Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय


Pet Industry Business: काही उद्योजक त्यांच्या उद्योगात, व्यवसायात यशस्वी होतात व काही व्यवसाय अयशस्वी होऊन बंद पडतात. काही जणांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामागे बरीच कारणे आहेत, त्यापैकी योग्य व अचूक व्यवसाय क्षेत्र निवडणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. सध्या पाळीव प्राणी व त्यांच्याशी संबंधित उत्पादने म्हणजेच पेट (Pet) इंडस्ट्री हे एक असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास कायम उत्सुक असतात. बदलत्या काळानुसार कुत्र्या- मांजरासह इत्यादी पाळीव प्राण्यांच्या संगोपणसाठी सुविधा पुरवण्याच्या या व्यवसायाला मोठी गती प्राप्त झाली आहे. मोठ- मोठ्या शहरांमध्ये प्राण्यांसाठी खास ग्रूमिंग सेंटर्स उभी राहिली आहेत.
सध्या भारतात या क्षेत्रात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे लोकांची जीवनशैली खूप वेगाने बदलत आहे. आजकाल उच्चभ्रू वस्त्यांमध्ये व शहरी भागात पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण तुलनेने वाढत आहे. बऱ्याच जणांना एकटेपणा आल्याने ते घरात पाळीव प्राणी पाळतात, तर काही मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आपल्या ग्राहकांना पाळीव प्राणी पाळण्याचा सल्ला देतात. बऱ्याच लोकांना मूलबाळ नसल्यास तेही पाळीव प्राणी पाळतात, तर काहीजण केवळ एक आकर्षण/फॅड म्हणून प्राणी पाळतात. बऱ्याच जणांना पशुपालनाची आवड असते. असे पशुप्रेमी एकापेक्षा अधिक प्राणी (कुत्रे, मांजर, पक्षी) आपल्या घरात पाळतात.
आजकाल बऱ्याच घरांमध्ये देशीविदेशी प्राण्यांच्या जाती पाहायला मिळतात. या सर्व कारणास्तव या व्यवसायास मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच शहरी भागात हा व्यवसाय नेहमीच फायद्याचा आहे.
Pet Industry Business: शहरात व उच्चभ्रू वसाहतीत पाळीव प्राणी पाळण्याची हौस आणि छंद जवळपास सर्वच लोकांना असतो. या व्यवसाय क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. विविध देशी विदेशी जातीच्या प्राण्यांचे ब्रीडिंग, उत्पादन त्याची विक्री, पशुखाद्य निर्मिती व विक्री, पेट (Pet) केअर, पेट (Pet) शेल्टर, पेट (Pet) मेडिसिन, पेट (Pet) पार्लर्स, पेट (Pet) शो, पेट (Pet) गेम्स, पेट (Pet) सलून अशा अनेक प्रकारचे व्यवसाय व ब्रँड्स आज बाजारात नावारूपास आले आहेत. त्यामुळे नवउद्योजकांसाठी हे एक आकर्षक व्यवसाय क्षेत्र आहे, ज्यामध्ये पुष्कळ संधी उपलब्ध आहेत व यशाची खात्री आहे.
पेट (Pet) इंडस्ट्री व्यवसायातील यशाच्या खात्रीची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत :
- सर्वात महत्त्वाचे कारण या व्यवसायात प्राणी व त्यांच्यासंबंधित सर्व उत्पादनांना बाजारात कायम वाढती मागणी असते.
- अगदी मंदीच्या काळातही या व्यवसाय क्षेत्रावर फारसा फरक पडत नाही व आर्थिक संकटांचा त्रास होत नाही. उलट मंदीच्या काळातही कुत्रे व मांजरांच्या विविध जातीची मागणी स्थिर होती.
- हा व्यवसाय वर्षभर चालतो, त्यामुळे कॅशफ्लोमध्ये सातत्य टिकून राहते. या व्यवसायातील ग्राहक हे त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी खर्च करण्यास संकोच करत नाहीत.
- तसेच ग्राहकांना जास्त माहिती पुरवावी लागत नाही, त्यांना कोणतेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही, कारण पाळीव प्राणी पाळणाऱ्यांना त्यांच्या प्राण्यांचे आरोग्य, सवयी, प्रशिक्षण व त्यांचे मनोरंजन कसे करावे याबद्दल अगोदरपासून माहिती असते. ते लोक सर्व बाबतीत आधीपासूनच जागरूक असतात.
- पाळीव प्राण्यांच्या पिल्लांबद्दल लोकांना खूप आकर्षण असते. त्यामुळे बाजारात त्यांमध्येही खूप विविधता दिसते व त्यास ग्राहकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळतो.
- या व्यवसाय वृद्धीचे सर्वात मोठे कारण म्हणजे मार्जिन. या क्षेत्रात एकूण गुंतवणुकीच्या ५० ते ६० टक्के नफा मिळतो. कुत्रे व मांजरांच्या पिल्ल्यांच्या खाद्य उत्पादनांमध्ये ४० ते ५० टक्के मार्जिन मिळते, तर त्यांच्यासाठी लागणाऱ्या खेळण्यांमधून ७० टक्के मार्जिन मिळते. पशुखाद्य उत्पादनातून सर्वात जास्त मार्जिन मिळते आणि त्याची मागणी बाजारात वर्षभर असते.
- आजकाल पेट (Pet) फॅशनमधूनसुद्धा चांगले उत्पन्न मिळते.
- सर्वसाधारणपणे पाहता या व्यवसायात पाळीव प्राणी व त्यांच्या संबधित सर्व उत्पादनांची मागणी वाढते आहे व ती निरंतर वाढतच राहील यात शंका नाही, हे मार्केट रिटेलर्सनाच नव्हे, तर व्यावसायिकांनासुध्दा आकर्षित करत आहे आणि दरवर्षी १० ते २० टक्यांनी वाढत आहे, कारण पाळीव प्राण्यांचे मालक त्यांच्या प्राण्यांच्या पालन- पोषणासोबतच त्यांचे मनोरंजन, आरोग्य यासाठी कितीही पैसे खर्च करायला तयार असतात.
- पाळीव कुत्रे पाळणारे मालक अंदाजे १० ते १५ हजाररुपये दरवर्षी खर्च करतात, तर मांजरांसाठी दरवर्षी किमान १२ ते १५ हजार रुपये खर्च करतात.
Pet Industry Business: व्यवसायाच्या या संधीचा फायदा आपण घेतलाच पाहिजे. या प्रत्येक व्यवसायामध्ये आपली पशुपालनाची आवड ही जोपासली जाते व पैसेही कमावता येतात.
वाचक मित्रहो, बिझनेसची ही नवीन कल्पना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
- ‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार
- SEO 2026: तुमच्या व्यवसायासाठी डिजिटल यशाचा आधुनिक आणि प्रभावी मार्ग
- किती सबस्क्राइबर्स नंतर कोणते YouTube प्ले बटण?



