आपली माती, आपली माणसंशेती

१० लाख कर्ज काढून शेती पिकवणारा आणि ४०० कोटींचा टर्नओव्हर करणारा ‘शेतकरी’

पुण्याच्या मुळशीचा हा माऊली.

वडील शेतकरी. परंपरागत पद्धतीने शेती करणारे.

शेतीत फायदा नाही म्हणून माऊलीने दहावीनंतर ऑफिस बॉयची नोकरी पत्करली. बारा वर्षें नोकरी केली.

माऊलीच्या आयुष्यास कलाटणी मिळाली ती एका बातमीमुळे. ती बातमी ही होती, “10 गुंठ्यात 12 लाखाचे उत्पन्न.”

माऊली त्या शेतकऱ्यास जाऊन भेटला. तो फुलांची शेती करत असे. माऊली त्या शेतकऱ्याचे यश पाहून भारावला. स्वतःच्या शेतीत तोच प्रयोग करण्याचे ठरवले. नोकरीचा राजीनामा दिला. फुलांची शेती करण्याचा चंग बांधला आणि झपाटून कामाला लागला. बऱ्याच प्रयत्नांतून बँकेने दहा लाख कर्ज दिले आणि या माऊलीने ‘पुण्यातील पहिलंवहिलं पॉलिहाऊस’ उभं केलं आणि फुलांची हायटेक शेती सुरू केली.

पाणी, वीज, खतं आणि मजूर या सगळ्या गोष्टींचा कमीत कमी वापर, सोबत बाजारपेठेवरही लक्ष. या गोष्टींमुळे माऊलीने ‘दहा लाखाचं कर्ज अवघ्या एका वर्षात फेडलं.’

या पराक्रमाने बघता बघता माऊली हिरो झाला. वर्तमानपत्रे, टीव्हीवर माऊली झळकू लागला. माऊलीकडे कित्येक शेतकरी मार्गदर्शन घ्यायला येऊ लागले आणि यातून निर्माण झाली एक संस्था… ‘अभिनव फार्मर्स क्लब’. या गटात भागातील ३०५ शेतकरी सहभागी झाले. माऊलीने या साऱ्या शेतकऱ्यांची घडी व्यवस्थित बसविली. परिणामतः त्या सर्व ३०५ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी ३०५ ‘मारुती 800’ गाड्या विकत घेतल्या.

आज कित्येक इंजिनिअर, डॉक्टर किंवा सीए या लोकांना सुध्दा ८ तास काम केल्यावर वार्षिक ५ लाख निव्वळ नफा राहत नाही. मात्र येथील शेतकरी दररोज फक्त ५ तास काम करुन हे उद्दिष्ट साध्य करतात. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचा बंगला व चारचाकी सुध्दा आहे.

एक एकर शेतीचे दोन तुकड्यात विभाजन केले जाते. एका तुकड्यात भाजीपाला लागवड केली जाते. उरलेल्या तुकड्यात पॉलिहॉऊस/ग्रीनहाऊस शेती केली जाते. या पॉलिहॉऊसमध्ये विदेशी भाज्या पिकवल्या जातात. या भाज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये विकल्या जातात. पिकवलेल्या भाज्या शेताच्या बांधावरुनच भरुन नेल्या जातात. त्यामुळे विकण्यासाठी बाजारात नेणे व वाहतूकीचा खर्च या गोष्टीसुध्दा शेतकऱ्याला कराव्या लागत नाहीत.

यासोबतच एक देवनी गाय सर्व शेतकऱ्यांनी पाळली आहे. तिला खाद्य कमी लागते मात्र ही गाय दूध जास्त देते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. या दुधाबरोबरच सर्व शेतकरी गोमूत्र साठवून ठेवतात व औषधे बनविणाऱ्या कंपन्यांना विकतात. त्यातूनसुध्दा चांगली कमाई केली जाते.

सध्या ‘अभिनव फार्मर्स क्लब’ या गटात ४५००० शेतकरी आहेत. ग्रुपकडून केली जाणारी शेती पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने केली जाते. ‘अभिनव फार्मर्स क्लब’ला या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

केवळ “दहावी शिक्षण” झालेल्या माऊलीने आजवर ३५पेक्षा जास्त देशाचे दौरे केलेले आहेत, जे एखाद्या IT इंजिनीअर ला देखील जमले नसेल. आजवर माऊलीला २००० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. हा माऊली म्हणजेच श्री. ज्ञानेश्वर बोडके.

भारतीय समाज शेतीकडे ‘डबघाईला आलेला व्यवसाय’ म्हणून पाहत असताना श्री. ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवण्याची ‘सिस्टिम’ शोधून काढली. ती यशस्वीपणे राबवली. डबघाईला आलेल्या शेतीला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या प्रयत्नाने सुगीचे दिवस आले आहेत. त्यांना राष्ट्रपती पारितोषक सुद्धा जाहीर झाले आहे.

घरच्यांचा विरोध, आर्थिक परिस्थिती आणि अल्पसंतुष्टी वृत्तीला श्री. ज्ञानेश्वर बोडके बळी पडले असते. तर, आज ते कोठे असते? त्याच ऑफिसमध्ये… ऑफिसबॉय म्हणून… आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना श्री. बोडके यांना लाख संकटे आली असतील, पण ते तरीही डगमगले नाहीत आणि शेती फायद्याची कशी हे सिद्ध करून दाखविले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

१३ जानेवारी २०१८ रोजी या माऊलीला प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा लाभ मु. पो. घारेवाडी, ता. कराड येथील बलशाली युवा हृदय संमेलनमध्ये मिळाला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button