जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे. पी. मॉर्गन यांची कहाणी
असं म्हणतात की सुबत्ता असणाऱ्याच्या घरी जन्म घ्यायला नशीब लागतं, पण ती सुबत्ता टिकवून, ती कैकपटीने वाढवायला लागतात… ते कष्ट, प्रामाणिक प्रयत्न आणि सचोटी. अशीच गोष्ट आहे जेपी मॉर्गन यांची.
१७ एप्रिल १८३७मध्ये अमेरिकेतल्या एका श्रीमंत घरात जॉन पिअरपॉन्ट म्हणजेच जेपी मॉर्गन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे उद्योगपती आणि गुंतवणूकदार होते. लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि नेतृत्वगुण असणारे जेपी यांना, त्यांच्या वडिलांनी पहिल्यापासूनच व्यवहार ज्ञानाचे धडे द्यायला सुरुवात केली होती. स्वतःचा व्यवहार स्वतः करणे, एकट्याने प्रवास करणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे मॉर्गन यांच्यामधील नेतृत्वगुण वाढत गेले.
नंतर त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि डंकन, शेअरमन अँड कंपनी या वडिलांच्या कंपनीमध्ये ते क्लार्क म्हणून रुजू झाले. व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करत मॉर्गन शिकत होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर जेपी मॉर्गन यांनी संपूर्ण कंपनीचा ताबा आपल्या हाती घेतला. १८७१ मध्ये त्यांनी अँथनी ड्रेक्सेल यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये कंपनी सुरू केली. ही कंपनी वेगवेगळ्या कंपन्यांना भांडवल तसेच पैसे पुरवण्याचे काम करत होती. या कंपनीने अनेकदा अमेरिकन सरकारला सुद्धा पतपुरवठा केला होता. ड्रेक्सेल यांच्या मृत्यूनंतर मॉर्गन यांनी कंपनीचे नाव बदलून जेपी मॉर्गन अँड कंपनी असं ठेवलं. पुढं या कंपनीची घोडदौड इतक्या वेगात सुरु झाली की, १८९३ मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये मंदीची सुरुवात झाली, तेव्हा मॉर्गन यांच्या कंपनीने अमेरिकेतल्या जवळपास 20 ते 25 टक्के रेल रोड कंपन्या खरेदी केल्या.
लाईटचा शोध लावणाऱ्या एडिसनलासुद्धा, त्याची स्वतःची कंपनी उभी करण्यासाठी जेपी मॉर्गन त्यांनी मदत केली होती. १८९१ साली एडिसन जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे होस्टेन इलेक्ट्रिक कंपनीमध्ये विलीनीकरण करून त्यांनी जनरल इलेक्ट्रिक कंपनी चालू केली. जी आजही अमेरिकेतली सर्वात मोठी कंपन्यांपैकी एक आहे.
मागील एका लेखामध्ये आपण अँड्र्यू कार्नेगी यांची माहिती पाहिली आहेच. याच कार्नेगी यांची सर्वात मोठी “कार्नेगी स्टील कंपनी” सुद्धा १९०१ मध्ये मॉर्गन यांनी खरेदी केली आणि “युनायटेड स्टील कार्पोरेशन” ही सर्वात मोठी स्टील कंपनी उभी केली.
तो काळ असा होता जेव्हा अमेरिकेत कोणतीच सेंट्रल बँक नव्हती. त्यामुळं लोन घेणं, पैसे पुरवणं या गोष्टी होत नव्हत्या. यावेळी जेपी मॉर्गन यांनी मंदीच्या काळात केवळ उद्योगधंद्यांनाच नाही, तर अगदी अमेरिकन सरकारला देखील पैसे पुरवले आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम केलेलं होतं. पुढे एक वेळ अशी आली, की अमेरिकेची संपूर्ण बँकिंग व्यवस्था ही मॉर्गन यांच्या हातात गेली होती. तेव्हा १९१३ मध्ये अमेरिकन सरकारने पहिली सेंट्रल बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह सिस्टीम सुरू केली.
मॉर्गन यांच्या यशाची यादी केली लक्षात येईल की, अमेरिकेतील फायनान्स इंडस्ट्री, बँकिंग इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, रेलरोड इंडस्ट्री, पॉवर इंडस्ट्री या सर्व मोठ्या उद्योगांवर फक्त मॉर्गन यांचच वर्चस्व होतं.
१९१३ मध्ये वयाच्या ७५व्या वर्षी, जेपी मॉर्गन यांनी जगाचा निरोप घेतला. सन 2000मध्ये मॉर्गन यांची कंपनी, चेज या कंपनीसोबत जोडली गेली आणि “जेपी मॉर्गन अँड चेज कंपनी” म्हणून नावारूपाला आली. मार्केट कॅपिटलायझेशनचा विचार करता ही जगातील सर्वात मोठी बँक आहे. तेल कंपन्यांना कर्ज देण्याच्या बाबतीत ही बँक जगात आघाडीवर आहे.
त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते 48 मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. असे नाही की त्यांना कधीच कोणते अपयश आले नाही, पण येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये संधी शोधत ते पुढे जात राहिले. मॉर्गन आजच्या तरुणाईला हाच संदेश देतात की, तुम्ही कितीही श्रीमंतीत जन्माला आला तरी, तुमचं कर्तृत्व आणि स्वबळावर उभं केलेलं तुमचं विश्व, हेच तुम्हाला कीर्ती मिळवून देतं.
तर ही होती जेपी मॉर्गन यांची जीवन कहाणी. हा व लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
आणखी वाचा
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या
- अवघ्या भारताच भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली?