आपण रोज ऐकतो आज सोन्याचा भाव वाढला, आज सोनं स्वस्त झालं. पण हा भाव नक्की ठरवतो कोण? सरकार? ज्वेलर्स? की आंतरराष्ट्रीय बाजार? खरं सांगायचं तर सोन्याचा भाव हा कोणत्याही एका व्यक्ती किंवा संस्थेने ठरवलेला नसतो. तो पूर्णपणे डिमांड आणि सप्लाय या मूलभूत आर्थिक तत्त्वावर आधारित असतो. म्हणजेच, जेव्हा सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी असतो, तेव्हा भाव वाढतो.

आणि जेव्हा मागणी कमी होते, तेव्हा भाव खाली येतो. पण इतकंच नाही यामागे अनेक मोठे घटक काम करत असतात. आपल्या भारतात आणि परदेशात सोन्याचे भाव कसे आणि कोण ठरवतात? हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा… 

भारताच्या संदर्भात विचार केला तर, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ही संस्था देशांतर्गत सोन्याचे दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. IBJA दररोज देशातील आघाडीच्या सोने व्यापाऱ्यांकडून दरांची माहिती घेते आणि त्यांची सरासरी काढून ‘सकाळ’ व ‘संध्याकाळ’ असे दोन अधिकृत दर जाहीर करते. भारतातील बहुतेक सराफ, बँका आणि वित्तीय संस्था याच दरांचा वापर करतात.

मात्र, सोन्याचा अंतिम भाव ग्राहकापर्यंत पोहोचताना त्यामध्ये केंद्र सरकारचे आयात शुल्क (Import Duty), कृषी उपकर आणि ३% जीएसटी (GST) यांचा समावेश होतो. यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाले तरी, भारतात आयात शुल्क वाढल्यास सोन्याच्या किमती वाढलेल्या दिसतात.

आंतरराष्ट्रीय बाजारांची भूमिका 

जागतिक स्तरावर सोन्याचे दर प्रामुख्याने लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) आणि अमेरिकेतील COMEX या बाजारपेठांमध्ये निश्चित होतात. लंडनमध्ये दिवसातून दोनदा जगातील मोठ्या बँकांचे प्रतिनिधी मागणी आणि पुरवठ्याचा आढावा घेऊन ‘गोल्ड फिक्सिंग’ करतात, ज्याला ‘लंडन फिक्स’ म्हटले जाते. हेच दर जगभरासाठी आधारभूत मानले जातात आणि त्यानुसार इतर देशांतील बाजारपेठा आपले व्यवहार सुरू करतात. 

सोन्याचा भाव ठरवणारे मुख्य घटक

सोन्याच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारा मागे अमेरिकन डॉलरची स्थिती आणि भू-राजकीय घडामोडींचा मोठा वाटा असतो. सोन्याचा जागतिक व्यापार डॉलरमध्ये होत असल्याने, जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात आणि डॉलर कमकुवत झाला की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात, ज्यामुळे त्याचे भाव वाढतात. तसेच, जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती किंवा आर्थिक मंदीची भीती निर्माण होते, तेव्हा सोन्याची मागणी प्रचंड वाढते.

याव्यतिरिक्त, प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक उदा. भारतातील Reserve Bank of India, अमेरिकेची Federal Reserve Bank या बँका आपल्या परकीय चलन साठ्याचा भाग म्हणून सोन्याची खरेदी-विक्री करत असते, ज्याचा थेट परिणाम बाजारभावावर होतो.

दुसरा महत्वाचा घटक म्हणजे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक जेव्हा व्याजाचे दर वाढवते, तेव्हा लोक सोन्याऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात, ज्यामुळे सोन्याचे भाव पडतात. उलट, जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा सोन्यामध्ये गुंतवणूक वाढते आणि भाव वाढतात.

तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत हा सोन्याचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. कारण आपण स्वतः सोन्याचे जास्त उत्पादन करत नाही, आपण ते परदेशातून आयात करतो. भारत सरकारने सोन्यावर किती इम्पोर्ट ड्युटी लावली आहे, त्यावर सोन्याचा अंतिम भाव अवलंबून असतो. जर ड्युटी वाढली, तर सोन्याचे भाव सुद्धा भारतात वाढवले जातात.

शहरांनुसार सोन्याचे भाव बदलतात

तुम्ही पाहिले असेल की मुंबईतील सोन्याचा भाव आणि पुण्यात किंवा नागपूरमधील भावात थोडा फरक असतो. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेलच कि शारांनुसार सोन्याचे भाव का बदलतात? त्याच उत्तर आहे वाहतूक खर्च, स्थानिक टॅक्स आणि मोठी खरेदी. थोडक्यात काय तर शहरांनुसार सोन्याच्या भावात दिसणारा किरकोळ फरक हा स्थानिक सराफ संघटना, वाहतूक खर्च आणि तिथल्या मागणीवर अवलंबून असतो. मुंबई, दिल्ली किंवा चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांतील स्थानिक ज्वेलर्स असोसिएशन जागतिक दरांमध्ये स्थानिक टॅक्स मिळवून आपापल्या शहरासाठी दर निश्चित करतात.

एकंदरीत पाहिलं तर सोन्याचा भाव हा लंडनच्या बाजारपेठेपासून सुरू होऊन डॉलरचे मूल्य, सरकारी धोरणे आणि स्थानिक मागणी या सर्व घटकांच्या समन्वयातून ठरवला जातो. त्यामुळे सोन्याचा भाव हा जागतिक अर्थव्यवस्थेचा एक आरसा आहे, जो सतत बदलत असतो.

याशिवाय स्थानिक मागणी आणि सण-समारंभ देखील सोन्याच्या भावावर परिणाम करतात. भारतात दिवाळी, अक्षय तृतीया किंवा लग्नाचा सीझन आला की सोन्याची मागणी अचानक वाढते. अशा वेळी भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. शेवटी, ज्वेलर्स देखील त्यांच्या स्तरावर काही प्रमाणात मेकिंग चार्जेस आणि मार्जिन जोडतात. त्यामुळे तुम्ही दुकानात जे सोनं खरेदी करता, त्याची किंमत बाजारभावापेक्षा थोडी जास्त असते. उदाहरण द्यायचंच झालं तर, कोविड-१९ महामारीच्या काळात किंवा मोठ्या युद्धाच्या घटनांदरम्यान सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. कारण लोकांनी शेअर्स किंवा इतर गुंतवणुकीऐवजी सोन्यात पैसे गुंतवणे अधिक सुरक्षित मानले.

थोडक्यात सांगायचे तर, सोन्याचा भाव हा लंडन आणि न्यूयॉर्कमधील जागतिक व्यवहारांपासून सुरू होऊन, आपल्या देशातील RBI चे धोरण, डॉलरचे मूल्य आणि IBJA सारख्या संस्थांच्या समन्वयाने आपल्यापर्यंत पोहोचतो. सोन्याचा भाव ठरवणारा कोणीही एक मालक नाही, तर तो जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सोन्याचा भाव पाहाल, तेव्हा फक्त आकडा न पाहता जागतिक डॉलर आणि भू-राजकीय परिस्थितीवरही एकदा नजर टाका, म्हणजे तुम्हाला भविष्यातील कल लक्षात येईल! मार्केटमधील घडामोडींबाबत अपडेटेड राहण्यासाठी ‘नवी अर्थक्रांतीच्या’ पेजला पुन्हा भेट द्या!