आईचे दागिने विकून सुरू केलेला व्यवसाय आज १३,००० कोटींचा ब्रँड बनला | Lalitha Jewellery


किरण कुमार हे नाव आज सोन्याच्या दागिन्यांच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांच्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने ‘ललिता ज्वेलरी’ हा ब्रँड भारतातील लाखो लोकांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. दर्जा, परवडणाऱ्या किमती, आणि उत्कृष्ट डिझाईन्स यामुळे हा ब्रँड आज घरोघरी पोहोचला आहे. मात्र, या यशस्वी प्रवासामागे किरण कुमार यांचा संघर्ष आणि कष्टांची महत्त्वाची भूमिका आहे. हे यश एका रात्रीत मिळालेलं नाही. अत्यंत गरिबीतून प्रवास सुरू करणाऱ्या किरण कुमार यांनी कष्ट, अपयशांचा सामना आणि सतत शिकण्याच्या वृत्तीने हे साम्राज्य उभं केलं आहे. त्यांचा संघर्षमय प्रवास हा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आज या लेखात आपण त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि ‘ललिता ज्वेलरी’ च्या यशामागील प्रवासाचा आढावा घेणार आहोत.
प्रारंभिक जीवन आणि आव्हाने
किरण कुमार यांचा जन्म १९६० च्या दशकात आंध्र प्रदेशातील नेल्लोर शहरात एका सामान्य कुटुंबात झाला. ते आपल्या आईवडिलांचे आठवे अपत्य होते. त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूतीने स्थिर नव्हतं. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सोनारांसाठी खाती लिहिण्याचा होता, पण त्या व्यवसायातून फारसा नफा मिळत नव्हता. त्यामुळे कुटुंबाला कायमच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लहानपणीच त्यांनी गरिबीचं कठोर आणि दाहक सत्य अनुभवलं, आणि हाच अनुभव पुढे त्यांच्या आयुष्यात एक मोठं धाडस आणि प्रेरणा बनला.
शालेय शिक्षणात त्यांना विशेष रस नव्हता. अनेक वेळा त्यांना काय शिकवलं जात आहे, हेच कळत नव्हतं. आणि यामुळे प्रगती करण्यात अडचणी येत होत्या. एकदा त्यांचे शिक्षक चेष्टा करत म्हणाले होते, “तू जर तोंडपाठ अक्षर बोलू शकलास, तर आम्ही तुला पास करू.” ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत, जीवनातील संघर्षांकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आणि अखेर आपला मार्ग शोधला.
सुरुवातीचा संघर्ष आणि यशाचा पाया
किरण कुमार यांचा संघर्ष वयाच्या १५ व्या वर्षीच सुरू झाला, जेव्हा त्यांनी आपल्या आईच्या चार सोन्याच्या बांगड्या विकून ज्वेलरी व्यवसायात पाऊल ठेवलं. इतर मुलं शिक्षण घेत असताना, कुमार कुटुंबाच्या पालनहार बनण्यासाठी काम करत होते. त्यांनी कुशल कारागिरांकडून दागिन्यांची निर्मिती शिकली आणि ग्राहकांच्या आवडी-निवडी समजून घेतल्या. ते ज्वेलरीच्या दुकानात ३०-४० रुपयांच्या कमी पगारावर काम करू लागले. हळूहळू, व्यवसायाच्या गुपितांचा अभ्यास करून ते या क्षेत्रात उतरले.
१९८३ मध्ये त्यांनी चेन्नईत ‘ललिता ज्वेलरी’चे पहिले शोरूम उघडलं, जे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचं पाऊल ठरलं. ‘ललिता ज्वेलरी’ने गुणवत्ता, परवडणारे दर आणि पारदर्शकतेचे तत्त्वं पालन करत ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं. कमी भांडवल असूनही, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर व्यवसाय वाढवला.
मात्र,तत्कालीन गोल्ड कंट्रोल ऑर्डरच्या अंमलबजावणीमुळे आभूषण उद्योगावर मोठा परिणाम झाला आणि त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत आलं. त्या कठीण काळातील आठवणी अजूनही त्यांच्या मनात आहेत. परंतु त्यांच्या कष्टांमुळे आणि धैर्यामुळे सगळं सुरळीत होऊन व्यवसायात वाढ झाली. सुरुवातीला दक्षिण भारतातील महिलांना लक्ष करून त्यांनी तिरुपती, चेन्नई आणि हैदराबादमध्ये शोरूम उघडलं. त्यांच्या ब्रँडचे मुख्य आकर्षण म्हणजे कमी मेकिंग चार्जेस आणि उच्च दर्जाचे दागिने आहेत.
कठीण प्रसंगातून उभा राहिलेला ब्रँड
१९९९ साली मोठ्या अडचणींना सामोरे जात असलेल्या ‘ललिता ज्वेलरी’च्या संपूर्ण जबाबदारीचा भार कुमार यांनी आपल्या खांद्यावर घेतला. त्यांनी ग्राहक-केंद्रित धोरणं राबवत कंपनीला नवीन दिशा दिली आणि विस्ताराला गती दिली. यामुळे ललिता ज्वेलरीने भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण केली. ग्राहकांचा विश्वास हा ब्रँडच्या यशाचा मुख्य आधार ठरला.
सध्या ललिता ज्वेलरीच्या भारतभर ५३ शाखा असून, ३२,००० हून अधिक कर्मचारी काम करतात. कंपनीची वार्षिक उलाढाल १३००० कोटींवर पोहोचली आहे. मुंबई, कोलकाता, केरल आणि कोईतुंबर मधील डिझायनर्स ग्राहकांच्या बजेटनुसार हलक्या वजनाचे, पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्स तयार करतात. गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर ललिता ज्वेलरी आज यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहे.
मित्रांनो,ललिता ज्वेलरीची यशोगाथा ग्राहकांच्या विश्वासाने आणि गुणवत्तेच्या वचनबद्धतेने लिहिली गेली आहे. कंपनीने नेहमीच ग्राहक-केंद्रित धोरणे राबवून त्यांच्या अपेक्षांना प्राधान्य दिले आहे. पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्सच्या माध्यमातून ग्राहकांचे स्वप्न साकार करताना त्यांनी सर्व स्तरांवर आपली ओळख मजबूत केली आहे.
ललिता ज्वेलरी आज केवळ दागिन्यांची कंपनी नसून, विश्वासाचा एक बुलंद ब्रँड बनला आहे. लाखो समाधानी ग्राहक आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे कंपनीने यशाच्या उंच शिखरावर पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. भारतीय बाजारपेठेत आपली ठसा उमटवल्यानंतर, ललिता ज्वेलरीने आंतरराष्ट्रीय स्तरावरही गुणवत्ता आणि विश्वासाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
त्यांचा प्रवास असाच अविरतपणे सुरू राहो अशी सदिच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी अर्थक्रांतीकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
- अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी
- आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा
- शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…




