भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…
आधुनिक जगात चमत्काराचे दुसरे नाव आहे विज्ञान, कारण केवळ विज्ञानाच्या जोरावर पृथ्वीवर वावरणारा माणूस थेट चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. विज्ञानाच्या मदतीने अशक्य गोष्ट देखील शक्य करणं सहज शक्य आहे असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. भारतीय विज्ञान शास्त्राचा इतिहास बराच जुना आणि गाढा आहे, मात्र कालांतराने आपण हा धनाचा पेटारा कधी उघडून बघितलाच नाही आणि आताच्या घडीला सर्व संशोधनांचं श्रेय मात्र कुणा वेगळ्याच माणसाला दिलं जातंय.
आनंदाची बाब म्हणजे भारताने पुन्हा एकदा प्रगतीचा मार्ग पकडला आहे. वर्ष १९६३ मध्ये भारताकडून पाहिलं रॉकेट लॉंच करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार सर करत आपण चांद्रयान-२ ची मोहीम यशस्वी करून दाखवली. प्रत्येक भारतीयासाठी चांद्रयानाची मोहीम श्वास रोखून धरणारीच होती. भारताच्या अंतराळ प्रवासात अनेक बुद्धिवंतांनी योगदान दिलं आणि यातीलच म्हत्त्वाचे नाव म्हणजे विक्रम साराभाई. एवढं महत्त्वाचं का? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
विक्रम साराभाई कोण आहेत?
विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे (Indian Space Research Programme) जनक म्हणून ओळखलं जातं आणि आज विक्रम साराभाई यांची १०५वी जयंती आहे. वर्ष १९१९ मध्ये विक्रम साराभाई यांचा जन्म गुजरातमधील एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते, तर आई सरला देवी मॉंटेसरी शिक्षण पद्धतीवर आधारित द रिट्रीट नावाची शाळा चालवायच्या.
विक्रम साराभाई यांच्या जन्माचा काळ पारतंत्र्याचा असल्याने त्यांच्या घरी सतत स्वातंत्र्यसैनिकांची ये-जा असायची, परिणामी महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद यांच्याशी साराभाईंनी बालपणीच संवाद साधला होता. विक्रम साराभाई यांचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं, सोबत अशा दिग्गजांचा सहवास लाभला म्हणूनच लहानग्या विक्रम यांच्यात देशभक्तीचं बाळकडू तेव्हाच रुजलं होतं.
कळत्या वयात अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि १९३९ साली रसायन आणि भौतिकशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर बी.ए. आणि एम.ए.च्या पदव्या देखील पदरात पडून घेतल्या. विक्रम साराभाई यांचा शैक्षणिक प्रवास मात्र इथेच थांबत नाही, दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी भारतात परतलेल्या विक्रम साराभाई यांनी वर्ष १९४० मध्ये पीएच. डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट मिळवली आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी ही पदवी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली होती.
विक्रम साराभाई यांचा वैज्ञानिक प्रवास:
वर्ष १९४७ रोजी भारत देश इंग्रजांच्या जुलुमी राजवटीतून मुक्त झाला आणि त्यानंतर विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक प्रवासाची खरी सुरुवात देखील झाली. स्वतःच्या राहत्या घरातील एका खोलीमधून विक्रम साराभाई यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळेचा श्रीगणेशा केला होता. या जागेचे ऐतिहासिक महत्त्व देखील अपार आहे, कारण इथूनच अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे काम सुरु झाले होते. विक्रम साराभाई भौतिक प्रयोगशाळेची गरज जाणून होते, म्हणूनच मित्रांच्या आणि पालकांच्या साहाय्याने त्यांनी अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या एम्. जी. सायन्स इन्स्टिट्यूटमधे भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा उभारली, हीच अहमदाबादची फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी होय. विक्रम साराभाई काही काळ इथे प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत होते आणि त्यानंतर संचालक म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयोगशाळेमध्ये किरणविज्ञान, अवकाशविज्ञान आदींवर संशोधन केलं जायचं.
इस्रोची सुरुवात:
कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण आज जगभरात नाव गाजवणाऱ्या ISRO ची सुरुवात विक्रम साराभाई यांनी वयाच्या २८व्या वर्षी केली होती. आपल्याला ज्या वयात नेमकं काय करिअर निवडावं याची खात्री नसते किंवा आपण तारुण्याच्या ओघात वहावत जात असतो. त्याच वयात साराभाईंनी ISROची निर्मिती केली होती. सरकार दरबारी पायऱ्या झिजवून, सरकारला भौतिकशास्त्राचे महत्त्व पटवून देत साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन समितीची (INCOSPA) निर्मिती केली, ज्याचे नाव पुढे बदलून भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO असे करण्यात आले.
भारताकडून आर्यभट्ट नावाचा पहिला अंतरिक्ष उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता, ज्याची रचना अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आली होती. आर्यभट्टच्या यशस्वी उड्डाणानंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आणि या सर्वांमध्ये विक्रम साराभाई यांचा वाटा महत्वाचा होता.
पहिले रॉकेट लॉंच:
वर्ष १९६३ मध्ये केरळमधील थुंबा नावाच्या गावातून चर्चची जमीन विकत घेण्यात आली, जिथे नंतर थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची (TERLS) स्थापना करण्यात आली. याच ठिकाणी भारताचं पहिलं रॉकेट लाँच करण्यात आलं होतं. आज याच लॉंचिंग स्टेशनला विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणून ओळखलं जातं. डॉ. अब्दुल कलाम देखील त्यांच्या यशाचे श्रेय डॉ. विक्रम साराभाई यांनाच देतात, डॉ. अब्दुल कलाम म्हणतात की, “मी शिक्षणात कधीच गुणवान नव्हतो. केवळ माझी मेहनत बघून डॉ. साराभाई यांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली.”
विविध संस्थांची स्थापना:
डॉ. विक्रम साराभाई यांनी विविध संस्थांच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असो किंवा टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन साराभाई यांनी नेहमीच देशाला नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) व्यतिरिक्त ऑपरेशन रिसर्च ग्रुप, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन आणि पत्नी मृणालिनी साराभाई यांच्या सहकार्याने त्यांनी दर्पण ॲकॅडमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली.
स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (हैदराबाद), युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (जादुगुडा, बिहार), आणि कम्युनिटी सायन्स सेंटर (अहमदाबाद) यांसारख्या संस्थांमध्येही डॉ. विक्रम साराभाई यांचा मोठा वाटा उचलला आणि यांच्या नेतृत्वाखाली या सर्व संस्थांनी विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आणि सांस्कृतिक क्षेत्रांत भारताने एक नवी उंची गाठली आहे. एवढंच नाही तर डॉ. होमी भाभा यांच्या निधनानंतर डॉ. साराभाई यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी उत्तमरित्या पार पडली होती. आज या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला १०५ व्या जयंतीनिमित्त सादर अभिवादन…