Top 5 Business – गृहिणींसाठी टॉप 5 व्यवसाय


पूर्वीच्या काळात फक्त चूल आणि मूल आणि वंश विस्तारासाठी वापरलं जाणारं साधन, एवढीच स्त्रियांची ओळख होती. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत, अर्थार्जनात सहसा स्त्रियांचा वाटा नसायचा. त्यांचं काम फक्त घर आणि मुलं सांभाळणं इथपर्यंतच मर्यादित.
पण काळ बदलला तसे लोकांचे विचारही बदलले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या काही स्त्रिया मुलींसाठी लढल्या आणि चित्र बदलत गेलं. समाज साक्षर होत गेला आणि मुलींनीही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी सोडल्या नाहीत.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियाही व्यवसायात उतरू लागल्या..आणि यशस्वी देखील झाल्या…
आजही अनेक गृहिणींना स्वतःचं काहीतरी करावं, व्यवसाय सुरू करावा, अशी इच्छा असते पण योग्य मार्गदर्शनाची कमतरता भासते..
घरातील खर्चाला आपल्या परीने हातभार लावावा आणि स्वतःही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे, अशी अनेक गृहिणींची इच्छा असते. अश्यावेळी आपल्या छंदाचे, आवडीचे रुपांतर आपण घरगुती म्हणजेच घरबसल्या करता येणाऱ्या व्यवसायात करू शकतो. यामुळे आवड जपल्याचे, छंद पूर्ण करण्याचे समाधान मिळेल, शिवाय यातून अर्थार्जन सुद्धा होईल.
आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण असे 5 व्यवसाय पाहणार आहोत ..जे कोणतीही गृहिणी अगदी कमी भांडवलात आणि घरबसल्या सुरू करू शकते.
1. फूड डिलिव्हरी व्यवसाय :
आजच्या धावपळीच्या युगात घरगुती जेवणाचे महत्त्व वाढले आहे. तुम्ही स्थानिक ग्राहकांसाठी घरगुती जेवण तयार करून ते डिलिव्हरी करू शकता. बऱ्यापैकी मुलं – मुली शिक्षणासाठी, नोकरीसाठी आपलं घर सोडून बाहेर राहत असतात. अशा वेळी त्यांना रोजचं बाहेर खाणं खिशाला आणि आरोग्याच्या दृष्टीनेही परवडत नाही, ही गरज ओळखून तुम्ही घरगुती मेस किंवा टिफिन सर्विस सुरू करू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या पाककृतींचा एक मेन्यू तयार करावा लागेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तसेच Mouth Publicity करून त्याची जाहिरात करावी लागेल.
आवश्यकता :
- स्वच्छता आणि सुरक्षिततेचा विचार
- चविष्ट आणि रुचकर जेवण
- सर्वसामान्यांना परवडणारे दर
2. हँडमेड प्रोडक्ट्स :
घरगुती आणि हाताने बनवलेल्या वस्तूंकडे लोकांचा कल वाढत आहे. जर तुम्हाला हस्तकला आवडत असेल किंवा तुमच्यात ते कौशल्य असेल तर तुम्ही हँडमेड प्रोडक्ट्स तयार करून त्याची विक्री करू शकता. सोप्या दागिन्यांपासून ते सजावटीच्या वस्तूंपर्यंत, या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्ही विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म उदा. Etsy, Instagram, Meesho वर तुमच्या उत्पादनाची विक्री करू शकता.
आवश्यकता :
- कलात्मकता
- चांगल्या मार्केटिंग कौशल्यांचा वापर
- वेळेवर सेवा
3. टयूशन्स :
जर तुम्ही शिकलेले असाल आणि तुम्हाला एखादी संकल्पना दुसऱ्याला सोप्या पद्धतीने आणि समजेल अश्या भाषेत समजावून सांगता येत असेल, तर तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करून ऑनलाइन ट्यूटर म्हणून काम करू शकता. विविध विषयांमध्ये तुम्हाला शिकवण्याची आवड असेल, तर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरू शकता. तसेच घरगुती शिकवणी देखील घेऊ शकता.
आवश्यकता :
- विषयाची योग्य माहिती
- शिकवण्याची हातोटी
- ऑनलाईन टयूशन्स साठी मोबाईल किंवा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन
4. डे केअर सेवा :
शहरी भागात डे केअर सेंटर किंवा पाळणाघरे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. ज्या महिलांना लहान मुलांची आवड आहे, त्यांच्यासाठी पाळणाघर किंवा डे केअर हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. नोकरदार महिला आपल्या मुलांना घरासारखे वातावरण मिळावे आणि प्रेमाने तसेच आवश्यक ती काळजी घेऊन त्यांची मुले सांभाळली जातील अश्या पाळणाघरांना प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळे घरच्या घरी करता येणारा हा व्यवसाय फायदेशीर आहे.
घरातच थोडी रिकामी, मोकळी हवा येणारी जागा असेल तर तेथेच हा व्यवसाय सुरु करता येतो. महिलांमध्ये मुळातच वात्सल्य हा गुण असतो. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मुलांचा तुम्ही प्रेमाने सांभाळ करता असे एकदा दिसून आले की तुमच्या डे केअर ची जाहिरात या मुलांच्या पालकांकडूनच मोठ्या प्रमाणावर केली जाते.
आवश्यकता :
- जास्त संख्येने मुले असतील तर कुटुंबियांची मदत लागेल किंवा मदतनीस ठेवावी लागते.
- तसेच जेथे मुले आहेत तेथील जागेची स्वच्छता, शांतता, मुलांच्या खाण्यापिण्याची चोख व्यवस्था ठेवणे आवश्यक असते.
- मुलांना खेळण्यासाठी पुरेशी खेळणी, त्यांना झोपाविण्यासाठी योग्य व्यवस्था हवी. थोडे भांडवल घालून अशी व्यवस्था करता येते.
5. Freelance लिखाण :
जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल, तुमच्यात लेखन कौशल्य असेल आणि एखाद्या विषयाची मांडणी आकर्षकपणे करण्याची हातोटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही Freelance लेखक म्हणून काम करू शकता. तुम्ही ब्लॉग पोस्ट, लेख किंवा कॉपीराइटिंगसारख्या विविध प्रकारचे लिखाण करू शकता. अनेक कंपन्या आणि वेबसाईट्स त्यांच्यासाठी Freelance लेखक शोधत असतात.
आजकाल ई कॉमर्स व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. त्यासाठी थोडक्यात, आकर्षक स्वरुपात, सहज सोपा, व्यवसायाची माहिती करून देणारा मजकूर लिहून देणे असे या कामाचे स्वरूप आहे. व्यवसायात स्पर्धा वाढल्याने स्पर्धकापेक्षा आपली उत्पादने अधिक चांगली कशी हे ग्राहकांवर ठसविण्यासाठी अश्या मजकुराची आवश्यकता असते.
याशिवाय स्वतःची Blogging Website सुरू करून देखील तुम्ही त्यावर लिखाण करू शकता.
आवश्यकता :
- आवड
- उत्कृष्ट लिखाण कौशल्य
- मार्केटिंगच्या साधनांची माहिती
- वेळेचं व्यवस्थापन
- असे अनेक व्यवसाय गृहिणींना करता येऊ शकतात. ठरवलं तर सर्व शक्य आहे.
- इच्छाशक्ती, योग्य व्यक्तींचे सल्ले आणि कुटुंबाला विश्वासात घेऊन तुम्हीही तुमच्या पायावर खंबीरपणे उभे राहू शकता…..
- आता वेळ आली आहे एका गृहिणीची ताकद समाजाला दाखवून देण्याची..



