती. सुरुवातीला चीफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) म्हणून व्यवसायात उतरलेल्या नमिता यांनी अथक मेहनत, परिश्रम आणि हुशारीच्या जोरावर फक्त काही काळातच कंपनीच्या एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर (Executive Director) ची धुरा सांभाळायला सुरुवात केली.

भारताच्या इतिहासाची पानं उलटून पहिली तर घरात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिला दिसतात, मात्र आताच्या घडीला त्याच महिला चूल आणि मुलासोबत स्वतःचे अस्तित्व देखील घडवतात, नव्हे इतरांना प्रोत्साहन देतात. खरोखर आपल्या भारताचं बदलणारं हे चित्र किती मोहक आहे. नमिता थापारच नाही तर त्यांच्यासारख्या अनेक महिलांचा हा प्रवास पहिला कि आपला देश खऱ्या अर्थाने सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे याची जाणीव होते आणि अभिमानाने उर भरून येतो. 

शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमामुळे भारतीय व्यवसायांना किंवा उद्योगांना खऱ्या अर्थाने नाव आणि दर्जा मिळायला सुरुवात झाली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमन गुप्ता, अनुपम मित्तल, पियुष बन्सल, विनिता सिंग यांच्यासारखे विविध क्षेत्रातील उद्योजक नवख्या व्यवसायांना आर्थिक मदत तसेच मार्गदर्शनही करतात. नमिता थापर यांना कैकवेळा “ये मेरी एक्सपर्टरीज नाही, so for that reason I am out!” या त्यांच्याच वाक्यासाठी टार्गेट केलं जातं, किंवा सोशल मीडियाच्या जगात त्यांच्यावर अनेक मिम्स देखील बनवले जातात. सोशल मीडियावर अशा चर्चा रंगात असल्या तरीही नमिता थापर सलग तीन वर्ष या कार्यक्राचा भाग बनून राहिल्या आहेत आणि ही बाब नरजेआड करता येत नाही. नमिता यांची चालण्या-बोलण्याची पद्धत असुद्या किंवा व्यवसायातील त्याचा दांडगा अनुभव या सर्व घटकांमुळे नमिता अनेक जणांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत एवढं मात्र नक्की. 

महिला उद्योग आणि नमिता

वरती म्हटल्याप्रामणे जुन्या भारतात महिलांना घराबाहेर पडत काम करण्याला परवानगी नसायची. जी स्त्री समाजाच्या विरुद्ध जात हे धाडस करू पाहायची तिला वाळीत टाकलं जायचं. महिलांचं काम म्हणजे केवळ घर सांभाळणं एवढ्यापुरतं मर्यादित करण्यात आलं होतं आणि परिणामी इच्छा, आवड आणि कौशल्य असूनही त्या केवळ चार भिंतींच्या आड दडून राहायच्या. शेकडो वर्षांनंतर का होईना पण देश बदलत आहे. नमिता आणि इतर अनेक महिला विविध क्षेत्रांमधून हे बदल घडवून आणत आहेत. 

शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमानंतर नमिता थापर या नावामुळे भारतातील उद्योजक आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात धूम उडाली आहे. स्वतःच्या व्यवसायाला नवीन उंची देण्यासाठी नमिता यांनी HR, डोमेस्टिक मार्केटिंग (Domestic Marketing) आणि फायनान्स (Finance) या क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कंपनीने आत्तापर्यंत ३००० पेक्षाही अधिक वैद्यकीय प्रतिनिधींच्या द्वारे १ बिलीयन डॉलर्सच्या घरात योगदान दिले आहे. 

शार्क टॅंक इंडियाच्या माध्यमातून त्यांनी Brandsdaddy, Wakao Foods, Your Foot Doctor, Kabaddi Adda यांसारख्या अनेक स्टार्टअप्सना (Start-Ups) मदत केली. इनक्रेडिबल व्हेंचर्सच्या (Incredible Ventures) अंतर्गत तरुणांच्या मनात व्यवयसायची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुंबई, बंगलोर, पुणे आणि चेन्नई अश्या प्रमुख शहरांमध्ये नमिता मार्गदर्शनपर वर्ग राबवतात. या उपक्रमांमधून नमिता नवनवीन व्यावसायिक कल्पना तरुणांपर्यंत पोहोचवतात. शार्क टॅंकमध्ये त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा जर का तुम्ही आढावा घेतला तर त्या नेहमीच नाविण्याच्या शोधात दिसतात. 

सोशल मीडियावर जरी आपण नमिता यांच्या “I am Out” या वाक्याची खिल्ली उडवत असलो तरीही यातून एक गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे ती म्हणजे जर का अट्टाहासाने एखादी गोष्ट करूनही त्यातून आपलं नुकसानच होणार असेल तर अशी आव्हानं स्वतःवर ओढवूं घेऊ नये. “ये कचरा नही हैं, It has a lot of Potential” या वाक्याचा देखील नेटकऱ्यांनी चुकीचा अर्थ घेतला होता, मात्र इथे आपण समजून घेतलं पाहिजे कि एखादी गोष्ट जर का इतरांच्या कमी येत नसेल, तर ती कामाची नाही असं होत नाही, आपण स्वतःचे कौशल्य वापरून त्यामधून  नवनिर्मिती नक्कीच घडवून आणू शकतो. नमिता यांच्या सतत हसऱ्या चेहऱ्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जवळपास ६०० कोटी रुपयांची मालकीण असलेल्या नमिता थापर यांना आत्तापर्यंत इकॉनॉमिक टाइम्सच्या (Economic Times) ‘40 under Forty’ Award, Barclays Hurun Next Gen Leader Recognition, Economic Times 2017 Women Ahead List, World Women Leadership Congress Super Achiever Award अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. 

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button