कॉलर आयडी ते वायपर : महिला संशोधकांचे नऊ महत्त्वाचे शोध

थॉमस अल्वा एडिसन किंवा अलेक्झांडर ग्राहम बेल ही नावं ऐकलीच असतील? तुम्ही विचाराल हा काय प्रश्न आहे? अहो, ज्यांनी इलेक्ट्रिक बल्बचा किंवा टेलिफोनचा शोध लावला त्यांची नावं आम्हाला माहित नसतील का? पण तुम्ही कधी मेरी अॅंडरसन किंवा अॅन त्सुकामोटो ही नावं ऐकली आहेत का? नाही ना? पण

पण तुम्ही कधी मेरी अॅंडरसन किंवा अॅन त्सुकामोटो ही नावं ऐकली आहेत का? नाही ना? पण त्यांनी लावलेल्या शोधांमुळंही आपलं जीवन खूप सोपं झालं आहे. केवळ त्या दोघीच नव्हे तर अशा अनेक महिला संशोधक आहेत की ज्यांनी लावलेले शोध आज आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. आपण कदाचित त्या गोष्टी वापरल्यासुद्धा असतील, पण त्या कुणी शोधल्या हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. मग आवर्जून पुढे वाचा.

1. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर - ग्रेस हॉपर

ग्रेस हॉपर या नौदलामध्ये रिअर अॅडमिरल होत्या. दुसऱ्या महायुयुद्धाच्या वेळी त्यांच्याजवळ मार्क-1 या कम्प्युटरवर काम करण्याची जबाबदारी देण्यात आली. आपलं काम सोपं व्हावं म्हणून त्यांनी कम्प्युटरला समजतील अशा सूचना तयार केल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळं प्रोग्रामिंगमध्ये आणि पर्यायानं कम्प्युटर क्षेत्रात क्रांती घडली. त्यांच्यामुळेच “डीबगिंग” ही संज्ञा लोकप्रिय झाली. सर्व सहकाऱ्यांच्या लाडक्या असलेल्या हॉपर यांना सर्वजण 'अमेझिंग ग्रेस' असं म्हणायचे. वयाच्या 79 वर्षापर्यंत काम केल्यानंतर त्यांनी नौदलातून निवृत्ती पत्करली.

2. कॉलर आयडी आणि कॉल वेटिंग - शिर्ले अॅन जॅक्सन

कधी एखादा कॉल चालू असतांना ती बीप-बीप ऐकली आहे? तो कॉल वेटिंगचा अलर्ट तसंच येणाऱ्या कॉलचा नंबर देणाऱ्या कॉलर आयडीचा शोध एका महिलेनं लावला. त्यांचं नाव शिर्ले अॅन जॅक्सन. त्या थेरिऑटिकल फिजिसिस्ट होत्या. त्यांच्या संशोधनाच्या आधारावरच कम्युनिकेशन क्षेत्रात पुढे अनेक शोध लागले. त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारावरच इतरांनी पोर्टेबल फॅक्स, फायबर ऑप्टिक केबल आणि सोलार सेलचा शोध लावला. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या प्रसिद्ध विद्यापीठातून पीएचडी मिळवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत्या.

3. वायपर - मेरी अॅंडरसन

1903 च्या हिवाळ्यामध्ये मेरी अॅंडरसन आपल्या कुटुंबियांसोबत न्यूयॉर्कला कारने जात होत्या. बर्फवृष्टी होत असल्यानं ड्रायव्हरला सतत कार थांबवून खिडकी उघडून समोरची काच साफ करावी लागत होती. आणि जेव्हा ड्रायव्हर खिडकी उघडत होता तेव्हा गाडीतील प्रवाशांना आणखी थंडीचा त्रास होत होता. तेव्हा मेरीला विचार केला- 'असं काही उपकरण तयार करता येईल का ज्यानं खिडकी न उघडता काच साफ करता येईल?' आणि मग वायपरचा शोध लागला. 1903 मध्ये त्यांना त्यांच्या शोधाचं पेंटंट मिळालं. त्याकाळी हे वायपर स्वयंचलित नव्हतं. म्हणून हा एक उपयुक्त शोध असूनसुद्धा अनेक कार कंपन्यांनी हे वायपर वापरलं नाही.

4. डिशवॉशर- जोसेफायन कोक्रेन

नोकरांपेक्षा कमी वेळात आणि न फो़डता भांडी धुण्याचं एक उपकरण आपण बनवावं, असं जोसेफायन यांना सतत वाटत होतं. मग त्याच विचारातून त्यांनी पहिलं स्वयंचलित डिशवॉशर तयार केलं. पाण्याच्या दाबाचा वापर करून हे यंत्र तांब्याच्या एका मोठ्या ड्रममध्ये भांडी विसळत. जोसेफायनला यश आलं खरं, पण वैयक्तिक संकटं होतं. त्यांच्या पतीचं दारुच्या आहारी गेल्यानं अकालीच निधन झालं, आणि कर्जाचा डोंगर जोसेफायनच्या डोक्यावर उभा राहिला. पुढं काय करावं हा प्रश्न होता. मग त्यांनी त्यांच्या स्वयंचलित डिशवॉशरचं पेटंट मिळवलं आणि पैसा गोळा केला. इतकंच काय तर पुढे त्यांनी डिशवॉशर तयार करण्याची फॅक्टरीच टाकली.

5. होम सेक्युरिटी सिस्टम - मेरी व्हॅन ब्रिटन ब्रॉउन

1960 च्या काळात अमेरिकेत गुन्हेगारी वाढली होती आणि पोलिसांचा पहारा पुरेसा नव्हता. घरी अनेकदा एकट्या राहणाऱ्या मेरी व्हॅन ब्रिटन ब्रॉउन या नर्सला आपल्याच घरात असुरक्षित वाटत होतं. मग त्यांनी त्यांच्या पतीसोबत होम सिक्युरिटी सिस्टम तयार केलं. यात एका मोटरच्या सहाय्यानं एक कॅमेरा सतत फिरून नजर ठेऊ शकत होता. कोण आलंय हे दार न उघडताच मेरी त्यांच्या बेडरूममधून एका स्क्रीनवर बघू शकत होती. आज जागोजागी लागलेले हेच कॅमेरे गुन्हेगारीवर ताबा मिळवण्यात मोलाचे योगदान देत आहेत.

6. केवलार - स्टेफनी क्वोलेक

स्टेफनी क्वोलेक यांनी केवलार या लाइटवेट फॅब्रिकचा शोध लावला, जे नंतर बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये वापरलं गेलं. त्यांनी तयार केलेले बुलेटप्रुफ जॅकेट हे आधी अस्तित्वात असलेल्या जॅकेटच्या तुलनेत पाचपट शक्तिशाली आहे आणि वजनानं खूपच हलकेसुद्धा. 1965 मध्ये त्यांनी लावलेल्या या शोधामुळे आजवर लाखो सैनिकांचे प्राण वाचले आहेत. आजही हे कापड ग्लोव्ह्ज, सस्पेन्शन ब्रिजमध्ये वापरलं जातं.

7. स्टेम सेल आयसोलेशन- अॅन त्सुकामोटो

अॅन त्सुकामोटो यांना स्टेम सेल आयसोलेशनच्या संशोधनासाठी 1991 मध्ये पेटंट मिळालं. त्यांच्या या शोधामुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक चमत्कार घडले आहेत. कॅन्सरग्रस्तांच्या शरीरात रक्त कसं वाहतं, हे त्यांच्या शोधामुळेच कळू शकलं. त्यामुळंच या रोगावर उपाय शोधणं सोपं झालं.

8. स्पेस स्टेशन बॅटरीज- ओल्गा डी गोंजालिज सानाब्रिया

स्पेस स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या बॅटरीजचा शोध ओल्गा यांनी लावला. पण हा शोध महत्त्वपूर्ण का आहे? कारण त्यांनी शोध लावलेली निकेल हायड्रोजन बॅटरी दीर्घकाळ चालते, त्यानं स्पेस स्टेशनमध्ये दीर्घकाळ वीज वापरता येते. सध्या ओल्गा या नासाच्या ग्लेन रिसर्च सेंटरच्या संचालिका आहेत.

9. मोनोपॉली- एलिझाबेथ मॅगी

बुद्धिबळाइतकाच जगप्रसिद्ध असलेला मोनोपॉली या बोर्ड गेमचा शोध चार्ल्स डॅरो या व्यक्तीनं लावला. पण त्याचे सर्व नियम एलिझाबेथ मॅगी यांनी तयार केले आहेत. भांडवलशाहीचे काय तोटे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी हा खेळ तयार केला होता. द लॅन्डलॉर्ड्स गेम नावाच्या या गेमचा 1904 मध्ये पेटंटही मिळवला. आणि मग याच खेळाच्या आधारावर मोनोपॉलीचे नियम तयार करण्यात आले. 1935 साली द पार्कर ब्रदर्सनं एलिझाबेथ यांच्याकडून 500 डॉलरमध्ये या खेळाचं पेटंट विकत घेतलं होतं.