बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

आजच्या तरुण पिढीला स्वतःचं काहीतरी वेगळं करायचंय, स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठं व्हायचंय. अनेकांकडे नाविन्यपूर्ण कल्पना असतात, समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची तळमळ असते आणि मेहनतीची तयारीही असते, पण प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करताना अनेक अडथळे समोर येतात त्यात मार्केटमध्ये टिकून राहण्याची धडपड, स्पर्धा, व्यवस्थापन यासोबतच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पैशांचा, म्हणजेच फायनान्सिंगचा!
व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल, नवीन कर्मचारी भरती करायची असेल, आधुनिक तंत्रज्ञान विकत घ्यायचं असेल किंवा उत्पादनाची जाहिरात करायची असेल, तर त्यासाठी भांडवल लागणारच. तर मग, या भांडवलाची व्यवस्था कुठून करायची? कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? या लेखात आपण व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचे विविध मार्ग समजून घेऊया.
स्वतःची बचत वापरणं (Bootstrapping)
व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःच्या बचतीचा वापर करणं हा सगळ्यात सोपा आणि सहज उपलब्ध पर्याय आहे. यात तुम्ही तुमच्या जमा केलेल्या पैशांतून व्यवसाय सुरू करता. कधी कधी कुटुंबातील सदस्य, जसे की आई-वडील, भाऊ-बहिण किंवा जवळचे नातेवाईकही सुरुवातीला आर्थिक मदत करू शकतात. या पद्धतीला बूटस्ट्रॅपिंग म्हणतात. यामध्ये बाहेरच्या गुंतवणूकदाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही, त्यामुळे व्यवसायावर तुमचा संपूर्ण हक्क राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाशिवाय तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकता.
या पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणत्याही कर्जाचा बोजा नसतो आणि नफा कमावला की तो पूर्णतः तुमचाच असतो. मात्र, यामध्ये एक मोठी अडचण म्हणजे पैशांची मर्यादा. तुमच्याकडे भांडवल कमी असल्यामुळे व्यवसायाची वाढ मर्यादित राहू शकते. मोठ्या संधींचा फायदा घेण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता भासू शकते.
एंजल इन्व्हेस्टर्स
‘एंजल’ म्हणजे देवदूत, आणि एंजल इन्व्हेस्टर्स हे खरंच तुमच्या व्यवसायासाठी तसंच काम करतात. हे अनुभवी उद्योजक किंवा मोठे गुंतवणूकदार असतात, जे आपल्या वैयक्तिक संपत्तीमधून त्यांना आवडणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात. तुमच्या कल्पनेवर आणि व्यवसायाच्या भविष्यातील संधींवर विश्वास ठेवून ते तुम्हाला भांडवल देतात. मात्र, त्याबदल्यात ते व्यवसायात काही प्रमाणात भागीदारी (equity) घेतात.
एंजल इन्व्हेस्टर्स फक्त पैसा देत नाहीत, तर त्यांचा अनुभव, उद्योग क्षेत्रातील ओळखी आणि व्यावसायिक सल्लाही देतात. त्यामुळे तुमच्या स्टार्टअपला योग्य दिशा मिळते आणि व्यवसाय वाढीला गती मिळते. योग्य एंजल इन्व्हेस्टर मिळाल्यास तुमच्या व्यवसायाला केवळ आर्थिक मदतच नाही, तर एक मजबूत आधारसुद्धा मिळतो.
व्हेंचर कॅपिटल – मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
जेव्हा तुमचा व्यवसाय चांगला चालू होतो, ग्राहक वाढतात आणि विक्री होण्यास सुरुवात होते , तेव्हा पुढील विस्तारासाठी जास्त पैशांची गरज लागते. अशावेळी व्हेंचर कॅपिटलिस्ट्स (VC’s) मदतीला येतात. हे मोठ्या कंपन्यांचे फंड असतात, जे भविष्यात भरभराटीला जाणाऱ्या स्टार्टअप्समध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. जर तुमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची क्षमता असेल, तर हे इन्व्हेस्टर्स तुम्हाला भांडवल देतात.
व्हेंचर कॅपिटलिस्ट्स फक्त पैसे देत नाहीत, तर व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाचे सल्लेही देतात. हे सुद्धा तुमच्या कंपनीत भागीदारी घेतात आणि काही निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे तुमच्या व्यवसायावर काही प्रमाणात त्यांचं नियंत्रण राहतं. तरीही, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवायचा असेल, तर व्हेंचर कॅपिटल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
सरकारी योजना आणि अनुदान
सरकार नव्या स्टार्टअप्सना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत असतं. यामुळे नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळतं. Startup India योजनेत सहभागी झाल्यास व्यवसाय नोंदणीवर सवलती, कर सवलत आणि इतर अनेक फायदे मिळतात. Mudra योजना ही लहान व्यवसायांसाठी आहे, जिथे कोणत्याही तारणाशिवाय छोटे कर्ज मिळू शकतं. तसेच, SIDBI (Small Industries Development Bank of India) ही योजना लहान आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज आणि आर्थिक सहाय्य देते.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित व्यवसाय योजना (Business Plan) आणि अधिकृत नोंदणी असणं गरजेचं आहे. जर सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अटी पूर्ण केल्या, तर सरकारकडून भांडवल उभारणं तुलनेनं सोपं होतं. योग्य योजनेचा लाभ घेतल्यास तुमचा व्यवसाय वेगाने वाढू शकतो.
बँकेकडून कर्ज
व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचा सर्वात पारंपरिक आणि सहज मार्ग म्हणजे बँकेकडून कर्ज घेणं. जर तुमच्याकडे व्यवस्थित बिझनेस प्लॅन, आधीपासून काही उत्पन्न आणि चांगला क्रेडिट स्कोअर असेल, तर बँका तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि कर्ज देण्यास तयार होतात. हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी, विस्तारासाठी किंवा नवीन उपकरणे खरेदीसाठी वापरता येतं.
लहान आणि मध्यम उद्योगांसाठी MSME (Micro, Small & Medium Enterprises) योजनां अंतर्गत काही विशेष कर्ज सुविधा दिल्या जातात. या योजनांमध्ये तुलनेने कमी व्याजदर आणि सोप्या परतफेडीच्या अटी मिळतात. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, व्यवसाय नोंदणी आणि आर्थिक स्थिरता दाखवावी लागते. जर तुमचा व्यवसाय सक्षम असेल आणि विश्वासार्हता असेल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

क्राउडफंडिंग
आजच्या डिजिटल युगात व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचा एक नवीन आणि प्रभावी मार्ग म्हणजे क्राउडफंडिंग. यामध्ये तुम्ही तुमची व्यवसाय कल्पना ऑनलाइन शेअर करता आणि लोकांना त्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करता. Kickstarter, Wishberry, Ketto यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुमची संकल्पना जर लोकांना उपयुक्त, आकर्षक किंवा भावनिकदृष्ट्या जोडणारी वाटली, तर अनेक जण थोडीथोडी रक्कम देऊनही मोठी मदत करू शकतात.
क्राउडफंडिंगमुळे मोठ्या गुंतवणूकदारांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या-थोड्या मदतीतून मोठी रक्कम उभारता येते. याशिवाय, लोकांशी थेट संपर्क होतो आणि तुमच्या उत्पादन किंवा सेवेबाबत सुरुवातीपासूनच जागरूकता निर्माण होते. जर तुमची कल्पना इनोव्हेटिव्ह आणि लोकांना आवडणारी असेल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
इन्क्युबेटर आणि अॅक्सेलेरेटर प्रोग्रॅम्स
इन्क्युबेटर आणि अॅक्सेलेरेटर प्रोग्रॅम्स हे नव्या स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करणारे विशेष उपक्रम असतात. IIT, IIMसारख्या प्रतिष्ठित संस्थांपासून खासगी कंपन्यांपर्यंत अशा अनेक संस्था या प्रोग्रॅम्स चालवतात. यात स्टार्टअपला व्यवसायाची योग्य दिशा, तंत्रज्ञान, नेटवर्किंग, आणि कधी कधी थोडी गुंतवणूक मिळते. नव्याने व्यवसाय सुरू करत असाल, तर हे प्रोग्रॅम्स तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. यातून मार्केटिंग, व्यवस्थापन, संघटन कौशल्ये आणि निधी उभारणीचं ज्ञान मिळतं.
व्यवसायासाठी योग्य फायनान्सिंग निवडणं महत्वाचं आहे. काहींसाठी स्वतःची बचत पुरेशी असते, तर काहींना गुंतवणूकदारांची मदत घ्यावी लागते. काहींना बँकेचे कर्ज योग्य वाटते, तर काहींसाठी सरकारी योजना फायदेशीर ठरतात. तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात आणि तुम्हाला किती भांडवलाची गरज आहे, यानुसार योग्य पर्याय निवडावा. योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या स्टार्टअपचा यशाचा मार्ग सुकर होईल.
सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे ठोस, स्पष्ट आणि विश्वासार्ह व्यवसाय योजना असणं गरजेचं आहे. कोणताही गुंतवणूकदार किंवा बँक कर्ज देण्यापूर्वी तुमच्या व्यवसायाची संकल्पना आणि योजना नीट समजून घेतं. तुमची कल्पना किती व्यवहार्य आहे, त्यातून किती नफा होऊ शकतो आणि ती किती काळ टिकू शकते ,हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे व्यववसायाचं उद्दिष्ट, उत्पन्नाचे स्रोत, खर्च, आणि विस्ताराची योजना या सर्व गोष्टी नीट मांडणं गरजेचं आहे. मजबूत व्यवसाय योजना असेल, तर गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकणं सोपं होतं आणि तुमच्या स्टार्टअपला भक्कम आधार मिळतो.
आणखी वाचा
- UPI मधील नवीन बदल: आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित
- मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनांमध्ये करा गुंतवणुक
- जर खरोखरच आयकर रद्द झाला तर?