लेखउद्योजकताबिझनेस स्टोरीझ

D Mart : जाणून घ्या डी-मार्टच्या यशाचं सिक्रेट!

D Mart : आजच्या स्पर्धेच्या दुनियेत जिथे मोठ्या कंपन्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करतात, तिथे एक अशी कंपनी आहे जिने जाहिरातींशिवाय प्रत्येक भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मनात घर केलंय ती म्हणजे डी-मार्ट. भारतातातील श्रीमंत आणि मोठ्या उद्योगपतींच्या यादीत नेहमीच मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या नावाचा उल्लेख दिसतोच. कारण भारतीय कॉर्पोरेट जगतात त्यांनी वीज, तेल, डेटा ते बंदरांपर्यंत अर्थव्यवस्थेवर पकड मिळवली आहे. मात्र, आज रिटेल मार्केटमध्ये रिलायन्स रिटेलसारखे बलाढ्य स्पर्धक असतानाही डी-मार्टने आपली वेगळी ओळख कशी जपली? कमी नफा, जास्त विक्री हे मॉडेल कसे यशस्वी ठरले? याचे सविस्तर उत्तर या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया…

२००२ मध्ये पवईत सुरू झालेलं एक छोटं दुकान आज ३०० हून अधिक स्टोअर्सपर्यंत पोहोचलं आहे. आज प्रत्येक शहरात तुम्हाला डी-मार्ट असल्याचे पाहायला मिळेल आणि या डी-मार्टचे शिल्पकार आहेत राधाकिशन दमाणी. शेअर बाजारात ज्यांना गुरु मानलं जातं, अशा एका साध्या, पांढऱ्या कपड्यांतील माणसाने वयाच्या ४५ व्या वर्षी जेव्हा रिटेल क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा अनेकांना वाटले की हे शक्य होणार नाही. पण राधाकिशन दमाणी यांनी केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर ते सत्यात उतरवलं आणि घराघरात पोहोचवलं. 

१) स्वतःच्या मालकीची जागा 

डी- मार्टच्या यशाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे मालकीची जागा. डी-मार्टची बहुतांश स्टोअर्स ज्या जमिनीवर आहेत, ती जागा कंपनीच्या मालकीची आहे. अंबानींची रिलायन्स असो वा इतर रिटेल साखळ्या, बहुतांश कंपन्या मॉल्समध्ये किंवा शहरांच्या मोक्याच्या ठिकाणी भाड्याने जागा घेतात. पण दमाणींनी सुरुवातीपासूनच ओनरशिप मॉडेलकडे लक्ष केंद्रित केले. कारण मालकीची जागा असल्यामुळे दरमहा वाचणारे कोट्यवधींचे भाडे डी-मार्टला ग्राहकांना डिस्काउंटच्या स्वरूपात देता येते. दमाणी यांची ही रिअल इस्टेटची खेळीच डी-मार्टचा खरा पाया ठरली.

 २) लो-कॉस्ट मॉडेल स्ट्रॅटेजी 

D Mart : दुसरी महत्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे सप्लायर इज किंग. कोणत्याही व्यवसायात माल खरेदी केल्यावर पैसे द्यायला महिना-दोन महिने लागतात. पण डी-मार्ट आपल्या पुरवठादारांना (Suppliers) १० ते १५ दिवसांत पैसे देतात. यामुळे काय होतं? पुरवठादार आनंदाने डी-मार्टला इतर कंपन्यांपेक्षा २-३% जास्त सूट देतात. तुम्ही आम्हाला लवकर पैसे द्या, आम्ही तुम्हाला माल स्वस्त देऊ, हा साधा व्यवहार डी-मार्टला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. जेव्हा कंपनीला माल स्वस्त मिळतो, तेव्हाच ते ग्राहकांना स्वस्तात विकू शकतात. हे लो-कॉस्ट मॉडेल डी-मार्टने इतक्या शिस्तीने पाळले, की आज राधाकिशन दमाणी यांना टक्कर देण्यासाठी मोठ्या कॉर्पोरेट कंपन्याही स्पर्धेत संघर्ष करत आहेत. 

३) जाहिरातीवर शून्य खर्च

जिथे मोठं-मोठ्या कंपन्या मार्केटमध्ये टिकण्यासाठी जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करतात तिथेच डी- मार्टने आपले वेगळेपण सिद्ध केले. तुम्ही टीव्हीवर डी-मार्टच्या मोठ्या जाहिराती क्वचितच पाहिल्या असतील. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा ग्राहकच त्यांची जाहिरात करतो. डी-मार्टच्या स्टोअरमध्ये कधी गेलात तर तुम्हाला तिथे रोबोट्स किंवा खूप महागडे इंटिरिअर दिसणार नाही. कारण त्यांनी स्टोअर्सच्या चकाकीवर नाही तर कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केले. डी-मार्टमध्ये सर्व गरजेच्या वस्तू स्वस्तात मिळतात, नेहमीच काही ना काही ऑफर्स असतात ही माउथ पब्लिसिटीच त्यांची सर्वात मोठी जाहिरात आहे. 

अंबानी-अदानींच्या स्पर्धेत दमाणी सरस कसे ठरले? 

D Mart : मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलकडे अफाट पैसा आणि तंत्रज्ञान आहे. त्यांनी ऑनलाइन (JioMart) आणि ऑफलाईन (Reliance SMART BAZAAR) अशा दोन्ही आघाड्यांवर आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे, अदानी समूह प्रामुख्याने लॉजिस्टिक आणि बॅकएंडमध्ये मजबूत आहे. पण दमाणी यांनी या दोघांशी थेट स्पर्धा न करता आपली एक वेगळी जागा निर्माण केली. त्यांनी कधीही हाय-फाय ग्राहकांना लक्ष्य केलं नाही. त्यांनी उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवलं. जिथे रिलायन्स झपाट्याने विस्तार करत आहे, तिथे डी-मार्ट हळू पण अत्यंत विचारपूर्वक पावलं टाकत आहे. दमाणी आजही फक्त नफा देणाऱ्या लोकेशन्सवरच स्टोअर सुरू करतात. डी-मार्टच्या यशाचं आणखी एक गुपित म्हणजे त्यांनी कधीही एका रात्रीत शेकडो स्टोअर्स उघडले नाहीत. आधी एक स्टोअर नफ्यात आले की मगच दुसरे उघडायचे हे त्यांचे मुख्य धोरण होते. क्लस्टर बेस्ड अप्रोच वापरून त्यांनी एकाच शहरात किंवा जवळच्या भागात स्टोअर्स वाढवली, जेणेकरून मालाची ने-आण करण्याचा खर्च कमी होईल. आज रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करतानाही डी-मार्टचा फोकस स्टेबल राहिलेला दिसतोय. 

या संपूर्ण माहितीनंतर राधाकिशन दमाणी यांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की व्यवसायात टिकण्यासाठी फक्त भांडवल असून चालत नाही, तर कामाची एक शिस्त लागते. जाहिरातींच्या आवाजापेक्षा कामाचा दर्जा आणि ग्राहकाचा फायदा मोठा असतो, हे डी-मार्टने सिद्ध केलंय. जर तुम्ही कोणताही छोटा व्यवसाय करत असाल, तर दमाणी यांच्या या तत्त्वांचा वापर करून तुम्हीही तुमच्या क्षेत्रातील किंग बनू शकता. डी-मार्टची ही कहाणी केवळ एका व्यवसायाची प्रगती नाही, तर ती प्रत्येक भारतीयाला स्मार्ट ग्राहक बनवण्याची एक चळवळ आहे. म्हणूनच आज डी-मार्ट हे केवळ दुकान राहिलं नसून ते भारतीय मध्यमवर्गीयांच्या विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button